Advertisment
Jalna Districtजालना जिल्हादिवाळी अंक 2024बाल विश्वराज्य

edtv news अंकुर दिवाळीअंक-2022(अध्यात्म, लेख,गेय कविता,मुलाखत)

नमस्कार !
सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा!
बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल च्या जमान्यात आम्हीदेखील वाचकांसाठी “अंकुर”हा डिजिटल दिवाळी अंक घेऊन आलो आहोत. आमच्या साठी नवीन फुटलेला हा अंकुरच आहे.खरंतर दिवसेंदिवस वाचनाला सवड मिळत नाही,आणि सवड मिळाली तर दिवाळी अंक मिळत नाही. आणि दिवाळी अंक मिळालाच तर त्याचही आता( वजनाने आणि पैशाने) ओझं  होत आहे..या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी आमचा हा खटाटोप. कुठेही, कधीही, कोणालाही, आणि कोणतही ओझं नसलेला असा हा Ed (इलेक्ट्रॉनिक डिजिटल) टीव्ही चा दिवाळी अंक.

मागील 24 वर्षांपासून पत्रकारितेमध्ये योगदान दिलेल्या दिलीप पोहनेरकर यांनी Edtv ला नावारुपाला आणण्यासाठी आपले अनुभव खर्ची घातले आहेत.  या दिवाळी अंकासाठी  मानद संपादक म्हणून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रा.सुहास सदाव्रते यांना विनंती केली आणि त्यांनीही ती तेवढ्याच तत्परतेने स्वीकारून होकार दिला. बळीराजा प्रमाणेच या इलेक्ट्रॉनिक डिजिटल टीव्ही ची ही पेरणी जून 2021 मध्ये केली आहे .अतिवृष्टीमुळे बळीराजाची वाताहात झाली. मात्र ईश्वर कृपेने अवघ्या दीड वर्षातच डिजिटल पोर्टल चैनल , नावारूपाला आला आहे, आणि याचा पुरावा तुम्ही सुद्धा रिव्हर्स आणि सबस्क्राईब वर पाहून मिळू शकतात.
कोविडमुळे जालनेकरांच्या श्रद्धा स्थानांवर अनेक संकटे आली, अनेकांना उपाशी बसावे लागले, त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारी सलग २५ दिवस चालवलेली “जालनेकरांचे श्रद्धास्थान” ही एक मालिका. ज्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करणारी ५ दिवसांची” गौरव स्वातंत्र्यसैनिकांचा” ही दुसरी मालिका. एवढेच नव्हे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कदाचित एक पाऊल पुढे टाकून सार्वजनिक क्षेत्रात, राजकारण, समाजकारण, सरकारी नोकरी, न्याय-निवाडा, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ रणरागिनींना प्रकाश झोतात आणणारी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी नवरात्रात नऊ दिवस चालवलेली “रणरागिनी” ही मालिका .या झाल्या मालिका, यासोबत दैनंदिन घडामोडी आणि त्याही चित्रीकरणास सह वाचकांपर्यंत दिल्या आहेत. त्यांची संख्या सांगणे इथे कठीणच आहे.
एक मात्र नक्की की हे सर्व करण्यासाठी बळ मिळते ते वाचकांच्या आणि जाहिरातदारांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे. Edtv jalna ची ही २ चाके आहेत. जी आम्हाला काम करण्यासाठी बळ देतात .त्यामुळे या दिवाळीच्या निमित्ताने वाचक आणि जाहिरातदार यांच्याकडे एकच मागणी आहे की, आपण सदैव आमच्या पाठीशी राहावे ही विनंती.

  मेघा पोहनेरक ,संचालक संपादक ,

                 edtv jalna

*********************************

या सुखांनो या !

