आता बस झालं!आता चिता किंवा घर- विनाअनुदानित संस्थेच्या शिक्षकांचं स्मशानभूमीत उपोषण
जालना-विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांना 100% वेतन द्यावे, या आणि अन्य काही मागण्यांसाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमी मध्ये काल दिनांक 1 मे पासून उपोषण सुरू केलं आहे.
हे आगळेवेगळे उपोषण सुरु करण्यामागे आरपारची लढाई करण्याचीही भाषा शिक्षक करत आहेत .एक तर चितेवर जाऊ किंवा मागण्या मान्य करूनच घरी जाऊ असा निर्धार या शिक्षकांनी केला आहे.
ज्ञानेश चव्हाण, विजय सुरासे, राजाभाऊ मगर, या तीन शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले आहे. या मागण्यांमध्ये महत्त्वाची मागणी अशी आहे की ,त्रुटी पात्र अघोषित अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के वेतन द्यावे, महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण व मेडिक्लेम योजना लागू करावी, विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लावून शिक्षक अभियोग्यता परीक्षा तात्काळ घेण्यात यावी ,या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे .
रामतीर्थ स्मशान भूमी मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाला जिल्ह्यातील शिक्षकांनी पाठिंबा दिला दिला आहे .या स्मशानभूमीमध्ये शिक्षकांचा आजचा दुसरा मुक्काम आहे. समोर जळणारी चिता आणि एक चिता जळत असताना वाजत गाजत येणारी दुसरी अंत्ययात्रा हे भयावह चित्र काळीज चिरुन टाकणारे आहे. मात्र शासनाने वारंवार या शिक्षकांच्या तोंडाला पुसलेल्या पानांमुळे शिक्षकांचा देखील शासनावर आता भरोसा नाही, कारण सुमारे दोन वर्षांपूर्वी बदनापूर येथील गजानन खैरे या शिक्षकाने मुंबई येथे मंत्रालयात च्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला थातूरमातूर आश्वासन देऊन रवाना केले, मात्र पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातून सुरू झालेले हे आंदोलन आर या पारची लढाई करून जालना जिल्ह्यातच संपवायचे असा निर्धार या शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे समोर प्रेत जळत असतांनाही जीवाची परवा न करता हे तीन शिक्षक महाराष्ट्रातील इतर 60हजार शिक्षकांसाठी ही लढाई लढत आहेत. यासंदर्भात त्यांनी आत्तापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिली आहेत. मात्र पहिल्यांदा कचऱ्याची टोपली आणि दुसऱ्यांदा आश्वासनांचा पाऊस याशिवाय शिक्षकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे आता त्यांनी ठरवले आहे ,आता बस झालं !आता एकच मार्ग चिता किंवा घर .
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*