मधुबन हॉटेलच्या जेवणात निघाला शिजलेला पूर्ण उंदीर
जालना- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात शुद्ध शाकाहारी नावाने परिचित असलेल्या हॉटेल मधुबन मध्ये आज दिनांक 30 रोजी जेवणाच्या ताटामध्ये आलेल्या भाजीत शिजलेला पूर्ण उंदीर निघाल्यामुळे ग्राहकांची तब्येत खालावली आहे.
जालना तालुक्यातील सेवली येथील रहिवासी असलेले श्री. सुरेश राका हे आज त्यांच्या मित्रासह जालना शहरात कामानिमित्त आले होते आणि दुपारच्या वेळी शुद्ध शाकाहारी हॉटेल म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात असलेल्या मधुबन हॉटेल येथे जेवणासाठी गेले. त्यांनी जेवणाची दोन ताटे मागितली ताट पुढे आल्यानंतर जेवणही सुरू झाले,मात्र राका यांचा मित्र शुभम अक्कर जेवत असताना वांग्याची भाजी खाऊ लागला त्यावेळी त्या वाटीमध्ये एक पूर्ण उंदीर शिजलेल्या अवस्थेमध्ये निघाला. त्यामुळे या किळस येणाऱ्या प्रकाराने त्याला मळमळ ही झाली. दरम्यान या प्रकरणावर पडदा घालण्यासाठी हॉटेलचे मालक श्री. राव यांनी राका यांची बरीच विनवणी केली. भोजन कक्षाच्या एका कोपऱ्यामध्ये नेऊन राका यांच्यासोबत बोलत असताना हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांनी या वाटीमधील उंदीर उचलून नेला.
त्यामुळे राका अधिकच संतप्त झाले. आणि ते आपल्या मतावर ठाम राहिले. जर कोणी ही भाजी खाल्ली तरच आपण तक्रार करण्याचे मागे घेऊ असा पवित्र त्यांनी घेतला त्यामुळे अनेक जणांनी राका यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी आल्यानंतरच त्यांच्या समक्ष तक्रार देऊन पुढील कारवाई सुरू झाली आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com