अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून; आष्टी पोलिसांनी लावला दोन दिवसात छडा
जालना-अनैतिक संबंधातून नातेवाईकाने नातेवाईकाचा खून केल्याची घटना आष्टी पोलीस ठाणे अंतर्गत घडली. आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपीचा छडाही लावला आहे .आरोपीला न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
घनसांवगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथे चप्पल बूट दुरुस्त करण्याचा व्यवसाय करणारे रोहिदास लक्ष्मण खरात 40, हे नेहमीप्रमाणे धामणगाव तालुका परतुर येथे मंगळवार दिनांक 15 रोजी व्यवसाय करण्यासाठी गेले होते.
दरम्यान संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मौजे कोकाटे हदगाव येथील पोलीस पाटलांनी रोहिदास खरात यांचे गुंज बुद्रुक येथे राहणारे भाऊ नामदेव लक्ष्मण खरात यांना भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की रोहिदास खरात हे अंतरवाला येथील पाटाच्या जवळ, कोकाटे हादगाव शिवारात, हनुमान मंदिराजवळ मृत अवस्थेत पडलेले आहेत. मिळालेल्या माहितीवरून नामदेव खरात हे काही नातेवाईकांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रोहिदास लक्ष्मण खरात यांच्या डोक्यात मारहाण केल्याच्या जखमा दिसल्या आणि बाजूला त्यांची मोटरसायकल ही उभी होती. या सर्व प्रकाराची तक्रार नामदेव खरात यांनी दिनांक 16 रोजी आष्टी पोलिस ठाण्यात नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांनी तपासाला सुरुवात केली. आणि प्राप्त माहितीनुसार त्यांनी संशयित आरोपी बाजीराव विनायक माने, 45, वडारवाडी ,तालुका परतुर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने आपणच रोहिदास लक्ष्मण खरात याचा खून केल्या असल्याची कबुली दिली.
*अनैतिक संबंधातून खून*
रोहिदास खरात आणि बाजीराव माने हे नातेवाईक आहेत. रोहिदास खरात यांचे माने यांच्या परिवारात गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध जोडले गेले होते. याविषयी माने यांनी वारंवार रोहिदासला सूचनाही केल्या होत्या मात्र तरीदेखील रोहिदास ऐकत नसल्यामुळे दिनांक 15 रोजी रोहिदास खरात हे धामणगाव येथून बाजार आटोपून परत येत असताना पाटाच्या बाजुलाच चप्पल बूट दुरुस्त करण्याच्या हत्याराने रोहिदास ला मारहाण केली आणि त्यांचा खून केला. रोहिदास खरात हे नेहमी बाजाराला त्यांच्या मुलाला सोबत नेत होते मात्र यावेळी मुलगा सोबत नसल्याने बाजीराव माने यांनी हा डाव साधला. खून करण्यापूर्वी माने यांनी रोहिदास खरात यांना दारूही पाजल्याचे समोर आले आहे.अवघ्या दोन दिवसातच आष्टी पोलिसांनी हा तपास लावला आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172