शास्त्रीय संगीताची तहान भागवणारा प.भीमसेन जोशी संगीत महोत्सव
जालना- कलाश्री संगीत मंडळ पुणे आणि संस्कृती मंच जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात दोन दिवसीय भारतरत्न “पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव 2022” आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक 20 रोजी या महोत्सवाचा समारोप झाला. दोन दिवस संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली हजेरी लावून सेवा दिली.
दुसऱ्या दिवशीच्या संगीत महोत्सवांमध्ये सौ. संपदा दाभाडकर यांनी राग पुरिया धनश्री आणि भावगीत सादर केले. त्यांना संवादिनीवर डॉ. प्रमोद देशपांडे आणि तबल्यावर सुरेश देशपांडे यांनी साथ संगत दिली.
गेल्या 14 वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेल्या तसेच संगीत विशारद आणि संगीत अलंकार पदवी प्राप्त पंडित सुधाकर चव्हाण यांनीही आपले शास्त्रीय गायन सादर केले. त्यांना साथ दिली ती हार्मोनियम वर यश खडके तबल्यावर सचिन पावगी, तानपुऱ्यावर शाश्वती चव्हाण तर ताल वाद्यावर संभाजीराव यांनी संगत दिली.
फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, मध्ये आपल्या संगीताची भुरळ घालणाऱ्या व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी सादर केलेले व्हायोलिन वादन रसिकांची दाद घेऊन गेले .पं उपाध्ये यांना आकाशवाणी, दूरदर्शन, आणि विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना तबल्यावर मुकेश जाधव तर व्हायोलिनवर अमन वरखेडकर यांनी साथ संगत दिली.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संगीत महोत्सवामध्ये संगीत रसिकांची तहान काही अंशी का होईना शमविण्यामध्ये पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची मदत झाली म्हटले तर वावगे ठरणार नाही.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
www.edtvjalna.com