आमंत्रण शिवसेनेचे गळाला लागले भाजपाच्या; समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाडगे पाटील भाजपामध्ये
घनसावंगी- “पाटील शिवसेनेत (शिंदे गटात) या!” असं खुलं आमंत्रण शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी घनसावंगी तालुक्यात असलेल्या समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश गाडगे पाटील यांना दिले होते.
गणेशोत्सवाच्या काळात गणेश फेस्टिवल साठी रात्री उशिरा कारखान्यावर हजेरी लावून माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांनी हे निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यावेळी “योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ” असे उत्तर देऊन घाडगे पाटील यांनी विषय टाळला होता.
शेवटी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घाडगे पाटलांच्या पॅनल मिळालेले यश पाहून भाजपाने जाळे टाकले आणि आत्तापर्यंत कोणत्याही पक्षाचा अधिकृत शिक्का नसलेल्या घाडगे पाटलांवर आता “भाजपाचे घाडगे पाटील” म्हणून शिक्का मोर्तब झाले आहे. त्यांच्या या राजकारणाच्या प्रवेशामुळे घनसावंगी मध्ये निश्चितच भाजपाला शक्तिमान उमेदवार मिळाला आहे. भाजपा त्यांना किती रसद पुरवेल हा नंतरचा विषय असला तरी सध्या घनसांवगी तालुक्यामध्ये सर्वेसर्वा असलेले माजी मंत्री राजेश टोपे यांचाच बोलबाला आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेचे उपनेते हिकमत उढान यांनी विधानसभेमध्ये श्री. टोपे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मात्र टोपेंच्या “ऊस”कारणापुढे ते दम मारू शकले नाहीत. तरीपण आमदार राजेश टोपे यांच्या नाकात मात्र त्यांनी निश्चितच दम आणला होता.
आता राजेश टोपेंना हिकमत उढान यांच्यासोबतच भाजपाचे सतीश घाडगे पाटील यांचाही सामना करावा लागणार. आहे कारण घनसांवगी तालुक्यामध्ये मताचे राजकारण करत असताना उसाचे राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही, आणि सतीश घाडगे पाटील हे देखील उसाच्या कारखानदारीतूनच उदयास येत असलेलं एक राजकीय नेतृत्व आहे .त्यामुळे हे नेतृत्व वाढवण्या मागे भाजपाची विधानसभेची तर तयारी नाही ना? अशी चर्चाही आता सुरू व्हायला लागली आहे.
*आडकीत्यात सुपारी* भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना सतीश गाडगे पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले. परंतु या दोन्ही नावांची वेगवेगळी गटबाजी आहे .त्यामुळे या दोघांच्या गटबाजी मध्ये नवीनच आलेल्या घाडगे पाटलांची आडकीत्यात सुपारी त्यात सुपारी होईल का?.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com