दिवाळी म्हणजे ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशोत्सव.दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा निर्बंध मुक्त सण साजरा होत आहे.दोन वर्षात मानसिक पातळीवर खूप काही बदलले आहे.शारिरीक आरोग्य आपण जपतो,परंतु मानसिक आरोग्याकडे दूर्लक्ष करतो..जगाला आज मानसिक आरोग्य जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे…समोर आलेले संकट उभे ठाकले असताना,त्याला माघारी फिरता येणार नाही,अगदी हिमतीने,ध्येयाने आणि मनाच्या संयमीपणाने जो तोंड देईल त्याचाच हा जमाना आहे. सभोवताली असलेले नैराश्य, दुख,नकारात्मकता,स्पर्धात्मक वृत्ती दूर सारत जीवनाचा नवा मंत्र आपण स्वीकारला पाहिजे…मानसिक आरोग्यासाठी ‘ या सुखांनो या ! ‘ किंवा ‘ हे ,जीवन सुंदर आहे ! ‘ असा विचारच आयुष्य जगण्याला सुकर बनवितो.यासाठी साहित्य, कला,संगीत अशा माध्यमातून आपणाला सूर सापडतो…एक शतक एक दशकापेक्षा अधिक काळापासून ज्या माध्यमातून आयुष्याचा सूर सापडायला लागला तो महत्वाचा घटक म्हणजे मराठी दिवाळी अंक होय…
कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक मिळवून देणारा हा दुवा…मराठी दिवाळी अंकाची परंपरा एक शतक एक दशकाहून अधिक पुढे आली आहे.ब्रिटीशांनी भारतात जेव्हा मुद्रणकला आणली तेव्हापासून लिखित साहित्य पुढे आले.बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा आहे.या दरम्यान विशेष अंक काढण्याची परंपरा आहे.बंगालमधील या परंपरेने तत्कालीन ‘ मनोरंजन ‘ मासिक चालविणारे काशिनाथ माजगावकर यांचे लक्ष वेधले. माजगावकर यांनी तो अंक पाहिला,आणि त्यावरून मराठी असाच अंक काढावा असा विचार मनात आला.बंगाली ‘ मित्र ‘ आडनावाचे मित्र असल्याने माजगावकर यांनी ‘ मित्र ‘ हे आडनाव स्वीकारले..यातूनच मराठी दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मनोरंजन मासिकाने १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक काढला. ही ११२ वर्षाची परंपरा आजही सुरु आहे. काळानुसार टप्पे,प्रकार,साहित्य आणि अंकाचे छपाई तंत्रज्ञान बदलत गेले. ऐंशीच्या दशकानंतर संगणक आले आणि दिवाळी अंकाचा चेहरा बदलला.कृष्ण धवल ते हायटेक फोरकलर,मल्टीकलर असा प्रवास आहे. दिवाळी अंकात ‘ मौज ‘ अंकाचा सिंहाचा वाटा आहे.नव्वद वर्षाच्या पुढे वाटचाल करीत आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ दिवाळी अंकाने महाराष्ट्रात वैचारिक वाचनसंस्कृती रुजविली आहे. आजही ‘ साधना’ परंपरा टिकून आहे,हे विशेष. दिवाळी अंकाचे शेकडो विषय असताना, विनोदी साहित्यावरील विशेष दिवाळी अंक ‘ आवाज ‘ ची परंपरा आजही आहेच. मराठीत आजच्या घडीला पाचशेहून अधिक दिवाळी अंक निघतात. आज साहित्य, कला,संस्कृती,वैद्यकीय, विनोदी,महिला विषयक,राशी भविष्य, आरोग्य, क्रीडा,संगीत,चित्रपट, कृषीसह अनेक विषयानुसार दिवाळी अंक निघतात.मराठी दिवाळी अंकात वेगळे स्थान निर्माण केले ते ‘ विश्रांती ‘ दिवाळी अंकाने. विषयाची वैविध्यपूर्णता ही या दिवाळी अंकाची ओळख.मागील दीड वर्षांपासून जगाला अस्वस्थ करणाऱ्या ‘ कोरोना ‘ ने दिवाळी अंकाची दिशा बदलवली. आजच्या घडीला डिजीटल प्लॅटफॉर्म हा नवा बदल दिवाळी अंकात दिसून येत आहे. दिवाळी अंकाचे नवे रूप धारण केले आहे.जालन्यातून पहिल्यांदाच डिजीटल प्लॅटफॉर्मवरील दिवाळी अंक काढण्याचे काम मेधा दिलीप पोहनेरकर करीत आहेत,हे विशेष.यंदाचा दुसरा डिजीटल दिवाळी आपल्या हाती,देताना आम्हांला आनंद होत आहे !…

