खोतकरांनी शिवसेना सोडू नये- भास्कर आंबेकर

जालना -जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ आणि “टायगर अभी जिंदा है” म्हणणारे माजी मंत्री तथा विद्यमान उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याच्या बातम्या आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे चर्चेला उधाण आले. आहे मात्र जोपर्यंत अर्जुन खोतकर हे स्वतः काही जाहीर करत नाहीत तोपर्यंत अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही असे मत जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हे व्यक्त करत असतानाच त्यांनी सूचक विधानही केले आहे की खोतकर यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात जाऊ नये. याचाच अर्थ आता कुठेतरी पाणी मुरत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. बाकी आहे ते फक्त शिक्का मोर्तब होण्याचे.
दरम्यान अर्जुन खोतकर हे वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यावेळी प्रसिद्ध झालेले फोटो आणि पत्र हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून झालेले आहेत, मात्र अद्याप पर्यंत अर्जुन खोतकर यांनी अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही. खोतकर हे दिल्लीला गेल्याचे आपणास माहित नाही मात्र त्यांच्या घरच्यांकडून तशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. अर्जुन खोतकर हे सुरुवातीपासूनच शिवसेनेचे आहेत. त्यांना अनेक वेळा मंत्रिपद आणि आमदारकी शिवसेनेने दिलेली आहे .त्यामुळे ते शिवसेना सोडतील आणि शिंदे गटाला जाऊन मिळतील असे आपणास वाटत नाही. असा विश्वासही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत मागील आठ दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अजून काही दिवस तरी सुरू राहण्याची शक्यता आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com