Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

संक्रांतीचा गोडवा “घेवर- फेणीने” वाढवा. बडी सडकवर सजली घेवरची दुकाने

जालना- जालना शहर जसं उद्योजकांचं शहर आहे तसेच ते आता खवय्यांचंही शहर व्हायला लागलं आहे. मराठवाड्यामध्ये फक्त जालना शहरातच घेवर आणि फेण्यांची दुकाने संक्रांतीनिमित्त थाटली जातात. त्याचं कारण असं आहे की इथे मारवाडी समाज बांधवांचा मोठा समूह राहतो, आणि हे घेवर याच समाजात जास्त प्रचलित आहे. खरं तर हा पदार्थ मूळचा राजस्थानचा, मात्र या मारवाडी बांधवांमुळे तो आता जालना जिल्ह्यात सर्व परिचित व्हायला लागला आहे आणि इतर पक्वान्नाच्या यादीमध्ये घेवरचंही नाव यायला लागला आहे. फरक एवढाच आहे की हे घेवर संक्रांति निमित्त मोठ्या प्रमाणात विकल्या जाते, आणि त्याचे घेवर उपलब्ध होते. सध्या बडी सडक वर या घेवरची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. मारवाडी समाजामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी हे घेवर आणि फेण्यांची शिदोरी घेऊन जाण्याची पद्धत आहे. एक मिष्ठांन म्हणूनही समाज बांधव त्याला आवर्जून मुलीच्या सासरी घेऊन जातात. कदाचित संक्रांतीला केवळ तोंडातून “गोड- गोड” बोलण्याचे शब्द न काढता खऱ्या अर्थाने तोंड गोड करण्याचा हा एक प्रकार असावा.

 हे तयार करण्याची पद्धतही काही वेगळीच आहे. सामान्य माणसाला याची कृती जमत नाही, त्यासाठी तज्ञ माणूसच लागतो आणि विशेष करून हे तयार करण्यासाठी राजस्थान वरून आचारी बोलावले जातात. मैदा, तूप, तेल ,साखरेचा पाक, आणि किंचित लिंबू असं या घेवरच्या कृतीचे साहित्य आहे. एका मोठ्या कढईमध्ये तुपात हळूहळू आकार वाढवत नेल्यानंतर एकदाच चार घेवर तयार होतात. त्यानंतर या घेवरला साखरेच्या पाकामध्ये भिजवले जाते. हे झाले गोडघेवर, मात्र ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी साधे घेवर पण उपलब्ध आहे खवय्यांच्या जिभेचे लाड पुरविण्यासाठी या घेवर मध्ये आता बदल केल्या गेले आहेत आणि चांगल्या तुपातील त्यासोबत सुकामेवा आच्छादित घेवर देखील बाजारामध्ये उपलब्ध झाले आहे. त्यामुळे “जो जे वांछील तोते लाहो” असे हे घेवर सुंदर आकर्षक केसरी रंगांमध्ये सामान्य ग्राहकांना आकर्षित करीत आहे. या घेवर सोबतच फेण्या हा एक प्रकार आवर्जून विकला जातो. परंतु या फेण्या जालन्यात न तयार होता हैदराबादीतून आयात केल्या जातात. त्यांची देखील कृती थोडीशी अशीच आहे. ज्यांना गोड हव्या आहेत त्यांना त्या तयार मिळतात आणि ज्यांना मधुमेह आहे अशा खवय्यांसाठी बिना साखरेच्या देखील इथे मिळतात.

 

कधीही केव्हाही पाच मिनिटात तयार होणारा हा खाद्यपदार्थ अनेक दिवस टिकून राहतो. घेवर आणि फेण्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे किलोचे दर ठरलेले आहेत सुमारे 300 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत हे दर आहेत.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button