हे आहे या अंकात.यंदाच्या डीजीटल दिवाळी अंकात ‘ स्मशानातील वाटेवर, जीवनाची पायवाट ‘ हा एका महिलेच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास उलगडून दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रामतीर्थ स्मशानभूमीत काम करणाऱ्या कासाबाई पांडव यांच्या जगण्याची चित्तरकथा मांडणारा लेख आहे. डिजीटल दिवाळी अंकात युवतीचे शारिरीक व मानसिक आरोग्याबाबत सुयोग्य मार्गदर्शन करणारा ‘ कळी उमलताना’ हा संवाद डाॅ.धनश्री सबनीस,डाॅ.अमृता कुलकर्णी यांची मुलाखत आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करीत साहित्य आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणाऱ्या लेखिका शुभांगी संतोष लिंगायत यांची कवयित्री आरती सदाव्रते यांनी घेतलेली मुलाखत नवा विचार मांडणारी आहे. दिवाळी सणाचे धार्मिक महत्व का आणि कसे ? यावर पुरोहित कृष्णा महाराज जोशी यांचा माहितीपर व्हीडीओ आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला पुनर्जीवन मिळाल्याची यशोगाथा आहे, डॉक्टर राज रणधीर यांची गझल डॉक्टर सखाराम डाखोरे यांची कविता नारायण खरात यांची माझी शाळा तर अनाथालयातील बालकांना भेटल्यानंतर हृदयाला पीळ पाडणारी अभिज्ञा देशपांडे यांचा आत्मानुभव आणि सगळं काही “ओके” आहे सांगणारी सुप्रिया देशपांडे यांची कविता . हिंदू संस्कृतीचा जतन करत भारताला महासत्ता महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या सनातन प्रभातच्या चेतन राजहंस यांचा लेख.वाचक,रसिकांना edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजीटल) चा ‘ अंकूर ‘ डिजीटल दुसरा दिवाळी अंक पसंत पडेल,अशा अपेक्षेसह दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..

डाॅ.सुहास सदाव्रते,मानद संपादक

*************************************

दिवाळी कशी साजरी करावी आणि दिवाळीचे अध्यात्म सांगत आहेत कृष्णा जोशी गुरुजी.

*************************************   डॉ. अमृता कुलकर्णी यांनी डॉ. धनश्री सबनीस यांची “कळी उमलताना “या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

*************************************

डॉ. सखाराम डाखोरे यांची” गावची शाळा” आणि नारायण खरात यांची “शाळा ज्ञानाची पंढरी” अशा या दोघांच्या “शाळा”

**********

पालखीत निघालेल्या चांदण्यांच्या थाटाचं वर्णन करणारी डॉ. राज रणधीर यांची मराठी गझल.

*******

गवसलेलं सुख”

