पे फोन द्वारे लाच स्वीकारण्याचा तलाठ्यांचा नवीन फंडा; दोन तलाठी जाळ्यात
जालना- वाळू वाहतुकीचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे, आणि हे दोन्ही तलाठी मंठा तालुक्यात कार्यरत आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. दिनांक 29 मे रोजी तक्रारदार हे मंठा तालुक्यातील कोकरसा पाटी जवळून वाळूने भरलेला ट्रक घेऊन जात होते. त्याच वेळी तेथे बैठे पथकात कार्यरत असलेल्या अक्षय गणेश भुरेवाल, वय 35, सज्जा उमरखेडा, राहणार वैभव कॉलनी, गोपीनाथ मुंडे चौकाजवळ जालना आणि मंगेश शंकर लोखंडे वय 39, सजा मंगरूळ ,राहणार शिफा कॉलनी मंठा या दोघांनी हा ट्रक अडविला आणि कारवाई करायची नसेल तर पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोडी अंती 30 हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडून रोख पाच हजार रुपये घेतले, आणि आठ हजार रुपये पे फोन द्वारे घेऊन उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 30 रोजी देण्याचे ठरले परंतु तक्रारदाराला तलाठ्यांना लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क केला आणि तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये या तक्रारीची शहानिशा केली असता आज आज दिनांक 31 रोजी ठरलेल्या तीस हजारांच्या व्यवहारापैकी 17 हजार रुपये पे फोन द्वारे अक्षय भुरेवाल यांनी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आठ हजार रुपये दे फोन द्वारे आणि पाच हजार रुपये रोख असे एकूण 13 हजार रुपये दि.29 रोजी आणि आज पे फोन द्वारे 17 हजार रुपयांची लाच घेताना दोन्ही तलाठ्यांना रंगेहात पकडले आहे.या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही तलाठ्यांना त्यांच्या निवासस्थानवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक एस. एस. मुटेकर, ज्ञानदेव झुंबड, मनोहर खंडागळे ,गणेश भुजाडे, यांनी हा सापळा रचला होता.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com