विक्रीकर कर्मचारी पतसंस्थेत पाच लाखांचा अपहार
जालना-रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या विक्रीकर विभागाच्या कार्यालयातील विक्रीकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेत पाच लाख 19 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे .
विक्रीकर कर्मचारी पतसंस्थेमध्ये 2016 ते 2019 दरम्यान अध्यक्ष म्हणून जोनवाल रमेश रामसिंग रा.पेढापूर, तालुका गंगापूर आणि सचिव म्हणून सुलतान बेग नवाब बेग हे काम पाहत होते. दरम्यान वरील कालखंडात या दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी संगणमत करून जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुना जालना शाखेतून पाच लाख 19 हजार रुपयांची धनादेशाद्वारे रोख रक्कम काढली. सदरील रक्कम पतसंस्थेच्या जमा खर्चाच्या किर्द मध्ये नोंदवली नाही किंवा कोणत्या कर्जदाराला वाटप केली नाही. त्यानंतर एका खाजगी अंकेक्षका कडून (ऑडिटर) पतसंस्थेचे ऑडिट करून घेतले ,आणि सर्व कारभार अलबेल दाखविला.
एका सभासदाने या ऑडिटमध्ये गडबड असल्याची तक्रार सहसंचालकाकडे केली आणि सहसंचालकांनी याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सहाय्यक उपनिबंधक श्री. वरखडे यांच्यामार्फत पतसंस्थेची चौकशी केली आणि त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून वरखडे यांनी पदभार घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा या पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. गोपाळ नारायण अवधूत श्रेणी दोन, लेखापरीक्षक सहकारी संस्था जालना यांनी ऑडिट केल्यानंतर अफरातफर झाल्याचा अहवाल दिला .
त्यानुसार त्यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात या कर्मचारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश जोनवाल आणि सचिव सुलतान बेग यांच्याविरुद्ध फसवणुकीचा म्हणजे 420 चा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तत्कालीन अध्यक्ष जोनवाल हे सेवानिवृत्त झाले आहेत तर सुलतान बेग सध्या कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.
* बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com