जालन्याला “रेशीम ची राजधानी” करायची आहे- जिल्हाधिकारी
जालना-जालन्याला” रेशीम ची राजधानी” करायची आहे.असा मनोदय जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.१४ जुलै रोजी डॉक्टर राठोड यांना जालनाच्या जिल्हाधिकारी पदी विराजमान होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त “इडी टीव्ही न्यूज” च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी डॉ. राठोड हे बोलत होते.
वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये जालन्यात झालेली कामे आणि भविष्यात महत्त्वाचे प्रकल्प काय? या संदर्भात बोलताना डॉ. राठोड म्हणाले शेती विकासाला जास्त प्राधान्य दिलेले आहे, आणि ते पुढे देण्यात येणार आहे कारण या शेतीच्या व्यवसायावरच अर्थचक्र अवलंबून आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्याला रेशीम ची राजधानी करायची आहे. सध्या परिस्थितीमध्ये जालना जिल्ह्यात कोश निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तुतीची 1800 एकर वर लागवड आहे ती दरवर्षी एक हजाराने वाढवून 5000 एकर पर्यंत न्यायची आहे. त्याच सोबत फक्त कोश निर्मिती करून उपयोग नाही तर त्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी सध्या हे कोश इतरत्र पाठविले जातात ते देखील थांबवून जालन्यातच कोशावर प्रक्रिया करणारे केंद्र उभे करायचे आहेत, आणि शेतकऱ्यांना एक चांगला उद्योग या रेशमाच्या निमित्ताने उभारायचा आहे.
शेतीशी निगडितच असलेली पोखरा योजनेअंतर्गत जालना जिल्हा महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आत्तापर्यंत सव्वा चारशे कोटी रुपयांचा निधी या योजनेला मंजूर झालेला आहे, आणि कामे झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेला जालना पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे जालन्यात घनवन प्रकल्प उभे करायचे आहेत. वनविभागाच्या माध्यमातून ही कामेही सुरू आहेत तर पारसी टेकडीवर सामाजिक संस्थाच्या मदतीने हजारो वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे जालना शहराच्या सभोवती असे घनवन प्रकल्प उभे करून जालन्याला हरित जालना करायचे आहे.
जालना शहराचा आणि परिसराचा एक मोठा विषय आहे तो म्हणजे कुंडलिका- सीना नदीचा. गेल्या अनेक वर्षांपासून नदीचे ओढे झाले होते ते आता समस्त महाजन ट्रस्ट, जालन्यातील दानशूर, उद्योगपती, सामाजिक संस्था ,आणि नागरिकांच्या श्रमदानाच्या माध्यमातून हे नदी पात्र रुंद आणि स्वच्छ केले आहे. एवढेच नव्हे तर नदी काठावर वृक्षारोपणही केले आहे .त्यामुळे लवकरच जालन्यातून वाहणाऱ्या नदीच्या काठावर हिरवी गर्द झाडी देखील पाहायला मिळेल.
ग्रामीण भागाचा कणा असलेल्या पानंद रस्त्यावरही लक्ष ठेवून आहोत .आत्तापर्यंत 300 km पानंद रस्ते रहदारीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून 28 मशीन ज्यामध्ये जेसीबी पोकलँड, अशा यंत्रांचा समावेश आहे ते उभी केली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ डिझेलचा खर्च करून ही यंत्रणा उपलब्ध आहे.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com