Jalna Districtजालना जिल्हा

मृतदेह घरात ठेवून अंत्यविधीला जाण्यासाठी करावी लागते वाट; मंठा तालुक्यातील वाईकरांचे दुर्भाग्य

 मंठा-परतूर- मंठा विधानसभा मतदारसंघातील आणि मंठा तालुक्यातील वाई हे सुमारे 3000 लोक वस्तीचं गाव .या  गावाच्या इतर सोयी सुविधा तर सोडाच एखाद्या वाईकराचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतरही यातना त्याचा पिच्छा सोडत नाहीत.

घरामध्ये मृतदेह ठेवून हा मृतदेह अंत्यविधीला न्यायचा कसा? या संकटात गावकरी असतात. ताजे उदाहरण म्हटलं तर काल दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गावातीलच लक्ष्मीबाई शंकर आप्पा चौऊंडे या 70 वर्षीय महिलेचे निधन झालं. सकाळी आठच्या सुमारास झालेले निधन, नुकताच पडून गेलेला पाऊस आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्यात असलेला नाला ,या नाल्यातून मृतदेह न्यायचा कसा? हा मोठा यक्षप्रश्न गावकऱ्यांसमोर होता. मृतदेह घरातच ठेवून गावकऱ्यांनी तीन -चार तास आधी रस्ता केला आणि मग हा मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

दरम्यान गावामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या अंत्यविधीच्या पद्धतीही वेगळ्या आहेत .अंत्यविधीसाठी जागा दिलेली आहे ,मात्र या जागेकडे जाणारा रस्ता ही नाही आणि अंत्यविधी करत असताना पाऊस आला तर अंत्यविधी करायचा कसा हा देखील मोठा यक्ष प्रश्न आहे? त्यातच हिंदू धर्मामध्ये मृतदेह जाळून नष्ट केल्या जातो अशा वेळेस पावसाळ्यात चार महिने गावकऱ्यांचे अतोनात हाल होतात. मृतदेहाची अवहेलना करून विल्हेवाट लावावी लागते. काही समाजाच्या प्रथेनुसार स्मशानभूमीपर्यंत महिला देखील येतात. त्यामुळे पुरुषांच्या सोबतच महिलांचेही अतोनात हाल होतात. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार निवेदनही दिले, ग्रामपंचायत मध्ये ठरावही झाले, मात्र ते कागदापूरतेच ठरले आहेत. एकंदरीत काय तर वाईकरांच्या नशिबी जिवंतपणी तर आहेतच, परंतु मेल्यानंतरही यातना काही त्यांच्या पीच्छा सोडत नाहीत. वेळीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर संयम सुटण्याची भाषा ही आता गावकरी करायला लागले आहेत.

एम.डी. पोहनेरकर 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles