माझ्याच मुलीने खून केला; आईने कबूली देऊन पोलीस ठाण्यात दिली तक्रार! खून का केला पोलिसांना शोधावे लागणार दोन महिन्यात उत्तर
जालना -आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालन्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली ती म्हणजे साडेपाच वर्षाच्या ईश्वरी रमेश भोसले या मुलीचा बाथरूम मध्ये खून केल्याची. परंतु हा खून कोणी केला? कशासाठी केला याविषयी मात्र तर्कवितर्क लावले जाऊ लागले ?प्रथमदर्शनी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर लगेचच खून कोणी केला हे त्यांच्या लक्षात आले होते, मात्र तपास अर्धवट असल्यामुळे आणि तक्रारही न आल्यामुळे याविषयी त्यांनी गुप्तता पाळली. दरम्यान सर्व माहिती घेतल्यानंतर मृत ईश्वरीची काकू मीरा गणेश भोसले वय 34 वर्ष यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार मीरा गणेश भोसले या मूळच्या घनसांवगी तालुक्यातील गुंज येथील रहिवासी आहेत. सध्या त्या चौधरी नगर येथील भालेराव यांच्या निवासस्थानी घर भाड्याने घेऊन राहतात. त्यांच्यासोबत त्यांचे पती गणेश भोसले, एक 14 वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा तसेच त्यांचे गुंज येथे शेती करणारे दीर रमेश यांची मुलगी ईश्वरी ही देखील शिक्षणासाठी आहे.
दरम्यान गणेश भोसले यांची कुंभार पिंपळगाव येथे पॅथॉलॉजी असल्यामुळे तेच जाणे -येणे करतात. त्यांची दोन्ही मुले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये तर ईश्वरी ही स्वरूप इंग्लिश स्कूल चौधरी नगर येथे सीनियर केजी मध्ये शिकत आहे. गणेश भोसले हे काही कामानिमित्त कोल्हापूर येथे गेलेले आहेत. त्यामुळे मीरा यांची बहीण कावेरी सखाराम शिंदे व त्यांची मुलगी अनुजा हे सध्या इथे राहत आहेत. आज दिनांक 28 रोजी मीरा यांची 14 वर्षाची मुलगी आवरून शाळेत जाण्याची तयारी करत असताना बाथरूम मध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ ईश्वरी देखील बाथरूम मध्ये गेली संडास आणि बाथरूम एकत्रच आहेत. काही वेळातच ईश्वरीचा बाथरूम मध्ये जोरजोरात रडण्याचा आवाज आला. त्यामुळे पाहुणे म्हणून आलेली अनुजा ही धावत -धावत बाथरूम जवळ गेली परंतु बाथरूमच्या दरवाजा आत मधून बंद होता. वारंवार आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही, याचवेळी त्यांच्या शेजारीच राहणारे सचिन दिनकर तिखनडे व त्यांच्या पत्नी धावत आल्या. त्यांनी देखील दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिले परंतु दरवाजा न उघडल्याने मीरा यांनी शेवटी तुझ्या पप्पांना फोन लावू का ?असे म्हटल्यानंतर त्यांच्या मुलीने दरवाजा उघडला त्यावेळी ईश्वरी खाली पडलेली दिसली आणि तिच्या गळ्यावर ,चेहऱ्यावर, ब्लेडने वार केल्याचेही दिसले. तिच्या अंगातून रक्तस्त्राव होत होता, आणि वार करणाऱ्या. मुलीच्या बोटाला ही जखम झालेली दिसली. सचिन तीखंडे यांनी ईश्वरीला उचलून जवळच असलेल्या संतकृपा हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ईश्वरीला मृत घोषित केले.
हा सर्व प्रकार मीरा गणेश भोसले त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांनी स्वतः मीरा भोसले यांनी आणि शेजाऱ्यांनी पाहिलेला असल्यामुळे आपल्याच मुलीने ईश्वरीला ठार मारले आहे अशी तक्रार स्वतः मीरा गणेश भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
* पुढे काय होणार?*
साडेपाच वर्षाच्या मुलीचा खून करणारी व्यक्ती ही एक विधी संघर्ष बालक आहे त्यामुळे तिला बाल सुधार गृहात पाठविले जाईल. आणि तिच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार जर त्यांनी नियमानुसार मुलीला घरी आणण्यासाठी बाल सुधार गृहाकडे अर्ज केला तर तिला घरी सोडल्या जाईल. परंतु हे सर्व करत असताना या विधी संघर्ष बालकाने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नाचे उत्तर पुढील दोन महिन्यांमध्ये पोलिसांना शोधावे लागणार आहे. याचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वडते यांना लावावा लागणार आहे. आज या बालिकेला प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते मात्र तपासात काहीच पुढे आले नाही.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com