कधीतरी जीवनात अचानक काहीतरी आपल्यासोबत घडून जात आणि तीच घडून गेलेली गोष्ट आपल्याला एक आयुष्यभरासाठी शिकवणूक देऊन जाते. माझ्या मुलाचा वाढदिवस जवळ आला होता आणि तो कुठे आणि कधी करायचा असा विचार रोज आमच्या मनात यायचा शेवटी १ तारीख दोन दिवसांवर येऊन थांबली अन् मी माझ्या मिस्टराणा म्हटल की तुम्हाला मी एक सुचवलं तर चालेल का ? ते म्हणाले सांग तुला काय वाटतं ते. मी त्याना म्हणाले की माझ्या बकेट लिस्ट मध्ये एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याची हीच ती वेळ असावी असं मला वाटतं आहे. ते म्हणाले कोणती इच्छा ? मग मी सांगायला सुरुवात केली आणि कुठलाही विचार न करता मला ते हो म्हटले. माझी कोणती इच्छा होती माहितीये मला माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस अश्या ठिकाणी करायचा होता जिथं गेल्यावर आपण जमिनीवर असून देखील स्वर्गा इतका आनंद तिथं थांबून घेऊ शकू. आम्ही गेलो होतो सोफोश “श्रीवत्स” पुणे इथे .तिथे आम्ही गाडीतून उतरून आत गेट जवळ आलो तिथे एक ताई बसल्या होत्या आमची माहिती घेऊन आत आम्हाला सोडणार होत्या. तिथेच बोर्ड वर खूप साऱ्या लहान मुलांचे फोटोज् होते त्यांना पाहून माझ मन अधिकच भरून येत होत.आमची चौकशी झाली आणि आम्ही वर जिना चढून जाताना डोक्यात खूप सारे विचार होते आणि त्या मुलांना बघण्याची उत्सुकता ही. आम्ही वर पोहचलो आणि तिथल्या मॅडमच्या कॅबिनला गेलो त्या आमची पूर्ण माहिती घेऊन आम्हाला मुलांकडे घेऊन जाणार होत्या. तिथे गेल्यावर त्या म्हणाल्या तुम्ही काय आणलाय मुलांसाठी आम्ही खाऊ म्हणून काजुकथळी घेऊन गेलो होते त्यांनी तो बॉक्स जवळ घेतला आणि कागदावर लिहीत होत्या आम्ही विचारलं तुम्ही काय करताय त्या म्हणाल्या तुम्ही जे आणलाय त्याचा आम्हाला रेकॉर्ड ठेवावा लागतो.मग त्या म्हणाल्या चला आपण जाऊयात मुलांना बघायला आम्ही म्हणालो आम्हाला मुलांना काहीतरी देण्याची इच्छा आहे आणि आम्ही तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करतो .तितक्यात त्या म्हटल्या आम्हाला पैसे नकोत .तुम्हाला जमत असेल तर आम्हाला मेडीसिन देऊ शकता .त्यांचं बोलणं ऐकून मन अजून चलबिचल झालं कारण त्यांना पैसे नको होते यावरून च लक्षात आले की त्या संस्थेला मुलांची किती काळजी असावी त्या मेडीसिन म्हणाल्यावर आम्ही लगेच तयार झालो.

