बाल विश्व

जांब येथे श्रीराम मूर्तींचा पुनःस्थापन सोहळा आज पासून सुरू होत आहे :त्यानिमित्य जांबची आणि श्रीरामांच्या मूर्तींची महती सांगणारा हा विशेष लेख

श्रीक्षेत्र जांब येथील चोरी गेलेल्या श्रीरामांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आणि त्यांचीपुनःस्थापना उद्या दि.25 रोजी होत आहे. तत्पूर्वी आजपासूनच हा सोहळा सुरू झाला आहे. जांब समर्थ येथील या मूर्तींचे महत्त्व आणि उद्या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळा विषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख. घनसावंगी येथील समर्थ रामदास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब सोनाजी देवकर यांनी लिहिला आहे.

(जांबसमर्थ) दिनांक २५/११ / २०२२ रोजी श्रीक्षेत्र जांबसमर्थ मधील श्रीराम मृतींचा ऐतिहासिक सोहळा पुन्हा एकदा पाहण्याचे भाग्य मिळनार आहे. श्रीसमर्थ कालीन जांब गावाचे स्वरूप आज जरी राहिलेले नसले तरी, त्यावेळी ते कसे होते, याची कल्पना आपणास या श्रीराम मंदिरातील श्रीराम मृतींचा ऐतिहासिक पुनप्राणप्रतिष्टा सोहळा अनुभवून पुन्हा येऊ शकतो, आज जांब गावाचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात कायम आहे. गावात शिरण्यापूर्वी गावाच्या वेशीला लागूनच गावाबाहेर श्रीमारुतीचे पुरातन मंदिर जसे आहे तसेच आहे. या मंदिराच्या पाठीमागे नारायण रुसून बसले होते, तेही स्थळ तसेच आहे, परंतु गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले मोठे बुरुज आज दिसत नाहीत. त्याच प्रमाणे गावाच्या भोवती असणारा तटही आज नाहीसा झाला आहे.

गावाला फार मोठी पांढरी मातीची गढी होती, ती आज संपत आलेली आहे. गावांमध्ये काही घडीव दगडांची ज्योती अजून शिल्लक आहे. जांब ही प्राचीन काळातील मोठी बाजारपेठ होती, या गावात मागील काही काळामध्ये हातमागावर कापड विणण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालत असे, आज ही एक दंतकथा बनलेली आहे. मागील काही काळात जांब गावांमध्ये अठरापगड जातीच्या समाजाची वस्ती होती, परंतु आज बोटावर मोजण्याइतकेच समाज शिल्लक आहेत. गावांमध्ये महादेवाचे मंदिर, गणपतीचे मंदिर, विश्वकर्माची मूर्ती असलेले मंदिर, त्याचप्रमाणे मुंजा चे मंदिर, खंडोबाचे मंदिर व रामतीर्थ, देवमळा, पानमळा, डोंगरमळा, अशा नुसत्या नावाच्या आठवणी असल्याच्या दिसून येतात. या श्रीसमर्थ घराण्याचे मुळ जांब गावातील श्री. सूर्याजीपंत ठोसर व पुढे श्रेष्ठ गंगाधर स्वामीच्या वंशजा पासून ते आज पर्यंत आपणास पाहावयास मिळते.

“श्रीसमर्थांच्या पूर्वजांचा इतिहास”

धन्य त्यांचे कुळ धन्य त्याचा वंश I जे कुळी रामदास अवतरले ॥ धन्य ते जननी धन्य तिची कुसी । जे हरी प्रियासी प्रसवली II
धन्य ते संबंधी संताचे सोयरे I सत्संगे उद्धरे कुळ त्यांचे ॥ धन्य तो पै ग्राम धन्य तो पैं देश I जेथे रहिवास समर्थांचा ||

श्रीसमर्थ रामदास स्वामीचे पूर्वज श्री. कृष्णाजीपंत ठोसर हे शके ८८४ साली बिदर प्रांतातून गोदातीरी वडगाव पांढरीवर आले येथे रखमाजी गवळी यांचा वाडा होता. त्यासमयी दशरथपंतास रखमाजी गवळी यांनी आपल्या वाड्याच्या बाजूला एक घर बांधून दिले व दशरथ पंतास राहण्याची विनंती केली. पुढे दसरथपंतानी वडगाव हे गाव अंबड प्रांतात असल्यामुळे तेथील देशमुख सरकारी अधिकाऱ्यांना भेटून, हुकुम मिळून त्यांनी त्याच भागात नवीन बारा गावांची वसाहत शके ९०५ सन इसवी सन ९८१ मध्ये केली. शके ९१० सन ९८८ साली दशरथपंताचे कुटुंब जांबला आले. एकूण बारा गावची वसाहत शके ९०५ सुभानु नाम सवत्सरी यावेळी केली.
त्या बारा
गावांची नावे पुढीलप्रमाणे : १) कौ जांब २ ( मौजे पांडेपोखरी ३) मौजे अंतरवाले ४) मौजे आसनगाव ५) मौजे आरगडे गव्हाण ६) मौजे निंबी ७) मौजे साकळगाव ८) मोजे हादगाव ९) मौजे सूरमेगाव १० ) मौजे साडेगाव गंगातीरी ११) मौजे पाटोदे १२) विरेगव्हाण

