कॅन्सरच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार
जालना- ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालना, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा जालना, आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मदनलाल सिताराम अग्रवाल, स्व. श्रीमती सावित्रीबाई कचरूलाल राठी यांच्या स्मृत्यर्थ मोफत कॅन्सर निदान शिबिरात रविवार दिनांक 21 रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 156 जणांनी तपासणी करून घेतली. एक्स-रे, मॅमोग्राफी, पॅपस्मियर, रक्तगट तपासणी या चाचण्याही निशुल्क करण्यात आल्या.
दि. 20 ऑगस्ट रोजी परतूर येथील मंत्री बाल रुग्णालय झालेल्या शिबिरात 75 जणांची कॅन्सर निदान तपासणी करण्यात आली. 21 ऑगस्ट रोजी जालना येथील तपोधाममधील गुरु गणेश मंगल कार्यालयात परम पूज्य गौतममुनिजी यांच्या सानिध्यात शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुमारे 81 जणांची मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये आढळलेल्या कॅन्सरच्या रुग्णांवर पुढील औषधोपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या शिबिरासंदर्भात अधिक माहिती देताना ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फाउंडेशनचे जालना शाखेचे अध्यक्ष विरेंद्र रूणवाल, यांनी सांगितले की,कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष ललीत गांधी व महामंत्री संदिप भंडारी यांच्या नेतृत्वात कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या दोन दिवशीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस या प्रकारातील संशयितांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. अनेक जण लक्षणे दिसत असतानाही निदानासाठी पुढे येत नाहीत. कॅन्सर बरा होऊ शकत नाही, असा जो गैरसमज आहे तो दूर करण्यासह तात्काळ निदानानंतर उपचाराने कॅन्सर बरा होतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाचे प्रकल्प प्रमुख संजय बंब, मनोज मुथा, सहप्रकल्प प्रमुख उमेश पंचारिया, महेश भक्कड, सुनील राठी, सुदेश करवा, सीए नितीन तोतला, महावीर जांगिड, मनीष तवरावाला, जालना येथील सहयोगी डॉक्टर्स डॉ. संदीप मुथा, डॉ. सोनल जितेंद्र रुणवाल, डॉ. पीयूष होलानी, डॉ श्रद्धा होलानी, परतुर येथील डॉ. स्वप्निल मंत्री, निहित सकलेचा आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com