पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर आंदोलन
जालना- जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. यासंदर्भात जाफराबाद तहसील आणि गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे डोणगाव येथील तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आज शोले स्टाईल आंदोलन केले.
डोणगाव ला पाणीपुरवठा करणाऱ्या सावखेड भोई तलावामध्ये पुढील दोन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा आहे ,मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायत कडे वेळोवेळी पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली मात्र ती पूर्ण न झाल्याने गावातीलच राजू कोंडीबा घोडके, शेख रईस गुलाम शेख, शेख सगीर शेख कौसर, संजय सराटे, मिलिंद जाधव, या तरुणांनी आज डोणगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
दरम्यान या आंदोलनाची अधिकृत माहिती जाफराबाद तहसील देण्यात आली होती. त्याअनुषंगाने आंदोलन सुरू झाल्याची माहिती कळताच तहसील आणि गट विकास अधिकारी यांच्या वतीने ग्रामपंचायतने या तरुणांना लेखी स्वरूपात सुरळीत पाणीपुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यामुळे तरुणांनी हाती घेतलेले आंदोलन मागे घेतले आहे.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com