Jalna Districtजालना जिल्हा

दिवाळी : काल, आज आणि उद्या

परभणी-भारत भूमीस लाभलेली वर्षानुवर्षांची परंपरा म्हणजे दिवाळीचा हर्षोल्लासित करणारा सण. स्फूर्तिदायी वातावरणात पाच ते सहा दिवस चालणारी ही चैतन्यदायी मांदियाळी, पण तयारी ती केवढी! अगदी महिनाभर आधीपासून आणि कोजागिरी पासून जय्यत तयारी सुरू होते. हिवाळ्याच्या चिवट, गोड – गुलाबी थंडीत अश्विन – कार्तिक महिन्यात हे दिवाळीचे अंधारावर मात करणारे प्रकाशपर्व अवतरते! घराच्या साफसफाईपासून हे सत्र सुरू होते, असंख्य फराळाचे पदार्थ व पंचपक्वान्ने उत्साहाने तयार केले जातात, नानाविध वस्त्र खरेदी करून परिधान केले जातात… चाकरमानी कुटुंबे, आप्तस्वकीय एकत्र येतात, भेटीगाठी घेतात, आस्थेने एकमेकांची चौकशी करतात, फराळाच्या पदार्थांची देवाण- घेवाण आणि फराळाची निमंत्रणे पाठवली जातात, सोबत फटाक्यांची आतषबाजी होते, हे झाले साधारणतः काही वर्षांपूर्वीचे दिवाळीचे अल्हाददायक चित्र! कडाक्याच्या थंडीत उटणे लाऊन अभ्यंग स्नान केले जाते, ज्यामुळे त्वचेची कांती आणि पोत सुधारतो, शिवाय त्याकाळी ब्यूटीपार्लरचे प्रस्थ नसल्यात जमा होते, सहसा स्त्रियांचे स्वयंपाक गृह हेच त्यांचे ब्यूटी पार्लर असण्याचे ते दिवस होते. नवे कपडे खरेदी करण्याचे त्याकाळी प्रचंड अप्रूप वाटत असे, कारण सर्वसाधारणपणे दिवाळी, दसरा अशा सणांनाच सर्वांना नवीन कपडे घेतले जायचे, कारण तेच आणि तेवढेच परवडत होते. रंगीबेरंगी आकाशकंदील मोठ्या प्रमाणात घरीच तयार करण्याचा प्रघात होता, ती, बालगोपाळ आणि मुलांसाठी आपली कला सादर करण्याची पर्वणीच होती! कमीत कमी खर्चात घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून हे कंदील बनवले जायचे. लक्ष्मीपूजनासाठी देवीचे साधेच फोटो किंवा लक्ष्मीच्या मूर्ती घरीच चिखल – मातीच्या तयार केल्या जात असत, म्हणजे कलेला वाव, आत्मिक समाधान आणि पैशांची बचत असे ईप्सित साध्य होत असे! सोबतच कार्तिक महिना साजरा करण्याचा सुद्धा प्रघात होता, ज्यामध्ये दररोज भल्या पहाटे उठून, घरासमोर आणि गावातील मंदिरासमोर मुली आणि महिला रांगोळी काढत असत, तसेच मन प्रसन्न करणारी काकड आरती देखील होत असे. मंत्रमुग्ध करणारे हे वातावरण म्हणजे त्या काळच्या पिढ्यांचे वैभव होते! पाहुणे-रावळ अगदी बिनदिक्कतपणे एकमेकांना साग्रसंगीत पाहुणचार करण्यासाठी बोलवायची, आरामात सात – आठ दिवस एकमेकांच्या सहवासात राहायची आणि समाधानाने एक दुसर्‍यांना निरोप देत पुढच्या दिवाळीची आतुरतेने वाट पहायची, थोडक्यात काय तर ही झाली कालची साग्रसंगीत निवांत दिवाळी…

काय म्हणता? आजच्या दिवाळीबद्दल बोलू, ऐका तर मग, आजच्या दिवाळीची तऱ्हाच न्यारी! आजचे युग म्हणे धावपळीचे युग, अहो, धावपळीचे म्हणजे कुणाला कुणासाठीही वेळ नाही, म्हणे श्‍वास घ्यायला पण फुरसत नाही! मग अशा धकाधकीच्या जीवनात निवांतपणे दिवाळी साजरी करायला वेळ तरी कुणाकडे असणार म्हणा? म्हणूनच तर आजच्या दिवाळीचे रूप संपूर्णतः पालटून गेले आहे. आज प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्यापेक्षा आभासी आणि डिजिटल माध्यमांतून दिवाळी बर्‍याच अंशी पाहायला मिळते. खरेदीचे महत्त्व मात्र आजही तेवढेच अबाधित आहे, उलट ते जास्तीचे वाढले आहे. बोकाळलेल्या चंगळवादी जगात ज्यांच्याकडे बर्‍यापैकी पैसा असतो ते सर्व लोक सातत्याने खरेदीला बाहेर पडतात, यात सर्व समाजघटक समाविष्ट असतात. या खरेदीचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे कर्ज काढून हफ्ते भरून नवनवीन वस्तूंची अमाप खरेदी करत जाणे आणि मग आयुष्यभर ते कर्जाचे हफ्ते फेडत बसणे. हे केवळ दिवाळीच नव्हे तर कमीअधिक प्रमाणात सर्वच सणावारांना होत असते, फरक इतकाच की दिवाळीला ते जास्त प्रमाणात होते! कपडे आणि इतर तत्सम खरेदीच्या बाबतीत बोलायचे तर आज असेही तसेही आर्थिक सुबत्ता असणारे लोक वर्षभर कपडे आणि दागदागिने खरेदी करतच असतात, घरात कपडे ठेवायला जागा कमी पडेल एवढे लोकांकडे कपडे असतात, दिवाळीला त्यात अजून भर पडते, पण हे सर्वांनाच शक्य नसते, गरिबांना स्वतःचे लज्जारक्षण करण्याइतपत कपडे खरेदी करणे हे आजही त्यांच्यासाठी दिव्यच असते! चकचकीत दिसण्याच्या या युगात आपसूकच स्त्रिया ब्यूटी पार्लर कडे सतत धाव घेत असतात, वेळ आणि पैसा यांची कशी बशी सांगड घालत प्रत्येक सणावाराला मंदिरात चकरा माराव्या तशाच पार्लर मध्ये देखील जात असतात! जाऊ नये असे नव्हे, पण कुठेतरी मर्यादा पुसट होत असलेल्या स्पष्ट दिसतात, त्यासाठी आटापिटा सुरू असतो.

दिवाळीनिमित्त करावयाची साफसफाई हा आजच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. आधीच्या काळी घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन साफसफाई तसेच सजावटीची कामे करायची पण आज कुणाकडेही तेवढा वेळ नाही म्हणून प्रत्येक प्रकारच्या यंत्रांची खरेदी अनिवार्य झाली आणि त्या यंत्रांच्या जोरावरच साफसफाई होऊ लागली, अर्थातच, कालच्या दिवाळीपेक्षा आजची दिवाळी साफ-सफाईच्या दृष्टीने सोप्पी झाली, शिवाय विविध कामांसाठी कामकरी वर्गाची मदत देखील घेतल्या जाऊ लागली, सफाई तर झाली नीटनेटकी, आता पुढे काय? पुढे अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, फराळ तसेच पंच पक्वान्नांचे विविध प्रकार जे की पूर्वीच्या काळी सर्वजण एकत्र येऊन घरीच बनवायचे. आता काहीसे घडले असे की स्त्रिया मोठ्या प्रमाणावर अर्थार्जनासाठी बाहेर पडल्यामुळे, घरकामांसाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ शिल्लक राहिला नाही, याचा परिणाम असा झाला की दिवाळीचा फराळ सरसकट बाजारातून तयार पदार्थ खरेदी करून आणला जाऊ लागला, घरी फराळ तयार करण्याची पद्धत हळूहळू लोप पावत चालली आहे. तसेच दिवाळी जलसे, पार्टी आदींचे देखील मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक व सामाजिक स्तरावर आयोजन होताना दिसत आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे लोक सामील होताना दिसतात. दिवाळीच्या पणत्या ज्या आधीच्या काळी मातीच्याच बनवल्या आणि घेतल्या जायच्या, त्या आज चायना मेड, प्लास्टिक आणि इतर काही प्रकारच्या घेतल्या जात आहेत, ज्या पर्यावरणास घातक तर आहेतच, पण गरीबांच्या हाताचा रोजगार हिसकावून घेणार्‍या सुद्धा आहेत. आजच्या दिवाळीत होणारा फटाक्यांचा अतिरेकी वापर पर्यावरणास घातक तर आहेच पण त्याहीपेक्षा अधिक तो आरोग्यास हानिकारक आहे. दिवाळीच्या रुपात आकर्षक असे हे बदल आतून परंपरा गोठवणारे दिसत आहेत. गतिमान युगात वेळेच्या अभावामुळे दिवाळीचे सोपस्कार होताना दिसतात, त्यातला ओलावा आणि आत्मीयता हरवत चालली आहे की काय अशी शंका येते! कृत्रिमता हा आजच्या जीवनाचा स्थायीभाव झालेला अनुभवास येतोय… अशा कठीण परिस्थितीत जीवनाचा सहजभाव टिकवणे आणि सत्य, सुंदर मंगलाची आराधना करीत दातृत्वाची दिवाळी साजरी करणे यातच विश्वाचे कल्याण आहे…

उद्याच्या दिवाळीचे काय? लोकांना जर एकमेकांसाठी वेळच नसेल तर दिवाळी पुढल्या काही वर्षांमध्ये केवळ नावाला शिल्लक राहण्याची भीती वाटते आहे. लोक इतके प्रचंड व्यस्त झाले आहेत, सर्वजण व्यस्त नसले तरी निदान ते भासवतात तरी तसेच… इथून पुढच्या पिढ्यांना जर दिवाळी स्मरणात राहावी असे वाटत असेल तर आपणास हे वेगाने फिरणारे गतीचे चक्र रोखून धरावे लागेल, तरच दिवाळीचा क्षणभर विसावा आपण घेऊ शकू. प्रत्यक्षात व्यस्तता कमी आणि दाखवायचे जास्त असेही सुरू असते पुष्कळदा… या सर्व पाश्र्वभूमीवर दिवाळीचा सण कैक वर्षें पिढी दर पिढी परंपरेच्या रूपाने हस्तांतरित व्हावे असे वाटत असेल तर ‘चला विसावू या वळणावर’ हे आपणास करावेच लागेल. बाकी संपन्नता येत राहील, गरीबी देखील इथे राहीलच. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी देखील अशीच कायम राहणार, कारण ही रुंदावत जाणारी दरी कमी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती बरोबरच, दातृत्व व बडेजावाचा अभाव या मानवीमूल्यांचे पालन अपरिहार्य आहे… दिवाळीच्या परंपरा बदलतील, नव्या नव्हाळीत न्हाऊन निघतील, रूप बदलून पुन्हा पुन्हा येतील आणि दिवाळीची शोभा वाढवत राहतील…
शेवटी सांगायचे एवढेच की, ‘दिवाळी’ म्हणजे देणे, आनंद देणे, प्रकाशाचे पुंजके वाटणे, कपडे देणे, अन्न देणे, म्हणजेच वाटणे. कविवर्य विंदा करंदीकरांच्या शब्दात ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे… घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे’…
दिवाळी, काल आज आणि उद्याही प्रकाशपर्व म्हणूनच कायमस्वरूपी चिरतरुण राहावी हीच उदंड मनोकामना! मनात शुभेच्छा असतील तर त्या मिळतीलच, काल, आज आणि उद्या सुद्धा!
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान तेवढे पालन व्हावे,
“आता विश्वात्मके देवे, येणे वाग् यज्ञे तोषावे,
तोषुनि मज द्यावे, पसायदान हे. दिवाळी म्हणजेच” जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात”…

– डॉ. संगीता जी. आवचार,
उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख,
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी – 431 401
महाराष्ट्र
चल भाष्य : 9767323290
जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, परभणी
जिल्हा उपाध्यक्ष, अंकुर साहित्य संघ, परभणी

*******

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button