त्या म्हणाल्या मी लिस्ट पाठवते तुम्ही परत आणून देऊ शकता.आम्ही लगेच हो म्हणालो आणि मुलांना भेटायला निघालो . एक मोठा हॉल होता तिथे सारी मुले खेळत होती कुणी तोंडावर रंगखडू ओढत होत कुणी खेळणी खेळत होत अगदी स्वच्छंदपणे त्यांचं बागडण सुरू होत .मी माझ्या मुलाला घेऊन त्या साऱ्यात बसले त्यातले बरेच जण माझ्या जवळ आली आमच्याशी खेळायला .त्यातल्या एका मुलींनी माझी ओढणी पकडून ठेवली आणि माझ्या पोटात गोळा आला.मन खूप भरून आलं त्या क्षनी अस वाटलं या मुलीला तिची आई हवी असेल का? खूप सारे विचार डोक्यात पाठशिवणीचा खेळ खेळत होते .नंतर प्रत्येक खोलीत कुठली मुले आहेत याची पूर्ण माहिती त्या सांगत होत्या. त्यात तर काही बाळ तर अगदी काही महिन्यांची होती. ते सारं पाहून अंगावर शहारा येत होता अस वाटत होत कशी जगत असावीत ही मुलं त्याचे हट्ट त्याचे लाड त्यांचं लहानपण किती वेगळं असेल इतरमुलांपेक्षा. त्यातली तर काही आईच्या दुधावरली होती. काय दोष असावा या निष्पाप जीवांचा ? आणि किती निर्दयी असावीत यांची आई वडील. त्यांना काहीच वाटलं नसेल का आपल्यातला जीव असा बाजूला टाकून कायमच निघून जायला? खूप सारे विस्कटलेले प्रश्न आणि ते चलबिचल मन घेऊन आणि आम्ही तिथून निघालो कारण तिथे जास्त वेळ थांबायला परवानगी नव्हती. तिथून आम्ही बाहेर आलो आणि त्या मॅडम नी माझ्या मुलासाठी ओवालायच ताट सांगितलं होत त्या गोष्टीने तर आम्ही अजूनच आश्चर्यचकित झालो. ओवाळून झाल आणि आम्ही तिथून परत घरी निघालो डोक्यात विचाराच वादळ आणि मनात एक हुरहूर घेऊन तिथून बाहेर पडलो. त्या ठिकाणी जाऊन आल्या पासून अस वाटल खरंच आपण अनावश्यक गोष्टी करतोय जिथं मुलाला साधा वाढदिवस करताना सूरी घेऊन तो केक कसा कापायचा हे माहीत नसतं आणि आपण त्याचा वाढदिवस करायला निघालो. कधी कधी तर लोक काय म्हणतील म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करतो. त्या अनाथ मुलांना भेटून आल्यावर कळलं की आपण आपल्या मुलाचा वाढदिवस त्यांच्या सोबत करून किती आनंदाचे क्षण जगलो . ते नेहमीच आमच्या आठवणीत राहतील . माझ्या मुलाचा वाढदिवस जर मोठा केला असता तर खूप साऱ्या भेटवस्तू आल्या असत्या त्यातल्या तर काही माळ्यावर गेल्या असत्या तर काही दुसऱ्यांना भेटवस्तू म्हणून. परंतु आज जो आनंद आम्हाला भेट म्हणून मिळालंय तो अखंड मनात घर करून असेल ह्या गोष्टीचं समाधान सतत राहील. या निमित्याने माझ्या मुलाला समाजाबद्दल प्रेम वाटेल आणि समाजकर्याकरण्याची वृत्ती आपोआप जागृत होईल. आम्ही जिथे जाऊन आलो तिथे तुम्ही ही आवश्य भेट द्याच खरंच सांगते नेहमीसाठी जमिनीवर राहाल आणि आपलं आयुष्य ही सुंदर आहे या गोष्टीची खात्री पटेल कारण आपण आपली तुलना इतर लोकाबरोबर करण्यात घालवतो आणि अनेक गोष्टी पासून वंचित राहतो. आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता यायला हवं.


सौ. अभिज्ञा(स्नेहा) ओंकार देशपांडे, पुणे

*********

सौ. आरती सदाव्रते यांनी शिक्षिका आणि समाजसेविका सौ. शुभांगी लिंगायत यांची घेतलेली मुलाखत.

*********

स्मशानभूमीच्या वाटेवर जगण्याची पायवाट

अनेक गीतामधून जेव्हा ‘ हे, जीवन सुंदर आहे ! , असा सूर आळविला जातो तेव्हा जीवनाचा अंतीम टप्प्याचा प्रवास कुठपर्यंत असतो,याचा माणूस फारसा विचार करीत नाही..प्रत्येकाला जगावं वाटत,पण मरणाची भीती वाटते..अध्यात्म असो,की विज्ञान तंत्रज्ञान एक अंतीम सत्य हे आहे,की जीवनाचा सुखद अंतीम प्रवास स्मशानभूमीत असतो…अशा ठिकाणी आपल्या जीवनाची अन जगण्याची वाट शोधणाऱ्या पासष्टवर्षीय कासाबाई पांडव यांचा थरारक प्रवास आहे…

कवी ग्रेस यांच्या कवितेचा संदर्भ घेत असताना ‘एक एक पाऊल केवढा कयास होता, घरापासूनी स्मशान इतुका प्रवास होता ‘ कवितेच्या या ओळी जीवनाचे मर्म सांगतात. जगात आपण कुठेही जा, सत्तेचे सम्राट व्हा,किंवा जग जिंकून या,शेवटी अंतीम प्रवास कुठे आहे ?दुसरी बाजू पाहता स्मशानभूमीत राहून तिथले नियोजन करीत अनेकांच्या दुखाला सावरण्याचे काम करणारे मोजकेच असतात.यातही एक महिला म्हणून आयुष्याचे तेवीस वर्ष स्मशानभूमीत काम करणाऱ्या कासाबाई रंगनाथ पांडव यांच्या जगण्याची चित्तरकथा तितकीच थरारक अन प्रेरणादायी म्हणावी लागेल…

