म.बसवेश्वर प्रतिष्ठान च्या कार्यक्रमात रस्ते वाहतूक आणि प्लास्टिक संकलन विषयी जनजागृती

जालना- महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने लिंगायत समाजातील कर्तुत्ववान मान्यवरांचा रविवार दिनांक 20 रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणार्या समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचाही सत्कार करण्यात आला.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक सचिन झाडबुके यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली तर सृष्टी फाऊंडेशनच्या पदाधिकारी सौ. संगीता मुळे यांनी सृष्टी फाऊंडेशनने हाती घेतलेल्या प्लास्टिक संकलन आणि निर्मूलनाविषयी सविस्तर माहिती दिली.
सत्कार सोहळा म्हटले ही एक- दुसऱ्याने केलेल्या कामांच्या कौतुकाचा सोहळा, असे काही चित्र नेहमीच पाहायला मिळते. महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभामध्ये समाजाच्या बाहेर जाऊन सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणाऱ्या माहिती विषयी जनजागृती करण्यात आली. रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्याविषयी कोणती काळजी घ्यावी विशेष करून महिलांनी वाहने चालवत असताना सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, रस्त्यावर दिसत असलेल्या विविध चिन्हांचे अर्थ काय? काय केले म्हणजे अपघात कमी होतील? याविषयी सचिन झाडबुके यांनी चित्रफितीद्वारे सविस्तर माहिती दिली.
सध्या सर्वांनाच भेडसावत असलेल्या प्लास्टिक वापराच्या वाढत्या प्रमाणात बद्दल चिंता व्यक्त करून , प्लास्टिक संकलन मोहीम सृष्टि फाऊंडेशनने हाती घेतली आहे, ते कुठे गोळा करायचे? आणि त्याचे पुढे काय होणार !याविषयी देखील सृष्टी फाऊंडेशनच्या पदाधिकारी सौ. संगीता मुळे यांनी माहिती दिली. नागरिकांनी जालन्याला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी घरामध्ये जमा होणारा प्लास्टिकचा कचरा सृष्टि फाउंडेशन कडे द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. सत्कार मूर्ती मध्ये ऋषी विद्या शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा सोनटक्के, सी. टी. एम. के. शाळेच्या शिक्षिका शारदा हेरकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगीता मुळे, सौ. राजश्री मुर्गे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा श्रीपत, विनोद वीर, रामेश्वर कोटकर, संध्या जागीरदार. आदींची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
www.edtvjalna.com