पंधरा लाखांचे भेसळयुक्त बायोडिझेल पकडले
जालना- पनवेल कडून रायपूर छत्तीसगढ कडे जाणारे पंधरा लाखांचे भेसळयुक्त बायोडिझेल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी काल दिनांक 25 रोजी रात्री दहा वाजता पकडले.
पंधरा लाखाचे डिझेल आणि पंधरा लाखाचे टॅंकर असा सुमारे तीस लाखाचा मुद्देमाल या विभागाने जप्त केला असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रकाश शिवाजी जाधव यांना गुप्त माहितीदारा मार्फत हे टँकर येत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रीना बसय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा निरीक्षक गजानन शिवलाल मोरे आणि काही साक्षीदार घेऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना देऊळगाव राजा रोडवर पानशेंद्रा शिवारामध्ये खाजगी वाहनाने जाऊन टॅंकरची वाट पाहिली. सव्वा दहा वाजेच्या सुमारास जालना कडून एम एच- ०४ जे यु ०४२२ हे येत असल्याचे दिसले. या टँकरला थांबून टॅंकर चे कागदपत्र आणि टॅंकर मधील पदार्थाविषयी विचारणा केली असता, टँकरचा चालक मच्छिंद्र भाऊसाहेब मस्के रा. सावरगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मालकाने न्यू .आजीवली व्हीलेज, तालुका पनवेल जिल्हा रायगड येथून हे टँकर भरून दिले आहे आणि ते रायपूर छत्तीसगढ कडे घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानुसार हा टँकर चा प्रवास सुरू होता. दरम्यान या अधिकाऱ्यांना कोणतीच कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने टॅंकर मधील बायोडिझेल चा नमुना तपासणीसाठी काढून घेऊन भेसळयुक्त बायोडिझेल ने भरलेले हे टॅंकर तालुका पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे. टँकर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या संजय शामराव गंगे रा. गंगेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंधरा लाख रुपयांचे टॅंकर आणि 15 लाख रुपयांचे भेसळयुक्त बायोडिझेल असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*दिलीप पोहनेरकर*
९४22219172