शके १४९९ सन १५७७ साली सध्याच्या जांब गावाची वस्ती केली. पूर्वीचे पांढरीवस्ती हे म्हणजे जांब समर्थ गावापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या गुना नाईक तांडा याच्या पश्चिमेला आनंदी नदीच्या काठावरती आहे. या ठिकाणी आता ओट्यावर श्रीमारुतीची दगडी मूर्ती असून शेतात सर्व ठिकाणी पांढरी माती पसरलेली दिसून येते.

” श्रीराम दर्शन व अनुग्रह ”

शके १५२६ प्रतिपदेच्या दिवशी गुढपाडवा पासून जांब येथे श्रीराम नवमी उत्सवाची सुरुवात झाली होती. जांब या गावी परंपरेप्रमाणे गुढीपाडवा ते श्रीराम नवमी उत्सव असा हा नित्य नेमाचा प्रतिवर्षी श्रीराम नवमी उत्सव साजरा होत असे. श्रीसूर्याजीपंताच्या मनामध्ये एक सारखा विचार येत होता की, आपणास श्रीरामनवमीच्या उत्सवांमध्ये आपणास प्रभू श्रीरामांचे दर्शन होणार असा वर प्राप्त झाला परंतु आतापर्यंत प्रभू श्रीरामाचे दर्शन होत नाही .
अशा विचारात असतानाच गावातील येसकर जोराने ओरडून म्हणाला गावाच्या वेशीवर, पारावर बोलविले आहे. येसकर पुन्हा एकदा जोराने ओरडुन बोललाच हाकिमाला फार जरुरी काम आहे, तुम्ही माझ्यासोबतच चला, असे म्हणता, ते समयी श्रीसूर्याजीपंत यांनी आपल्या चित्तास त्रास म्हणून ही वृत्ती नको, हे पांडेपण नको, म्हणून हातात दौत, लेखणी, रुमाल घेऊन श्रीमारुतीच्या देवालयाकडे निघाले, येसकराच्या रूपात श्रीमारुती पुढे, आपण मागे, श्रीमारुती पारापर्यंत गेले. तर पारावर दोन पठाण, यांचे रुंद पाठीशी तीर कमान, येसकरास बोलते झाले की, पांडे आले की, नाही? तेव्हा आले की, जी मायबाप असे म्हणून येसकर बाजूला थांबला व श्रीसूर्याजीपंत पारावर येऊन पाहतात तो हे नवे कोण ? आपला नित्यातील मोकाशी नाही, पाटील कोणी नाहीत. बरे श्रीमारुतीचे दर्शन करून मग यांच्याशी बोलू म्हणून देवालायात जाऊन श्रीमारुतीस साष्टांग नमस्कार करून उठत पाहतात, ते श्रीमारुती मंदिर परम दिव्य तेजाने भरले होते. त्या तेजाचे रूप डोळ्याने पहावेनासे झाले, यावेळी श्रीसूर्याजीपंत यांनी प्रत्यक्ष श्रीरामचंद्र, सीतामाता, श्रीलक्ष्मण, श्रीमारुतीसह पाहून वारं वार साष्टांग नमस्कार घालत होते व हात जोडुन, स्तुतिस्तवन करून, आनंदाश्रूने रोमांच उभे राहिले होते त्या आनंदास पारावार राहिला नाही. श्रीसूर्याजीपंतास प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले व श्रीराम पंचायतन यावेळी पूजा करण्याकरिता प्राप्त झाले. हे श्रीराम पंचायतन देववाडा अर्थातच आजचे श्रीराम मंदिर या ठिकाणी आपणास यामुर्ती पाहावयास मिळतात.

श्रीसूर्याजीपंत यांनी नित्यनेमाने भक्तीने आपल्या पत्नीसह या प्रभू श्रीरामचंद्र यांनी दिलेल्या मूर्तीची पूजा सुरू केली. व पुढे श्रीसूर्याजिपंता पासून आज पर्यत याच श्रीराम पंचायतन समोर श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा सुरू आहे.

श्रीसमर्थ रामदास म्हणजेच नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचा जन्म २४ मार्च १६०८ तथा चैत्रशुद्ध श्रीराम नवमी शके १५३० रोजी श्री रामनवमीच्या दिवशी जांब तथा सध्याचे जांबसमर्थ,

तालुका घनसावंगी जिल्हा. जालना येथे झाला.

