कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्पर्धा आयोगाची करते काम डॉ.बोडखे
जालना- बाजारामध्ये कोणा एकाची मक्तेदारी होऊ नये म्हणून विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा कायम ठेवण्याची जबाबदारी ही केंद्रीय स्पर्धा आयोगाची( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ,CCI)आहे .अशी माहिती कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ. नरेश बोडखे यांनी दिली.तर परिपूर्ण जीवन जगण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत याविषयी औरंगाबाद येथील उद्योजक मानसिंग पवार यांनी मनोगत व्यक्त केले. हे दोन्ही वक्ते j.e.s. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जवाहर काबरा यांना देण्यात आलेल्या” उद्योग दर्शन गौरव पुरस्कार २०२२” प्रसंगी बोलत होते. रक्तदाना मध्ये शतक पार केलेल्या तसेच विविध उद्योगांशी जवळीक साधून त्याचा उपयोग महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करणाऱ्या सेवानिवृत्त प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी जवाहर काबरा यांचा उद्योग दर्शन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
उद्योगपती मानसिंग पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास भक्कड, यांच्यासह डॉ. नरेश बोडखे कलश सिड्स चे मालक सुरेश अग्रवाल यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. बोडखे यांनी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया बद्दल माहिती देताना सांगितले, की ही कोणतीही स्पर्धा परीक्षा घेणारी संस्था नाही तर ही स्पर्धा लावणारी संस्था आहे. भारतातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मक्तेदारी करण्याची प्रबळ इच्छा असते मात्र ही प्रबळ इच्छा पूर्ण न होऊ देता या कंपन्यांमध्ये निकोप स्पर्धा लावून बाजारावर लक्ष ठेवण्याचे काम हा आयोग करतो.
सत्कारमूर्ती जवाहर काबरा यांचा मानसिंग पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले की एखाद्याला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी कांही ठोकताळे आहेत. त्यासाठी तो संस्कारित असावा, बालपण खेळकर आणि उद्योगी असावं, कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्याच्याकडे नोकरी किंवा व्यवसाय असावा, फावल्या वेळेत समाजासाठी त्याने योगदान द्यावे, आरोग्य असावं, त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, आनंदी वार्धक्य मिळाले पाहिजे. जे जीवन तो जगला त्याबद्दल समाधानी असले पाहिजे आणि जो हे जीवन जगला तोच परिपूर्ण म्हणून खरे आयुष्य जगला असे म्हणता येईल. अशा आयुष्यापेक्षा दुसरी कोणतीही आनंदाची गोष्ट नाही आणि असे आयुष्य जगणारे प्राचार्य डॉक्टर जवाहर काबरा हे आहेत असे गौरवोद्गारही मानसिंग पवार यांनी काढले.
कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com