बँकेच्या प्रतिनिधीने बनावट सही करून हडप केले 11 लाख रुपये

जालना- खातेदाराची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या खात्यातून अकरा लाख रुपये काढणाऱ्या आरोपीला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 21 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत .
बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक मधुकर जनार्धन साळवे यांनी दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी स्वतःहून सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत नमूद केल्यानुसार या बँकेचे सेवानिवृत्तीचे जुने खातेदार रमाकांत सुंदरलाल घोरपडे यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 20 21 रोजी बँकेत येऊन त्यांच्या खात्याबाबत चौकशी केली होती. त्यांच्या खात्यावर केवळ 1 लाख चार हजार नऊशे 64 रुपये होते. परंतु त्यांना त्यांच्या खात्यावर बारा लाख रुपये असणे अपेक्षित होते. त्यावेळी त्यांच्या खात्याची माहिती घेतली असता दिनांक 15 सप्टेंबर रोजी एका लूज धनादेशाद्वारे अकरा लाख रुपये रक्कम काढून घेतल्याचे समोर आले . परंतु हा चेक घोरपडे यांनी दिला नव्हता, त्यांची सही देखील नाही .त्यामुळे अज्ञात व्यक्तीने बनावट सही करून लूज धनादेशाद्वारे ही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून सदर बाजार पोलीस या गुन्ह्याचा तपास लावत होते. या प्रकरणात त्यांना दिनांक 6 फेब्रुवारी ला यश आले आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. त्यावेळी बनावट सही करणारा बँकेचा व्यवसाय प्रतिनिधी असून त्याने बनावट सही करून लूज चेक मिळवला आणि त्यावर बनावट सही करून त्याच्या एका सहकाऱ्याला बँकेमध्ये रक्कम काढण्यासाठी पाठवले. पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या ही सर्व माहिती गोळा करून बनावट सही करणारा बँकेचा व्यवसाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चंद्रभान चव्हाण ,याला दिनांक 6 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान ज्ञानेश्वर चव्हाण याला मदत करणारा त्याचा साथीदार जावेद करीम शेख, राहणार लोहार मोहल्ला, बस स्थानकाजवळ जालना .हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
चार महिन्यापूर्वी घडलेल्या या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे कर्मचारी रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, समाधान तेलंग्रे, धनाजी कावळे, परमेश्वर जाधव, जगन्नाथ जाधव, सुमित्रा अंभोरे, योगेश पठाडे, सोमनाथ उबाळे, दिपक घुगे, भरत ढाकणे, यांनी प्रयत्न केले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna