दर्जेदार साहित्यच मनाला आधार देते – डाॅ.प्रकाश आंबेकर

जालना : तंत्रज्ञानाने जग जवळ आलेआहे,दुसरीकडे भावनिक ओलावा हरवत चालला आहे. दर्जेदार साहित्य वाचनाने मनाला उर्जा मिळते. मनाची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी साहित्य विषयक उपक्रमात रमले पाहिजे,असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर यांनी रविवारी ( ता.९) कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित काव्य मैफलीत व्यक्त केले.
शहरातील नाव्हा चौफुली परिसरातील मानस हॉस्पीटलच्या सभागृहात मानस फाऊंडेशन आणि मुद्रा साहित्य संस्थेतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त कविसंमेलनाचे आयोजन कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमास उद्योजक सुनील रायठठ्ठा,कवी कैलास भाले,कवी सुनील लोणकर,डाॅ.सुजाता देवरे,डाॅ.यशवंत सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.मानस फाऊंडेशनचे प्रमुख डाॅ.प्रकाश आंबेकर यांच्या हस्ते काव्य मैफलीचे उदघाटन झाले.यावेळी बोलताना डॉ. आंबेकर म्हणाले,की आज सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. खरेतर मानसिकता चांगल्या अर्थाने टिकवून ठेवायची असेल तर दर्जेदार कथा,कविता यासारखे साहित्यच अशा परिस्थितीतून आपल्याला मानसिक आधार देवू शकते.कविसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते म्हणाले,की मनातील भावभावनांचा जेव्हा अस्सल शब्दातीत हूंकार येतो,तेव्हाच कविता जन्म घेते. कवितेतील आशय आणि विषय जर वाचक रसिकांच्या काळजावर ठाव घेणारा असेल तर अशी कविता कालातीत अधिराज्य गाजविते,असेही डाॅ.सदाव्रते यांनी सांगितले.
कविसंमेलनात कवी विनोद जैतमहाल यांनी आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर परखड टीकात्म भाष्य करणारी कविता सादर करताना ‘बकाल तुमच्या शहरामधले नेते मोजून पाहा !’ ‘ या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. कवी नारायण खरात यांनी सादर केलेल्या ‘ मी झाले कळीचे फूल ‘ या लावणीने कविसंमेलनात रंगत आणली. कार्यक्रमात कवी कैलास भाले यांनी सादर केलेल्या ‘ मला वाटते भर चौकात ‘ या कवितेतून बदलत्या मनाचे चित्रण मांडले.कवी विनोद काळे यांनी ‘ अपराध माझा असा काय झाला’ ही मनाची अवस्था दर्शविणारी कविता सादर केली.कवी सुहास पोतदार यांनी ‘ कवितेचे फूल मला देते ‘ यातून भावनिक मनाचे चित्रण मांडले.कवयित्री राधिका वैष्णव हिने ‘ चांदणी व्हायचय मला ‘ या कवितेतून स्त्री मनाच्या हळूवार भावनांचा संदर्भ मांडला. डाॅ.एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या ‘ रानी तिफण बोलते’ कवितेतून ग्रामीण जीवनातील वास्तव घटनांचा वेध घेतला.कवी गणेश खरात यांनी सादर केलेल्या ‘ वेदनेवर औषध व्हावी गझल माझी ‘ या गझलेला उपस्थितांनी उस्फूर्त दाद दिली.कार्यक्रमात डाॅ.शशिकांत पाटील यांनी सादर केलेल्या कवितेतून समाजातील ढोंगी, स्वार्थी प्रवृत्तीवर प्रखर टीका केली.
कविसंमेलनात डाॅ.प्रभाकर शेळके,मनीष पाटील,
गणेश कंटूले,शिवाजी कायंदे,मिलिंद लांबे, श्रीकांत गायकवाड, प्रा.अशोक खेडकर,प्रा.कृष्णा कदम,प्रा.बी.जी.श्रीरामे,लक्ष्मीकांतदाभाडकरडाॅ.राज रणधीर, मिलिंद घोरपडे, छाया वाघ यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश खरटमल यांनी केले.काव्य मैफलीचे बहारदार सूत्रसंचालन कवी डाॅ.दिगंबर दाते यांनी केले. काव्य मैफलीस प्राचार्य डाॅ.गणेश अग्निहोत्री,गौरीशंकर चव्हाण,डाॅ.रावसाहेब ढवळे, सुधाकर वाहुळे,लक्ष्मीकांत कंकाळ,पूजा भाले यांच्यासह विविधक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com