लाच घेतांना तलाठ्याचा मुलगा जाळ्यात; चार दिवसांपूर्वी तलाठ्याने तहसीलदार हटाव मोहिमेत घेतला होता सहभाग
जालना- सिरसवाडी सजाचे तलाठी इंदुराव सरोदे यांच्याकडे सिरसवाडी इंदेवाडी आणि अन्य काही गावांचा सजा आहे. दरम्यान इंदेवाडी शिवारामध्ये या प्रकरणातील तक्रारदाराचा एका मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटची सातबारावर नोंद घेण्यासाठी या तक्रारदाराने आज सकाळी त्यांना मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी तक्रारदाराला घरी या काम करून देतो पण त्यासाठी चार हजार रुपये लागतील असे सांगितले. तडजोडी अंती ही रक्कम 3हजार ठरली. दरम्यान तक्रारदाराची फेरफारवर नोंद घेण्यासाठी लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि या विभागाने तत्परता दाखवत इंदुराव सरोदे यांच्या निवासस्थानी दुपारच्या वेळी सापळा रचला. ही रक्कम घेताना तलाठी आय.बी. सरोदे यांचा मुलगा गौरव इंदूराव सरोदे, वय 28 याला रंगेहात पकडले आहे. तलाठी इंदुराव सरोदे हे अद्याप पर्यंत अधिकाऱ्यांच्या हाती लागले नाहीत.
* तहसीलदार हटाव ची केली होती मागणी*
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी देखील जालना तालुक्यातील तलाठ्यांच्या संघटनेने उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांची भेट घेऊन जालना चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे अपमानास्पद वागणूक देत आहेत, त्यामुळे त्यांची बदली इतरत्र करावी,तसे झाले तरच तलाठी काम करतील अन्यथा दिनांक 9 पासून सामूहिक रजेवर जातील असा इशारा दिला होता. आणि सध्या देखील तलाठी हे सामूहिक रजेवर आहेत. त्यामुळे त्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे आजच्या या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईशी काही संबंध आहे का? अशी शक्यताही वर्तविली जात आहे . तलाठ्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये विशेष करून आय .बी. सरोदे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख होता. आणि तहसीलदार त्यांच्यासोबत असभ्य भाषेत बोलल्याचे ही निवेदनात म्हटले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक सुदाम पाचोरकर यांच्या पथकातील सहकारी पोलीस निरीक्षक एस. एस. शेख मनोहर खंडागळे गणेश चेके, ज्ञानेश्वर मस्के आदि कर्मचाऱ्यांनी केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna