“रस्ते अपघातातील मृतांच्या जागतिक स्मृती दिन; परिवहन कार्यालयाच्या वतीने फेरी काढून जनजागृती
जालना- वाहनांच्या अपघातामध्ये मृत पावलेल्यांचे स्मरण म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर हा जागतिक स्मृतिदिन म्हणून पाळल्या जातो, या दिनाच्या निमित्ताने मृतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली अर्पण करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एक फेरी काढण्यात आली आणि भविष्यात अशी दुर्घटना घडू नये अपघात होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्यात आली.रस्तेअपघात मृतांचे स्मरण ‘हेल्मेट सीट बेल्ट रस्ता सुरक्षा रॅली’ घेऊन करण्यात आले.
या रॅलीचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस, एसटी महामंडळ, ड्रायव्हिंग स्कूल, स्कूल बस संघटना, वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.रॅलीचा समारोप जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या अनुभव कथनाने झाला. यावेळी लक्ष्मण तुकाराम मदन यांनी त्यांच्या मुलाचा मृत्यू हा दुचाकी अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे सांगितले.”आमच्या कुटुंबियास ठेच लागली, यातून आपण शहाणे व्हा ” संपूर्ण रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी लिहिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्यूमध्ये घट घडवून आणण्यासाठी जालना जिल्ह्यात “सुरक्षित रस्ते, समृद्ध जालना ” हा कार्यक्रम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्यातील रस्ते अपघातांतील मृत्यू हे प्रामुख्याने दुचाकी चालकांचे असून ते मुख्यत्वे जालना-अंबड-वडीगोद्री-शहागड या रस्त्यावर होत असून त्यात घट घडवण्यासाठी या मार्गावर दुचकी चालकांकडून रस्त्याच्या डाव्या बाजूचा वापर, हेल्मेटचा वापर, दुचाकींना दोन्ही आरसे असणे, मोबाईल न वापरणे या प्रमुख गोष्टींबाबत सुरुवातीस जागृती करून नंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे श्री काठोळे यांनी सांगितले.
कार्यक्रमास सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे, पोलीस विभागाचे श्री. जाधव, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री .नेहुल, श्री नाईक, श्री लांडगे, श्री माने, सर्व ड्रायव्हिंग स्कूल , स्कूल बस प्रतिनिधी बिरायतकर, वाहतूक संघटना श्री हजबे व इतर , सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक यांची उपस्थिती होती.”रस्ता सुरक्षा शपथ ” घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com