अवैध डॉक्टर कडून अवैध गर्भपात; रॅकेट उघड ;डॉक्टर फरार; गुन्हा दाखल
जालना- गर्भलिंग निदानाला बंदी असतानाही गर्भलिंग निदान करून बालक हे स्त्री जातीचे असेल तर तो गर्भ काढून टाकण्याचा अवैध धंदा जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनिकमध्ये राजरोसपणे सुरु होता. या अवैध प्रकाराची थेट राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे. यांनी दखल घेऊन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना या प्रकरणाविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पद्धतीने गेल्या पाच दिवसांपासून ही मोहीम राबवली आणि दिनांक 29 रोजी राजुरेश्वर क्लिनिक येथे छापा मारून गर्भलिंग निदानासाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्या, इतर साहित्य तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान डॉक्टर सोनोग्राफी मशीन सह फरार झाला असून ज्या महिलेला गर्भपातासाठी डॉक्टरने बोलावले होते त्या महिलेला सामान्य रुग्णालयात हलविलेआहे. अवघ्या दहा मिनिटातच या महिलेचा गर्भपात झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी आज दिनांक 30 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास डॉक्टर सतीश बाळासाहेब गवारे यांच्यासह त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य सात ते आठ जणांविरुद्ध चंदंनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले या त्यांचे सहकारी रेडिओलॉजिस्ट डॉ. विजय वाकोडे, वैद्यकीय अधीक्षक स्त्री रोग तज्ञ डॉ. सरोज घोलप, विधी सल्लागार ऍड. सोनाली कांबळे यांची मदत घेऊन ही मोहीम राबवत होत्या. या अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक आर. के. नाचण पोलीस उपनिरीक्षक गणेश जलवार, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सकू राठोड ,अशोक जाधव, कैलास बारवाल, चंद्रकांत माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रद्धा गायकवाड यांनी ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनिकमध्ये दि.29 रोजी सकाळी सकाळी छापा मारला. त्यावेळी तेथे गरोदर महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्यांचा गर्भपात करण्यासाठी भरती केले असल्याचे लक्षात आले . आणि एका महिलेवर औषध उपचार सुरू असल्याचेही दिसले. गर्भपात करणाऱ्या महिलेची आई यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भलिंग निदान करण्यासाठी या महिलेला दिनांक 27 रोजी राजुरेश्वर क्लिनिकमध्ये मशीन द्वारे सोनोग्राफी करण्यात आली, आणि हा गर्भ मुलीचा असल्याचे सांगितले. तसेच मुलीचा गर्भ नको असल्यास तिचा गर्भपातही करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजता गर्भपात करण्यासाठी या महिलेला भरतीही करण्यात आले आणि याच वेळी या पथकाने छापा मारला. त्यावेळी या रुग्णाला जोराच्या काळात चालू असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेत ने या महिलेला सामान्य रुग्णालयात पाठवले ,आणि अवघ्या काही मिनिटातच या महिलेचा गर्भपात झाला, आणि हे बालक स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याची बाब डॉ. सतीश गवारे यांच्या लक्षात आला आणि त्याने सोनोग्राफी मशीन सह पोबारा केला. परंतु तिथे उपस्थित असलेले गवारे यांचे मदतनीस राजू भानुदास पवार आणि अन्य दोन मदतनीस महिला यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ,डॉक्टर गवारे हे सोनोग्राफीसाठी वेळ देऊन गर्भलिंग निदान करतात व स्त्री जातीचे गर्भ असल्यास गर्भपात देखील करून देतात, तसेच एका गर्भलिंग निदानासाठी 15 ते 20 हजार रुपये व गर्भपात करण्यासाठी 18 ते 20 हजार रुपये घेतात ,अशी माहितीही या मदतनिसांनी दिली.
दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने या झडती घेतली असता लपवून ठेवलेल्या गर्भपाताच्या 3 एमटीपी किट, एक वापरण्यात आलेली एमटीपी किट, रजिस्टर, नगदी रुपये आणि बऱ्याच डॉक्टरांचे रेफर बुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरकडून गर्भपाताची नोंदणी नसलेल्या क्लिनिकमध्ये गर्भपात करताना आढळून आल्याने वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार कलम 132, 313 ,315 ,भा. द .वि. सह कलम 3 व 4 वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 सह कलम 33 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट कलम 3 व 6 गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रलिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू भानुदास पवार ,सुनिता ससाने, कौशल्या नारायण मगरे, एजंट संदीप गोरे, डॉ. पूजा विनोद गवारे, गर्भपातासाठी रुग्ण घेऊन येणारी रामनगर साखर कारखाना येथील डॉ. प्रीती मोरे आणि गर्भपातासाठी लागणारी औषधे पुरविणारे औषधी दुकान चालक श्रीमती स्वाती गणेश पाटेकर यांच्याविरुद्ध चंदंनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान डॉ। सतीश गवारे हे फरार झाले आहेत
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*