Jalna District

तीर्थपुरीत दोन घरावर सशस्त्र दरोडा, एक जण जखमी ;साडेआठ तोळे सोन्यासह तीन लाखांची रोकड लंपास

जालना- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा भागातील कॉलनीत       आज  पहाटे चार वाजेच्या सुमारास  अज्ञात
१० ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून दोन घरे फोडून एकूण साडे आठ तोळे सोन्याचे दागिने व तीन लाखाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.


घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीतील मुख्य बाजारपेठेला लागून असलेल्या खारामळ्यातील एका कॉलनीत अज्ञात १० ते १२ दरोडेखोरांनी अमोल काशीनाथ गवते यांच्या घराच्या बाहेरील
दरवाज्याचा कडीकोंडा टॉमीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात अमोल व त्याची पत्नी दोघेच झोपलेले होते. आईवडील व लहान भाऊ बाहेरगावी गेलेले होते. चोरट्यांनी दरवाजा आत ढकलताच अमोलला जाग आली तेव्हा अमोल
दरोडेखोरांना प्रतिकार करत खिडकी उघडून आरडाओरड करण्याच्या तयारीत असतांना दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यात रॉड मारून पोटात चाकूचा जबर वार केला. चार ते पाच दरोडेखोरांनी अमोल व त्याच्या पत्नीला एका कोपऱ्यात उभे
करून शस्राचा धाक दाखवून कपाटातील २ लाख ८७ हजार रुपये रोख व सोन्याची तीन तोळ्याची एकदानी, एक तोळ्याचे झुंबर, दोन तोळ्याचा नेकलेसचा हार असे एकूण सहा तोळ्याचे सोन्याचे दागीने व नगदी मिळून ५ लाख ८७ हजारांचा ऐवज
घेऊन अमोल व पत्नीला बाथरूममध्ये कोंडून पोबारा केला.

दुुुसऱ्या घटनेत बाजूलाच असलेल्या प्रवीण शिवाजीराव तांगडे यांच्या बंगल्याच्या बाहेर शोकेस म्हणून लावलेल्या भिंतीवरील काचेची खिडकी तोडूनआत बेडरूममध्ये प्रवेश करून तेथे कपाटातील साड्या अस्ताव्यस्त करून नगदी१५ हजार रुपये व सोन्याचे पाच ग्रॅमचे वेल, कानातील पत्ती चार ग्रॅम, दोन बाळ्या चार ग्रॅम, व सव्वा तोळ्याचे गंठण असे एकूण अडीच तोळ्याचेसोन्याचे दागिने व नगदी १५ हजार मिळून एकूण एक लाख ४० हजारांचा ऐवज लुटून नेला. तांगडे कुटुंब वरच्या मजल्यावर झोपलेले असल्याने चोरी झाल्याचे त्यांना कळले देखील नाही. दरम्यान दोन्ही ठिकाणी मिळून सव्वासात लाखाच्या ऐवजाची लुटालूट करून चार वाजेच्या सुमारास दरोडेखोर पसार झाल्यानंतर बाथरूममध्ये कोंडलेल्या अमोल गवते पती-पत्नी यांनी जोरजोरात ओरडल्याने
शेजाऱ्यांना जाग आल्यानंतर दरोड्याची घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी या दोघांची बाथरूममधून सुटका करून त्यांना दवाखान्यात दाखल केले.


दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ठसे तज्ञ व स्वानपथकाला देखील पाचारण केले होते.दरम्यान सशस्त्र दरोड्याच्या घटनेने तीर्थपुरी व परिसरात खळबळ उडाली आहे.

*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button