शहरातील औरंगाबाद रोड वर रामतीर्थ स्मशानभूमी आहे. दोन दशकापूर्वी या स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम आमदार कैलास गोरंट्याल आणि निवृत्त अभियंता एस.एन.कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सुरु झाले होते.तेव्हा रंगनाथ पांडव हे पहारेकरी म्हणून काम पाहत असत.काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.साहजिकच याच ठिकाणी अंत्यविधी झाला…तेव्हापासून म्हणजे २२ वर्षांपासून कासाबाई पांडव स्मशानभूमीत देखरेखीसह,प्रेतासाठी लाकडे,गोवरी,सरपणासह साहित्य देण्यासह सर्व कामे बघतात.वेळ काळ कुठली असली तरी कुणीतरी येतो..विचारतो आमच्याकडचे व्यक्तीचे निधन झाले..पुढे काय तयारी करायची विचारणा होते…तेव्हा पासष्ट वर्षीय कासाबाई पदर खोचतात आणि इतके लाकडे,इतक्या गोवऱ्या..अमुक अमुक सामान लागते…किती वाजता आणणार.. तेव्हा पुढचे काम सुरु होते…लोक अंत्यसंस्कारासाठी प्रेत घेवून येतात.. कधी कधी तर रात्री अकरा बाराला लोक अंत्यसंस्काराला येतात,तेव्हा सर्व विधी झाले,की लोक जातात पण पुढे दोन तास प्रेत व्यवस्थित जळते का.., नसेल तर पुन्हा लाकडे रचणे,मीठाचा,तूप किंवा इतर वस्तू टाकून पेटवावे लागते. असा थरारक अनुभव कासाबाई सांगतात.अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर तिसऱ्या दिवशी लोक येतात..पूजा करतात आणि निघून जातात तेव्हा पुन्हा’ बॅरेक’ ( प्रेत जाळण्याची जागा) स्वच्छ करुन ठेवावे लागते असेही कासाबाई पांडव सांगतात.अंत्यसंस्कार झाल्यावर अनेक लोक असे असतात,की पैसे इतके कसे जास्त घेता म्हणून नाहक भांडणे करतात याचाही त्रास होतो,अशीही खंत बोलून दाखवितात. स्मशानभूमीत देखरेख,नियोजन करण्यासाठी कधी मुलगा तर कधी मुलगी मदतीला येते. आम्ही जे काम करतो याचा काही पगार कोणी आम्हाला देत नाही.जे काही थोडेफार कुणी मदत देतात यावर घर चालवित असल्याची खंतही कासाबाई पांडव बोलून दाखवितात. जगण्याची अनोखी वाट निवडत जिथे पुरुषी हदयाला पाझर फुटतो,अशा अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाला समतोल सांभाळत स्मशानभूमीत प्रेताच्या अंत्यसंस्काराचे नियोजन करीत स्वताच्या जगण्याची पायवाट शोधणाऱ्या श्रमिक कासाबाई पांडव यांच्या कार्याला सलाम….

========================

दिवाळी एकदम ओके!

काय ती दिवाळी,काय ते फटाके
काय तो फराळ,एकदम ओके।

काय त्या पणत्या,काय तो कंदील
काय ती रोशनाई,एकदम ओके।।

काय त्या चकल्या,काय ते लाडू
काय तो चिवडा,वाह! एकदम ओके।।

काय ती पहाटेची वेळ,काय तो उटण्याचा सुगंध
काय ते अभ्यंगस्नान,एकदम ओके।।।

काय ते नवीन कपडे,काय त्या ओवाळण्या
काय त्या भेटीगाठी,एकदम ओके।।।।

काय तो बोनस,काय तो खर्च
अकाऊंट नील,एकदम ओके।।।।

सुप्रिया अ. देशपांडे

*******************

सौ.शुभांगी लिंबारे” आणि मी कवयित्री झाले”

********************

चाळीस वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाची पुन्हा लागवड केल्याची ही यशोगाथा.

