Jalna Districtजालना जिल्हा

देशाची अस्मिता जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत – जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड

जालना- देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीकारक,देशभक्तांच्या कार्याची प्रेरणा घेत आपण वाटचाल केली पाहिजे.देशाची अस्मिता आणि सन्मान जपण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत,असे जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड यांनी शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय देशभक्तीपर स्पर्धा उदघाटन समारंभात बुधवारी ( ता.१०) बोलताना केले.

शहरातील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथील नाट्यगृहात उदघाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड हे होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षण उपनिरीक्षक डाॅ.सतीश सातव, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, सेंट मेरी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य फादर मनोज,समन्वयक प्रभाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डाॅ. राठोड म्हणाले,की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या जिल्हयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. विदयार्थ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी मोठया संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय व महाविदयालयीन विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत, समूह नृत्य, समूहगान, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी अवश्य सहभागी व्हावे.
स्वातंत्र्यांसाठी ज्यांनी ज्यांनी बलीदान दिले आहे, त्यांचे स्मरण करुन त्या सर्वांचा सन्मान यामाध्यमातून जपला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ता.१३ ते ता.१५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा अवश्य फडकवावा.असेही डाॅ.राठोड यांनी आवाहन केले. मुख्य कार्यकारी मनुज जिंदल म्हणाले, की मागील ७५ वर्षांत आपल्या देशाने वेगाने प्रगती केली आहे. या पुढील ७५ वर्षांमध्येही प्रगतीचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विदयार्थ्यांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे. प्रगती करत असताना एकमेकांप्रती आदरची भावना ठेवावी. आपला देश विविध संस्कृती, भाषेने नटलेला आहे. या प्रतीही परस्परांमध्ये आदर ठेवावा. जेणेकरुन खऱ्या अर्थाने आपण प्रगती साधल्याचे समाधान मिळेल. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी केले.


देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा बुधवारी ( ता.१०) पार पडल्या. गुरुवारी ( ता.११ ) एकल व समूहनृत्य स्पर्धा होतील. शुक्रवारी ( ता.१२) एकपात्री अभिनय, एकल व समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डाॅ.सुहास सदाव्रते,मनीषा पाटील यांनी केले. उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी आभार मानले.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button