आता या पैकी कोण होणार जिल्हा आरोग्य अधिकारी?
जालना- जालना जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार हीच चर्चा जिल्हा परिषद आरोग्य वर्तुळात सुरू आहे.
दिनांक 15 ऑक्टोबर 2018 रोजी डॉ. खतगावकर यांनी जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर कोविड सुरू झाला. या कोविडच्या महामारी मध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मिळेल त्या दरात आरोग्य साहित्याची खरेदी केली. खरेदी केल्यानंतर हे साहित्य न वापरता ते धुळखात पडले. त्यासोबत या काळामध्ये महिला कर्मचाऱ्यांसोबत केलेले गैरवर्तनही त्यांच्या अंगाशी आले आहे. या सर्व प्रकरणामध्ये डॉ. खतगावकर यांना दोषी ठरवून बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी डॉ. खतगावकर यांना निलंबित करण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी डॉक्टर खतगावकर यांना निलंबित केले आहे.
दरम्यान खतगावकर यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार? हीच चर्चा काल दिवसभर जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये सुरू होती.
या पदासाठी तीन डॉक्टर्स पात्र आहेत त्यामध्ये जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती करण्यासाठी शासनाने जर जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार दिले तर श्रीमती वर्षा मीना या तिघांपैकी एकाची निवड करू शकतात किंवा आरोग्य संचालक हे थेट या नियुक्ती विषयी निर्णय घेऊ शकतात त्यामुळे आता जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com