=========

” कृष्णा” तू कुठे आहेस? असे ठणकावून विचारणारी कवियत्री आरती सदाव्रते यांची ही कविता.

************

भारताची महासत्तेकडे वाटचाल!

भारताने नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. ‘गेल्या 74 वर्षांमध्ये भारताने काय मिळवले आणि काय गमावले ?’, याचेही या निमित्ताने विचारमंथन व्हायला हवे. त्यासह ‘भविष्यात प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलायला हवीत ?’, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. प्रस्तुत लेखातून भारत महासत्ता होण्यासाठी दृष्टीने विचारमंथन व्हावे आणि त्यादृष्टीने प्रयत्न व्हावे याच उद्देश्याने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

आज भारतात लोकशाही राज्यव्यवस्था लागू असली,तरी भारतात ‘आदर्श राजा’ आणि ‘आदर्श राज्य’ म्हणून कुणाचा उल्लेख केला जात असेल,तर तो प्रभु श्रीराम अन् त्यांच्या रामराज्याचा केला जातो. भारताच्या प्राचीन इतिहासातील राजांच्या काळात भारत सर्वाेच्च प्रगतीच्या स्थानावर होता. विविध कला,विद्या, तसेच संस्कृती यांचा विस्तार झालेला होता. व्यापार आणि कृषी भरभराटीस होते अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रजा सुखी होती,याचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले, तर ‘भारतातून सोन्याचा धूर निघायचा’ किंवा भारताला ‘सोने की चिडीया’ म्हटले जात असे. भारतात पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. चित्रकला, शिल्पकला,संगीत, नाट्यकला, वास्तूशास्त्र, ज्योतिर्विद्या, तसेच आयुर्वेद आणि अभियांत्रिकी या अन् अशा विविध विषयांचे किंवा विविध क्षेत्रांशी संबंधित असणारे शिक्षण दिले जायचे. प्राचीन काळी भारताची सीमा इराणपासून, अफगाणिस्तानच्या हिंदुकुशपासून अरुणाचलपर्यंत आणि काश्मीरपासून श्रीलंका, म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशियापर्यंत होती असे मानले जाते. भारताशेजारील आताचे अनेक देश एकेकाळी भारताचा भाग होते आणि तेव्हाच्या भारताला अखंड भारत असे म्हटले जाते.

  त्यानंतर गत 1300 वर्षांत झालेल्या इस्लामी, तसेच युरोपीय ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी भारतावर आक्रमण करून अर्थसंपन्न भारताची पुरेपूर लूट केली. पूर्वीच्या काळी असणारी गुरुकुल पद्धत नष्ट करून मेकॉलेने स्वतःची शिक्षणपद्धत भारतात राबवली आणि त्या माध्यमातून राष्ट्राची संस्कृती अन् सभ्यता नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सद्यस्थितीत केवळ विदेशी आक्रमकांनी नव्हे तर, देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील सत्ताधिकार्‍यांनीच भारताला प्रचंड प्रमाणात लुटल्याचे विविध घोटाळ्यांतून लक्षात येते. काही अपवाद वगळता भारतातील कोणत्याही नेत्याचे नाव घेतले की, त्यासोबत त्याच्या काळातील घोटाळ्याचे नाव त्वरित पुढे येते. आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण यांच्या हव्यासापोटी मनुष्य निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. आज संपूर्ण देश ‘फ्री काश्मीर’(स्वतंत्र काश्मीर), नागरिकत्व सुधारणा कायदा, गोहत्या, धर्मांतर, जिहादी आतंकवाद,जातीयवाद, दंगली, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि यांसारख्या अनेक सूत्रांमध्ये भरडला जात आहे. त्यात खून, चोरी, बलात्कार यांसारख्या घटनांचीही भर पडत आहे. देशात राहूनसुद्धा काही समाजकंटक तिरंग्याचा अपमान करत आहेत, देशविरोधी घोषणा देत आहेत. अनाचार, भ्रष्टाचार यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. निसर्गाविरुद्ध गेल्यामुळे माणसांना पूर, भूकंप, दुष्काळ यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चीन, पाकिस्तान प्रश्न अजून सुटलेले नाहीत.

