समाजाला दिशा देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले- प्रा. बी. वाय. कुलकर्णी
जालना-जगात जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली तेंव्हापासून सामाजिक न्यायावर काम होत आहे. लोकशाहीच्या विकासात सामाजिक न्यायाला फार महत्व आहे, सामाजिक न्यायासाठी लोकशाही कार्य करत असते. महत्त्वाचे म्हणजे समाजाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सामाजिक न्याय विभागामार्फत केले जाते, असे प्रतिपादन जे.ई. एस महाविदयालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. बी.वाय. कुलकर्णी यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समता पर्वनिमित्ताने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून प्रा. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेश अहीर हे होते. तसेच व्यासपीठावर समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले व जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांची उपस्थिती होती.
प्रा. कुलकर्णी म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून परिवर्तन झाले आहे. समाजातील सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्याय विभाग सतत कार्यरत आहे. समाजाला नवी दिशा देण्याचे काम हा विभाग करतोय. पत्रकारांनी सामाजिक न्यायासाठी नव्याने निर्माण झालेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तरे शोधायला हवीत, असे सांगून शहरातील चांगल्या गोष्टी या खेड्याकडे जात नसून केवळ वाईट गोष्टी या आजही खेड्यापर्यंत पोहोचत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाईट गोष्टींचा हा प्रवाह थांबविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीत समाजाच्या कल्याणासाठी पत्रकारांनी यापुढेही आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने लिखान करत राहावे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. अहीर म्हणाले की, न्याय हा फक्त श्रीमंतासाठीच आहे, हा गैरसमज दूर होण्यासाठी आणि सर्वसामान्यांनाही सहजपणे न्याय मिळावा याकरीता न्याय विभागाने यावर विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे न्याय आता सर्वांच्या आवाक्यात आलेला आहे. पत्रकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काय करते व या प्राधिकरणाचा उद्देश काय आहे, याची प्रसिध्दी वेळोवेळी आपल्या वर्तमानपत्राच्या अग्रभागी देवून याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री. देशमुख म्हणाले की, पुर्वीच्या व आजच्या पत्रकारितेत फार मोठा बदल झालेला आहे. वंचित लोकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहचविण्याकरीता पत्रकारांनी सातत्याने लेखन करणे गरजेचे आहे. स्त्रियांचे प्रश्न, अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पत्रकारांनी आपली लेखनी चालवून अनेकानेक प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून द्यावा. आजच्या संगणकाच्या काळातील प्रश्न समजून घेत सामाजिक न्यायाची भूमिका सफल करण्यासाठी लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले म्हणाले की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत संविधान दिन दि.26 नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दि.6 डिसेंबर 2022 या कालावधीत “समता पर्व” च्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातंर्गत पत्रकारांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते, तसेच पत्रकार हे आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सातत्याने करत असतात. तरी सामाजिक न्यायासाठी पत्रकारांनी विपूल प्रमाणात लेखन करत याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी मानले. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांचे संपादक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com