गोदावरी शिक्षण संस्था (गोंदी )सह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याचे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश

जालना-जि. प. चे तत्कालीन(सुमारे 12 वर्षापूर्वीचे) माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि गोदावरी शिक्षण संस्था गोंदी, तालुका अंबड या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचेआदेश, विभागीय शिक्षण उपसंचालक अ. सं. साबळे यांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी दिले आहेत. त्यासोबत पंधरा दिवसात हे गुन्हे दाखल करून केलेल्या कारवाईचा अहवाल ह सादर करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल गायकवाड धुपे, यांना दिले आहेत.
गोदावरी शिक्षण संस्था गोंदी, तालुका अंबड जिल्हा जालना संचलित सध्या जालना शहरात कुचरवटा येथे अकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळा आणि अंबड तालुक्यातील दर्गा पराडा येथे हाफिज सय्यद अलाउद्दीन उर्दू माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चालविल्या जाते. दरम्यान जालना शहरातील अकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळेच्या संदर्भात विविध प्रकरणांमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे सुनावण्या सुरू होत्या. त्या सुनावणी पैकीच दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी एक सुनावणी झाली. या सुनावणीनंतर हे आदेश काढण्यात आले आहेत.
जालना शहरातील कुचरवाटा येथे असलेल्या अक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळेशी निगडित हे आदेश आहेत. ही शाळा गोदावरी शिक्षण संस्था संचलित असल्यामुळे संस्था चालक ही यामध्ये जबाबदार आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी दिनांक 2 डिसेंबर2022 रोजी पत्र क्रमांक शिक्षण उपसंचालक औरंगाबाद/ सुनावणी निर्णय/ 2022- 23/ 93 51 अन्वये हे आदेश जारी केले आहेत. सुनावणीनंतर झालेल्या सातव्या निर्णयामध्ये असे म्हटले आहे की,” श्री आर. बी. गवळी तत्कालीन शिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद जालना यांनी एकापेक्षा जास्त वैयक्तिक मान्यता आदेश निर्गमित करणे, प्रस्ताव दाखल नसताना, संस्थेकडे अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नसताना, तसेच बिंदू नामावली नसताना, संस्थेने आरक्षण धोरणानुसार नियुक्त्या केलेल्या नसताना, आदेश निर्गमित करणे, खोटे व बनावट दस्तावेज तयार करणे ,एकदा हे मान्यता आदेश खोटे आहेत व नंतर तेच मान्यता आदेश खरे आहेत अशी विसंगत भूमिका घेऊन शिक्षणाधिकारी( माध्यमिक) कार्यालयाची दिशाभूल करणे इत्यादी प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे वर श्रीमती मंगल गायकवाड धुपे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांनी गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल पंधरा दिवसात या कार्यालयास सादर करावा.”
निर्णय क्रमांक आठ” संस्थेने अल्पसंख्यांक प्रमाणपत्र नसताना, तसेच बिंदू नामावली न ठेवता आरक्षण धोरणानुसार नियुक्त्या न करणे, शिक्षण विभागाकडून अवैध मार्गाने चुकीचे आणि एकापेक्षा जास्त वैयक्तिक मान्यता आदेश मिळविणे, पूर्वलक्षी प्रभावाने आदेश हस्तगत करणे, बनावट आदेश तयार करून शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेचा लाभ घेण्यासाठी शिक्षण विभागाची दिशाभूल केली असल्याने संबंधित संस्थेवर श्रीमती मंगल गायकवाड धुपे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद जालना यांनी गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल पंधरा दिवसात या कार्यालयास सादर करावा.”
दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या सुनावणीला माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल राजू गायकवाड धुपे, तत्कालीन शिक्षणाधिकारी आर. बी. गवळी, गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव अबरार सोहेल ताहेरमिया,अकरम फातेमाँ माध्यमिक कन्या विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती समीना पटेल, श्रीमती संध्या पवार, सहशिक्षक रावसाहेब पुंडलिक लटके, शिक्षण विभागाचे अधीक्षक मकरंद शेवलीकर, शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक पी .एम .जोगदंड यांची उपस्थिती होती. तर या शालेेेच्या मुख्याध्यापिका श्रीमती द्रोपती रामभाऊ लोखंडे या अनुपस्थित होत्या. दुसरी सुनावणी दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी झाली यावेळी या प्रकरणातील तक्रारदार मनीष भाले यांच्यासह पहिल्या सुनावणीच्या वेळी उपस्थित असलेले आर. बी. गवळी सोडून सर्वजण उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com