21 लाख माफ करण्यासाठी दीड लाखांची लाच; दोघेजण जाळ्यात
जालना- सन 2019- 20 च्या दुष्काळामध्ये बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाचा मच्छीमारीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे 21 लाख रुपये माफ करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मत्स्यव्यवसाय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे डोलखेडा बुद्रुक येथील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी बदनापूर तालुक्यातील सोमठाणा या तलावाचा सन 2019- 20 साठी मत्स्यव्यवसायाचा ठेका घेतला होता. नेमका याच वर्षी दुष्काळ पडल्यामुळे मत्स्यव्यवसाय झालाच नाही. त्यामुळे या ठेकेदाराने मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुनील तुळशीराम वंजारी, वय 55, यांच्याकडे 21 लाख रुपये अवर्षण माफीचा अर्ज केला होता. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सुनील वंजारी यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यांनी केलेली ही मागणी पंचा समक्ष सिद्ध झाली .तसेच सुनील वंजारी यांना दीड लाख रुपयांची लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून याच कार्यालयातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी शशिकांत जाधव, वय 57 ,या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या दोघांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एस. शेख यांच्या पथकातील पोलीस अंमलदार मनोहर खंडागळे, गणेश चेके, ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, गणेश भुजाडे, प्रवीण खंदारे, यांनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna