… आणि मला बक्षिसांची लालूच लागली-मीनाक्षी राठोड(देवकी)

जालना-शाळेमध्ये शिकत असताना मी आणि माझ्या मोठ्या बहिणीमध्ये बक्षिसांची स्पर्धा लागायची , आणि यातूनच मला बक्षीस मिळवायची लालूच लागली. ही लालूच ही चटक मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी कारणीभूत आहे. असे मत मीनाक्षी राठोड अर्थात (देवकी) यांनी व्यक्त केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर “सध्या सुख म्हणजे काय असतं!” ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेमध्ये देवकी ची प्रमुख भूमिका करणाऱ्या मीनाक्षी राठोड या जालन्याच्या रहिवासी आहेत. त्यांचं बालपण ही जालन्यात गेलं शिक्षणही जालन्यातील बालविकास शाळेत झालं . सध्या त्या “गुड न्यूज” साठी जालन्यात माहेरी आलेल्या आहेत. त्यांच्या या उत्तुंग भरारीच्या कारकीर्दीविषयी त्यांनी मनसोक्त दिलखुलास गप्पा मारताना आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर आलेले चढ-उतारही त्यांनी edtv सोबत बोलून दाखवले.
आपल्या जडण-घडण विषयी मीनाक्षी राठोड म्हणाल्या,” मी घडले नाही तर मला वडिलांनी घडवलं. शाळेत असताना माझी मोठी बहीण शैक्षणिक बक्षीसं मिळवायची आणि मी सांस्कृतिक!. आम्हा दोघींनाही वडिल प्रोत्साहन देऊन पुढे ढकलत राहिले आणि हळूहळू यातून चुरस वाढत गेली आणि बक्षिसं मिळवायची लालूच लागली. त्यामुळे मी काम करत गेले शाळेत काम केल्यानंतर, नाटकांमध्ये, व्यासपीठावर, रंगमंचावर काम छोट्या छोट्या भूमिका करत मुंबई पर्यंत पोहोचले. दरम्यानच्या काळात नाटकात काम करत असताना एका तरुणाशी ओळख “पटली”, आणि या माध्यमातून अंतरजातिय विवाह देखील पार पडला. दुर्दैवाने हा विवाह पाहण्यासाठी वडील हयात नव्हते मात्र आईने सक्षम पणे भूमिका घेऊन आमच्या या विवाहाला संमती देऊन पाठबळ दिलं, आणि आमचा स्वीकार केला.
मुंबईत काम मिळणे कठीण आहे, कारण तिथे आपल्याला पाठिंबा देणारं कोणी नसतं ,काय चांगलं काय वाईट हे सांगणारं देखील कोणी नसतं .अनेक अडचणी येतात मात्र त्या सर्व अडचणींवर आपण मात करून पुढे गेले पाहिजे. मुलींनी मुंबईत गेल्यानंतर संकटाचा सामना तर केलाच पाहिजे त्यासोबत तिच्यावर त्यांच्या घरच्यांचाही विश्वास असणं तेवढंच आवश्यक आहे. आपले ध्येय काय आहे हे डोक्यात ठेवून काम केलं तर हे क्षेत्र खूप चांगला आहे. का कुणास ठाऊक? आत्तापर्यंत अभिनयाच्या या क्षेत्राला मुंबई वगळता इतर सर्व जण नाव ठेवतात, काय गैरसमज आहेत? माहित नाही मात्र माझा अनुभव खूप चांगला आहे, आणि राहिला विषय मुंबईमध्ये सुरक्षित असण्याचा तर मी सांगेल की मुंबई सारखी सुरक्षितता आपल्या गावात हि मिळणे कठीण आहे, कारण मुंबई ही सदैव दक्ष असते आणि आपल्याला पळायला लावते. या पळण्यातूनच आपण पुढे जातो.
दरम्यान सध्या परिस्थिती टीव्हीसमोर बसणाऱ्या प्रेक्षकांची संख्या शहरी भागात कमी झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात या मालिकांना मागणी आहे. त्यामुळे तरुण मुलींनी या क्षेत्राकडे वळावे असे आवाहनही मीनाक्षी राठोड अर्थात देवकी यांनी अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन युवतींना केली आहे.
दिलीप पोहनेरकर, ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*