शिवसेनेच्या बॅनर वरून खोतकर पिता-पुत्र गायब
जालना-सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये असणारे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर या जोड गोळी मध्ये कधीही राजकारणावरून कुरभुर झाली नाही. झाली असली तरीही ती चव्हाट्यावर आली नाही. परंतु आता दोघांनीही वेगवेगळ्या चुली मांडल्यामुळे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप तर अजून सुरू झाले नाहीत परंतु बॅनर च्या माध्यमातून सर्वसामान्यांना ते आता स्पष्ट जाणवायला लागले आहे .अर्जुनराव खोतकर यांनी शिंदे गटामध्ये जाऊ नये असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केले होते परंतु शेवटी ज्याच्या त्याचा निर्णय !त्यामुळे मागील अडीच वर्ष शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेली भारतीय जनता पार्टी आणि जालना जिल्ह्यात असलेले त्यांचे वर्चस्व हे माहीत असताना देखील अर्जुनराव खोतकर यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला . अर्थातच जालना जिल्हा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे .पर्यायाने त्यांचे नेतृत्व माजी मंत्री खोतकर यांना स्वीकारावे लागणार आहे .
परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेनेशी सध्यातरी एकनिष्ठ असलेले भास्कर आंबेकर आजही शिवसेनेतच आहेत. आज गुरुवारी नगरपालिकेसमोर झालेल्या मूर्ती वेस आंदोलन प्रकरणी हे सर्वसामान्य जनतेसमोर आले आहे. शिवसेनेच्या लावलेल्या बॅनर वरून जनतेलाही आता या दोघांमधील दुरावा हळूहळू जाणवायला लागला आहे, कारण इथे लावलेल्या आंदोलनाच्या बॅनरवर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि त्यांचे चिरंजीव शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर या दोघांचेही फोटो गायब झाले आहेत.
आत्तापर्यंत शिवसेनेचे बॅनर म्हटलं की अर्जुन खोतकर यांचा फोटो येणारच! असं समीकरण होतं. मात्र आता हे समीकरण बदललं आहे. शिवसेनेच्या वाघाच्या बॅनरवर आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तीनच चेहरे दिसायला लागले आहेत. त्यामुळे आता पुढे या बॅनरवर आणखी कोणाचा चेहरा दिसेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com