एकदा लाच घेऊन समाधान झाले नाही ; दुसऱ्यांदा लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात
जालना- अधिकृत देशी दारूच्या दुकानात ग्राहकाला पकडून ग्राहक आणि दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.
कदीम जालना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मस्तगड पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीत काम करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.रत्नपारखे आणि महिला पोलीस पोलीस कॉन्स्टेबल सुनिता शामराव कांबळे ,राहणार म्हाडा कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड,जालना. या दोघांनी दिनांक 23 रोजी एका देशी दारूच्या दुकानात जाऊन दारू घेताना एका ग्राहकाला पकडले आणि ग्राहकांसह दुकानदाराला पोलीस चौकीत आणून प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तडजोडी अंती हे प्रकरण त्यावेळी 4500 रुपये घेऊन मिटविण्यात आले, आणि उर्वरित साडेपाच हजार रुपयांसाठी तगादा सुरू झाला. या साडेपाच हजार रुपयात सोबतच दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता ही द्यावा लागेल अशी मागणी होऊ लागली. या प्रकाराला वैतागलेल्या देशी दारूच्या दुकान चालकाने सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला आणि तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी पंचा समक्ष मस्तगड पोलीस चौकीत सापळा लावला आणि साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना सुनिता शामराव कांबळे यांना रंगेहात पकडले. दरम्यान रत्नपारखे हे आज सुट्टीवर असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फरार दाखवले आहे. या विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एस. शेख पोलिस कर्मचारी ज्ञानदेव झुंबड, ज्ञानेश्वर मस्के, गजानन घायवट, यांनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com