Jalna Districtजालना जिल्हा

मेडिकल कॉलेज मंजुरीचा कागद दाखवा आम्ही तुमचे स्वागत करू- भास्कर आंबेकर

जालना- शहरात गेल्या आठ दिवसांपासून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांमध्ये पोस्टरबाजी सुरू झाली आहे आणि जालना शहरात मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय आपणच मंजूर करून आणले असल्याचा दावा दोघेही करत आहेत.

यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही शासकीय गोष्ट तोंडी सांगून उपयोगाची नसते, ती कागदावरच व्हायला पाहिजे. अद्याप पर्यंत कोणीही कॉलेज मंजूर झाले असल्याचे पत्र जाहीर केलेले नाही आणि प्रसार माध्यमातही ते दिसत नाही. खरंतर केंद्र सरकारचा देखील यामध्ये सहभाग असतो कोणी, काही म्हटले तरी जोपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याचे पत्र पाहायला मिळत नाही तोपर्यंत काय समजायचे ते ज्याचे त्याने समजावे! परंतु ज्यावेळी अशा प्रकारचे पत्र कोणी दाखवेल त्याचे आम्ही स्वागत करू असं सूचक वक्तव्यही भास्कर आंबेकर यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मूर्ती वेस सुरू करावी आणि नागरिकांची गैरसोय टाळावी या प्रमुख मागणीसाठी तसेच अन्य काही मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आज जालना नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गणपती येण्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनात जी काही परिस्थिती उद्भवेल त्यासाठी जालना नगरपालिका जबाबदार राहील असा उघड इशाराही त्यांनी दिला आहे .

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles