पं. रमाबाई मुक्ती संदेश ज्योत यात्रा गुरूवारी जालन्यात
जालना – विधवा, अनाथ बालके,शोषीत, दुर्बल घटकांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या थोर समाजसेविका पं. रमाबाई यांच्या निधन शताब्दी वर्षा निमित्त केडगाव जि. पुणे ते दिल्ली निघालेली मुक्ती संदेश ज्योत यात्रा गुरूवारी ( ता. 18)जालना शहर व जिल्ह्यात येणार आहे.
आयोजकांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. औरंगाबाद येथून सकाळी निघालेल्या या यात्रेचे साडेदहा वाजता गेवराई फाटा ( नुर हॉस्पिटल) या जालना जिल्ह्याच्या सीमेवर याञेचे स्वागत होईल. दुपारी 01.00 वा. बदनापुर, 02.30 वा. शेलगाव येथील प्रार्थना कार्यक्रम करून औरंगाबाद चौफुलीवर याञेचे स्वागत केले जाईल. छत्रपती संभाजी महाराज उद्यान चौक, अंबड चौफुली मार्गे नुतन वसाहत भागातील टॉम डॉपसन चर्च येथे प्रार्थना सभा,त्या नंतर बायपास ने मंठा चौफुली मार्गे जात सायंकाळी 06.30 वा. मिशन हॉस्पिटल जवळील क्राइस्ट चर्च येथे धार्मिक कार्यक्रम, व्याख्यान होईल. शुक्रवारी ( ता. 19) सकाळी मातृतीर्थ सिंदखेड राजा कडे याञा प्रस्थान करणार असूनख्रिस्ती बांधवासह पंडिता रमाबाई यांच्या चाहत्यांनी याञेचे स्वागत करण्यास हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.पञकार परिषदेस सी. एन. आय क्राइस्ट चर्च अध्यक्ष रेव्हरंट एम. डी. जाधव,सचिव दीपक निर्मल, क्राइस्ट चर्च कॅथेड्रल जालना चे अध्यक्ष यु. डी. मनकाळे, वसंत गायकवाड, ब्र. अलेक जेकब, मनोज कांबळे, रिक्की कांबळे, विशाल निर्मल, स्टिफन इंगल्स, भोला कांबळे, निरज कांबळे, डेव्हिड गायकवाड, शाम श्रीसुंदर, यांची उपस्थिती होती.
पं. रमाबाई :
२३/४/१८५८ -५/४/१९२२मंगळुर (कर्नाटक) येथील अनंतशास्त्री डोंगरे ह्यांच्या कन्या, विद्वान वकील बिपिन बिहारी मेधावी (आसाम) ह्यांच्या पत्नी आणि बहुभाषी विदुषी, साहित्यिक, भाषांतरकार, पंडिता सरस्वती हा बहुमान लाभलेल्या रमाबाईंनी स्त्रियांच्या संदर्भातील केलेल्या सामाजिक कार्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त भारतातच नाही तर, जगभरातील अनेक देशांमध्ये पडला.
माझ्या शरीरात शेवटचा रक्तबिंदू असेपर्यंत मी भारतातील विधवा, पतित, परित्यक्ता, अनाथ, अंध, अपंग अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांच्या विकासासाठी कार्य करीन असा प्रण त्यांनी केला आणि तेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय ठरले. त्यासाठी त्यांना फार मानहानी सोसावी लागली. पण ‘एकला चालो रे’ ह्या पद्धतीने त्यांनी आपले कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालू ठेवले.
पं.रमाबाईंनी स्त्रियांना सर्व प्रकारच्या जाचातून मुक्ती मिळावी म्हणून शिक्षण दिले, प्रशिक्षण दिले आणि त्यांना स्वावलंबी केले. भारतातील स्त्रियांसाठी अनेक लघुउद्योग प्रथम पं. रमाबाईंनी सुरू केले. पं.रमाबाई ह्या एक कर्मयोगिनी होत्या. ब्रिटिश सरकारने त्यांच्या ह्या नि:स्वार्थी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘कैसर ए हिंद’ हा पुरस्कार प्रदान केला (१९१९).
पं.रमाबाईंनी भारतीय महिलांसाठी स्त्री डॉक्टर आणि स्त्री शिक्षिका ह्यांची अतिशय गरज असल्याचे ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून दिले.महर्षी कर्वे ह्यांच्या पत्नी रमाबाईंच्या आश्रमातील त्यांच्या आवडत्या विद्यार्थिनी. पंडिता रमाबाईंच्या कार्याविषयी महर्षी कर्वे आजन्म कृतज्ञ राहिले.बायबलचे मूळ भाषांतून भाषांतर करण्याचे मोठे काम त्यांनी एकटीने, सातत्याने तब्बल १८वर्षे चिकाटीने केले.पं.रमाबाई ह्या सत्शील वळणाच्या साध्वी होत्या. ‘हिंदू संतमालिकेत जिचे नाव समाविष्ट करण्यात येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई!’ असे उद्गार सरोजिनी नायडू ह्यांनी पंडिता रमाबाईंच्या शोकसभेत काढले ते महत्त्वाचे आहेत.स्वतःच्या आयुष्यात अपार दुःख असतानाही त्यांनी अनेक स्त्रियांच्या वाळवंटी आयुष्याचे नंदनवन केले. दोन हजार अनाथांच्या त्या आई झाल्या! आजही त्यांचा उल्लेख ‘आई’ म्हणूनच केला जातो.
‘ पं. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराने लिहिलेली अविस्मरणीय कादंबरी!’ असे आचार्य अत्रे ह्यांनी म्हटले, ते खरेच आहे.पंडिता रमाबाईंच्या कार्याने जावा इथली राजकन्या कार्टिनी हिने प्रेरित होऊन तिकडच्या स्त्रियांसाठी कार्य केले.भारताची तेजस्विनी असलेल्या पंडिता रमाबाई ह्यांची कीर्ती जगभर झाली.
****
पं. रमाबाईंची काही वैशिष्ट्ये* आर्य महिला समाज संस्थापक*परदेशात संस्कृत-मराठी शिकवणारी पहिली भारतीय शिक्षिका.* पंडिता व सरस्वती बहुमान प्राप्त.* पहिले प्रवासवर्णन लिहिणारी लेखिका* पहिले परदेश प्रवासवर्णन लिहिणारी लेखिका* पहिले स्त्री जागरपर मराठी पुस्तक लिहिणारी लेखिका.*भारतीय स्त्रियांवरील अन्यायाला इंग्रजी भाषेत पुस्तक लिहून वाचा फोडणारी लेखिका.* हिब्रू व्याकरणाचे पुस्तक मराठीत लिहिणारी लेखिका.* मूळ भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करणारी जगातील एकमेव स्त्री.* प्रदूषणाचा विचार करणारी स्त्री.* महाराष्ट्रात किंडरगार्टन प्रथम सुरू केले.* महिलांसाठी कुटिरोद्योग प्रथम सुरू करणारी उद्योजिका.* महिलांसाठी आश्रम सुरू करणारी पहिली स्त्री.* देवनागरी लिपीचा आग्रह धरला.* खादीचा प्रयोग -प्रचार करणारी स्त्री.* हिब्रू टाईप बनवून पुस्तके जाणारी पहिली स्त्री.
* ‘कैसर ए हिंद’ पुरस्कार प्राप्त स्त्री.
****एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com