आधुनिक तंत्रज्ञानामुळे तुमचं तुम्हाला शिकावे लागेल त्यामुळे कसंआणि काय? शिकायचं ते ठरवा- महेंद्र सेठिया
जालना- ज्या शिक्षणामुळे आपण स्वावलंबी होऊ शकतो तेच खरं शिक्षण आहे .त्यासोबत आधुनिक काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे, त्यामुळे तुमचं शिक्षण तुम्हाला शिकावं लागेल, म्हणून ते कसं शिकायचं? ते ठरवा आणि हे शिकत असताना वेगळा विचार करायला शिका, विचार कौशल्य विकसित करा, भावनिक कौशल्य विकासित करा, असा मोलाचा सल्ला ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील शिक्षण तज्ञ महेंद्र सेठिया यांनी दिला .
जालना एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक 11 रोजी 190 विद्यार्थ्यांना 26 लाख 11 हजार 351 रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सेठिया या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी भूषण तथा खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजय अण्णा बोराडे, प्राध्यापक सुरेश लाहोटी, उद्योजक सुनील रायठा, यांची उपस्थिती होती. शिष्यवृत्ती वाटपाचे हे दुसरे वर्ष आहे.
समाजातील विविध दानशूर व्यक्तीकडून ही शिष्यवृत्ती जमा केल्या जाते आणि त्यांच्या नावानेच विद्यार्थ्यांना दिल्या जाते. त्यामुळे या शिष्यवृत्तीचे दाते आणि शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी हे देखील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते .
दरम्यान पुढे बोलताना महेंद्र सेठिया या म्हणाले,” आज ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे ती केवळ गुंतवणूक आहे आणि आपण केलेली गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पैशाच्या बदल्यात किमान इतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी का होईना थोडा वेळ काढला पाहिजे. दिलेल्या शिष्यवृत्ती चा मान ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांना सक्षम घडवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, आणि त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कसं शिकायचं? काय शिकायचं? त्यासोबत विचार कौशल्य आणि भावनिक कौशल्य हे देखील आवश्यक आहे. सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. माहिती कुठेही मिळते मात्र ती खात्रीशीर असेल याचा नेम नाही. त्यामुळे माहिती मिळवून त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया करता आली पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांना टिप्पणी काढता यायला पाहिजे, कमीत कमी शब्दात ,स्वतःच्या शब्दात ती मांडता आली पाहिजे. ही पद्धत कुठेही शिक्षणात शिकविल्या जात नाही मात्र ती आपण आपली विकसित केली पाहिजे. ज्याला हे कौशल्य कळेल तोच विद्यार्थी पुढे जाईल. त्यासोबत असं का? हा प्रश्न स्वतःलाच विचारून त्याची उत्तर देखील आपणच शोधली पाहिजेत. भावनिक कौशल्य देखील महत्त्वाच आहे. आपल्या स्वतःच्या भावनांची ओळख करून ती योग्य पद्धतीने व्यक्त करता येणे, आणि इतरांच्या भावना ओळखता येणे हे खूप गरजेचे आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर” न्यूट्रल” असणे हे अत्यंत धोकादायकआहे. उत्तर चुकलं तर हरकत नाही मात्र ते शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. आपल्या अंगात सर्व कलागुण असतात त्यातीलच मूलभूत कौशल्य, क्षमता, या काही बाबी आहेत त्यांचा जर विकास झाला नाही तर आपल्याला निराशा येते आणि त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने जातो. तसे होऊ नये म्हणून भविष्यात आपण आपलंच शिकायला पाहिजे आणि ते कसे शिकायचं हे आपणच ठरवलं पाहिजे” असे मतही शिक्षण तज्ञ महेंद्र सेठिया यांनी व्यक्त केले.
कृषिभूषण विजय अण्णा बोराडे म्हणाले, शहरात दात्यांची कमी नाही ,मात्र ते योग्य ठिकाणी जात असल्याची खात्री पटल्याशिवाय दाते देत नाहीत आणि आज एवढे दानशूर व्यक्ती इथे जमा झाले आहेत ते केवळ जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या विश्वासामुळेच जमा झाले आहेत. असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश लाहोटी यांनी केले. उपस्थितांचे आभार उद्योजक सुनीलभाई रायठा यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश केसापूरकर यांनी केले.
इयत्ता अकरावी साठी 51 विद्यार्थी, तंत्रनिकेतन साठी 76, अभियांत्रिकीसाठी 10, वाणिज्य शाखेसाठी एकोणावीस, वैद्यकीय शाखेसाठी सात, बी. फार्मसी चार, बीएस्सी नर्सिंग तीन, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी साठी पाच, बीएससी एग्रीकल्चर साठी दोन, आणि जालना एज्युकेशन फाउंडेशन कर्मचाऱ्यांसाठी तेरा अशा एकूण 190 विद्यार्थ्यांना आज 26 लाख 11 हजार 351 रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
** हे आहेत शिष्यवृत्तीचे दाते*
कलश सीड्स ,भाईश्री फाउंडेशन, राजेश देविदान परिवार, विजय कागलीवाल परिवार ,रामकिशनजी मुंदडा परिवार, शिवरतनजी मुंदडा परिवार ,विनोद लाहोटी, डॉक्टर महेंद्र करवा, एस. आर. जे. पित्ती ग्रुप, हंड्रेड सोशल ग्रुप, अलोक सुगंधचंदजी दुग्गड, जुगल मालपाणी, राजेश लाहोटी ,डॉक्टर शुभांगी दरक ,डॉक्टर विशाल पंजाबी, श्रीमती अरुणा राजेंद्र प्रसाद मिश्रा, विनोद राय इंजिनिअरिंग, कालिका स्टील.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com