श्रीसमर्थ रामदास हे महाराष्ट्रातील कवी व श्रीसमर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. श्रीसमर्थ रामदासांनी प्रभू श्रीरामचंद्र हनुमंताला आपले उपास्य दैवत मानून पूर्ण भारत देशात देव, देश, धर्म याबरोबरच समाजातील स्वधर्मनिष्ठा जागृत करण्यासाठी राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ प्रबोधन व संघटन करण्यासाठी समाजाला बलस्थान निर्माण करण्यासाठी कार्य केले.
जांब समर्थ येथील काही ठळक घटना:-

शके १५२७ साली (सन १६०५ ) ज्येष्ठ पुत्र गंगाधर तथा रामीरामदास यांचा जन्म. दिनांक २४ मार्च १६०८, शके १५३० शुद्ध श्रीराम नवमीच्या दिवशी नारायणाचा जन्म झाला ” येथेच अंधाऱ्या खोलीत बसून आईला “चिंता करीतो विश्वाची”…. हे उत्स्फूर्तपणे आलेले बोल ऐकविले. श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांनी याच ठिकाणी “भक्तिरहस्य” व “सुगमोपाय” हे सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिले. शके १५६६ (सन १६४४) साली याच श्रीसमर्थ मंदिर च्या जागी असलेल्या घरी आईस दिव्यदृष्टी दिली. शके १५६६ (सन १६४४) साली याच श्रीसमर्थ मंदिर च्या जागी असलेल्या घरी आईस कपिलगीता सांगितली. श्रीसमर्थ रामदास स्वामी दुसऱ्यांदा शके १५७७ (सन १६५५) जेष्ठ शुद्ध तृतीयेच्या दिवशी जांबला राणुबाई अत्यावस्थ होत्या त्यावेळी फार आतुरतेने व आर्ततेने राणुमातेच्या अंतिम दर्शनासाठी जांबला आलेले होते. श्रीसमर्थ मंदिराचे बांधकाम सन १९२७ साली धुळ्याचे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी सुरु केले. सन १९३२ साली पूर्णपणे श्रीसमर्थ मंदिर उभे केले.

श्रीराम मंदिरातील ठळक वैशिष्ट्ये :-

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे ठोसर घराण्याचे पूजा घर म्हणजेच आजचे श्रीराम मंदिर आहे. यामध्ये श्रीराम प्रभू, सीतामाता लक्ष्मण व हनुमंतरायांची मूर्ती आहे. याठिकाणी सितामाता उजव्या बाजूला आहेत. म्हणून येथे नवीन लग्न झालेल्या जोडप्यां पैकी पतीला पहिले पत्नीचे दर्शन घ्यावे लागते. या पूजा घरातील श्रीराम मंदिरातील हनुमंतरायांची मूर्ती श्रीसमर्थ भिक्षा मागत असतांना आपल्या दंडावर बांधत व भिक्षा मागत. या पूजा घरातील श्रीराम मंदिरातील हनुमंतरायांची एक मूर्ती समर्थ आपल्या झोळी मध्ये ठेऊन भिक्षा मागत. श्रीराम मंदिर म्हणजे देववाडा येथे श्रीसमर्थांच्या हातची तुपाची घागर एक अमूल्य आठवण आहे. एकदा उत्सवाचेवेळी (श्रीरामनवमी) पंक्तीत तूप कमी पडले तेंव्हा बाजूच्या विहिरीतून घागरभर पाणी काढून तेच तूप म्हणून वाढले. ती घागर अद्याप जांबच्या श्रीराम मंदिरात पहावयास मिळते. श्रीराम मंदिर मध्येच एकदम समोरच श्रीदास मारुती व पाठीला लागूनच श्रीगणपतीची मूर्ती आहे.

आजचा दिव्य क्षण :-

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे याच पुण्य ठिकाणी आज परत एकदा श्रीराम मंदिरातील पूजा घरातील श्रीराम प्रभू, सीतामाता , लक्ष्मण व हनुमंतरायांची, श्रीराम मंदिरातील मृतींचा ऐतिहासिक पुनप्राणप्रतिष्टा सोहळा पहाता येणार आहे.
या ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील मूर्ती दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी चोरी झालेल्या होत्या. पोलिस अधीक्षक व सर्व पोलीस अधिकारी मंडळीच्या अथक प्रयत्न करून या मूर्ती परत एकदा दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री क्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील श्रीराम मंदिरात पूनरप्रतिष्टित होत आहेत. ही घटना श्रीराम भक्तांकरिता अनमोल आहे.

डॉ. भाऊसाहेब सोनाजी देवकर(श्रीक्षेत्र जांबसमर्थ)

संत रामदास कला महाविद्यालय, घनसावंगी

Email bhausdevkar@gmail.com

****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button