   भारत आज महासत्ता होण्याचे ध्येय बाळगून आहे;  जोपर्यंत देश, संस्कृती आणि समाज यांकरिता हितकारक धोरणे खंबीरपणे राबवणारे नेतृत्व मिळत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. ‘विकास कि सुरक्षितता’, ‘फुटीरतावाद्यांशी चर्चा कि आक्रमक आणि सडेतोड भूमिका’ अशी धोरणे स्पष्ट नसल्याने देशात काय कारभार चालू आहे, हे आपण पहात आहोत.जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतांना भारतीय नेत्यांनी ही गोष्ट विचारात घ्यायला हवी. केवळ शस्त्रे आणि व्यापारी संबंध दृढ करण्यापर्यंत सीमित न रहाता एवढ्या प्रतिकूलतेत राष्ट्ररक्षण करणार्‍या इस्रायलच्या राज्यकर्त्यांची विजिगीषू वृत्ती, शिस्तप्रिय नागरिकांचे राष्ट्रप्रेम हेही आयात केल्यास भारत खरोखरच महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आता आपण इस्रायलची रणनीतीही आयात करणे आवश्यक आहे. पाक, चीन, बांगलादेश आदी देशांना इस्रायली पद्धतीने धडा शिकवल्यास पुन्हा भारताकडे डोळे मोठे करून पहाण्याचे धाडस होणार नाही.आज प्रत्येक भारतियाच्या मनात कणभर जरी देशभक्ती रुजवली, तरी देशातील अशा प्रकारची देशद्रोही कृत्ये नक्की अल्प होतील. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशा अनेक महापुरुषांनी उच्चशिक्षण घेऊनसुद्धा स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग ब्रिटिशांची चाकरी करण्यासाठी केला नाही. त्यांनी शिक्षणाचा उपयोग आपल्या देशाच्या कल्याणासाठी केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

खरेतर तिरंग्याच्या विरोधातील घोषणा, देशाचा अपमान करणारी कृत्ये, आपल्या सैनिकांवर होणारे परकियांचे आक्रमण या सर्व घटनांमुळे आज देशातील युवकांनी पेटून उठायला हवे होते. दुर्दैवाने असे काहीच घडत नाही आणि याचा पुरेपूर लाभ देशाचे तुकडे करू पहाणारे देशद्रोही लोक घेत आहेत. असेच प्रकार जर चालू राहिले, तर आपल्या देशाची अधोगती होऊन आपण पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्य आणि सामर्थ्यवान भारत घडवणे यांसाठी केला पाहिजे.‘माझा थोडातरी वेळ मी माझा देश घडवण्यासाठी देईन’, असा निर्धार केला, तर आपला भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.

     प्रत्येकाने आज स्वतःचा विचार कमी  करून राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करायला हवा अन् या सेवेत स्वतःला समर्पित करायला हवे. तरच भारत जागतिक महासत्ता बनेल. पूर्वीच्या काळी समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे, हेही तितकेच आवश्यक आहे. म्हणजेच परकीय संस्कृतीचे अंधानुकरण करण्यापेक्षा तरुणांनी साधना आणि धर्माचरण केल्यास धर्माधिष्ठित राज्य म्हणजेच ईश्वरी राज्य येईल, त्यातून भारत निश्चितच महासत्तेकडे जाऊ शकतो.

संकलक : श्री.चेतन राजहंस,राष्ट्रीय प्रवक्ते , सनातन संस्था संपर्क क्रमांक : 7775858387

****************************************धन्यवाद!एम.डी.पोहनेरकर 9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

अंकुर दिवाळी अंक-2021 पहाण्यासाठी इथे क्लिक करा.https://edtvjalna.com/category/serials/दिवाळी-अंक/

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button