Jalna District

वळण रस्त्यावर एकाला मारहाण करून चार चाकी वाहन पळविले

जालना शहराबाहेरील कन्हैयानगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर दोन जणांनी छोटा हत्ती वाहन चालकास मारहाण करून मोबाईल,पैसे व वाहन पळविल्याची घटना मंगळवार (ता.1 मार्च) रोजी घडली. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सिडको महानगर तिसगाव ता.जि.औरंगाबाद येथील दत्तात्रेय रत्नाकर जोशी हे छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच २० सिटी ८०७६ या वाहनाने कन्हैयानगर मार्गे औरंगाबाद  कडे जात होते. रात्री 11:30 च्या सुमारास निर्मनुष्य रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अनोळखी इसमांनी या वाहनाच्या समोरून मोटर सायकल आडवी लावली व छोटा हत्ती चालकास जबर मारहाण केली. वाहनचालक दत्तात्रय रत्नाकर जोशी यांच्या खिशातील नोकिया कंपनीचा मोबाईल, नगदी एक हजार रुपये व एक लाख रुपये किमतीचे वाहन घेऊन पोबारा केला व वाहन चालकास मारहाण करून राजुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत्या वाहनातून फेकून दिले. वाहन चालक  जोशी यांना जबर मार लागला.

त्या दोन अनोळखी इसमांनी त्यांची मोटरसायकल जागेवर सोडून छोटा हत्ती वाहन घेऊन पसार झाले.  जोशी यांनी घाबरलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेत अर्धा किलोमीटर पायी जाऊन एका हॉटेल चालकास घटना सांगितल्या मूळे हॉटेल चालकाने पोलिसांना कळविले. चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, पोलीस कर्मचारी श्री. बारवाल व चालक साळवे यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन राजुर रोडवर पाच किलोमीटर पर्यंत वाहनाचा शोध घेतला ,परंतु वाहन सापडले  नाही. त्यानंतर जखमी अवस्थेतील वाहनचालक  जोशी यांना सामान्य रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल केले.जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध चंदनझीरा पोलीस ठाण्यात  भारतीय दंड संहिता 1860 कलम 394 ,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी पोहार हे करीत आहेत.

*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button