शेती विकून गावात शौचालये बांधणाऱ्या बाबासाहेब शेळके यांची निवड
जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब शेळके यांची राज्य ग्रामपंचायत श्रमिक संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश वैद्य यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र दिले आहे.
दरम्यान बाबासाहेब शेळके यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून डोमेगावच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वतःची दीड एकर शेती विकून गावात सुमारे सव्वाशे शौचालय बांधून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासोबत पर्यावरण जपण्यासाठी भावनिक साद घालत संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध प्रकारच्या झाडांची रोपेही महिला मंडळाला वाटप केली आहेत. ग्रामपंचायत कार्यालया भोवती रोपवाटिकाही तयार केली आहे. अशा विविध उपक्रमामुळे बाबासाहेब शेळके हे नेहमीच जनसंपर्कामध्ये असतात. त्याची दखल घेऊन ही निवड केली आहे. नियुक्तीपत्र देताना संघटनेचे डॉ. लक्ष्मण माने, मुंजाभाऊ भाले आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com