रणरागिणी; दहा वर्षांपूर्वीची माझ्या नावाने च्याव-च्याव करणारी लोकं आता आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! “आर्थिक” “बचत” “गट” करून ” विकास”- सौ.शर्मिला जिगे
जालना- उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दहा वर्षांपूर्वी भेट कार्ड( व्हिजिटिंग कार्ड ) छापल्यानंतर मला नावं ठेवणारी लोकं आज आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! हे केवळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवल्यामुळेच शक्य झालं आहे. एवढेच नव्हे तर माझ्या प्रगती सोबतच अनेक महिलांना देखील रोजगार मिळाला आहे. घर परिवार चालवत सरासरी सहा ते सात हजार रुपये महिना आज त्या कमवतात. दिवसेंदिवस वाढत जाणारा हा कामाचा व्याप हा आनंददायी आहे. यामुळे ताणतणाव न येता मिळत जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे आणखीनच उत्साह वाढतो. हा उत्साह कायम ठेवण्यासाठी 11 महिने काम आणि एक महिना पंढरीची वारी असे नियोजन ठरलेले आहे. वारीमध्ये गेल्यानंतर धुवन निघाल्यासारखे वाटते. असे मत मठ पिंपळगाव येथील माऊली बचत गटाच्या संचालिका सौ .शर्मिला जिगे यांनी व्यक्त केलं आहे.edtv news नवरात्रोत्सवच्या “रणरागिनी 2023” या विशेष उपक्रमात त्या नववे पुष्प गुच्छ गुंफतांना बोलत होत्या.
edtv news” रणरागिनी 2023″ रविवारपासून रोज सकाळी 7 वा. सुरू झाली आहे .रुबाब दाखविण्यासाठी कोण झाली पोलीस,कोणाला आवडते लाल गोड सेव,कोणती युवती झाली कीर्तनकार,…बरंच कांही.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत सन 2013 मध्ये माऊली बचत गट मठ पिंपळगाव येथे या कामाला सुरुवात झाली .बचत गटाच्या व्यवस्थापिका नीता कोठोडे आणि संयोजिका प्रभा मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालं. त्यावेळी सुरुवातीला तीन हजार रुपये घेऊन सौ. जिगे यांनी शेळीपालन सुरू केले .पाहता पाहता हा व्यवसाय 200 शेळ्यापर्यंत पोहोचला आणि मग कामातील अनुभव मिळणारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन पाहून हळूहळू आंब्याचे ,मिरचीचे लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी अशा घरगुती वापरासाठी असलेल्या पदार्थांचे उत्पादन सुरू झाले. परिसरातील महिलांना एकत्र केल्या गेले आणि या बचत गटाच्या माध्यमातून सुमारे 10 टन लिंबाचे लोणचे आत्तापर्यंत विक्री झाले आहे. याच व्यवसायाच्या जोडीला हंगामाप्रमाणे विविध प्रकारच्या डाळींचे उत्पादनही सुरू केल्या गेले आहे. त्यामुळे महिलांना बाराही महिने कांही ना कांहीतरी रोजगार उपलब्ध होतो ,आणि वर्षभरात सरासरी घर काम करत या महिला सहा ते सात हजार रुपये महिना कमवतात.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी छापलेल्या भेट भेटकार्डमुळे सर्वत्र च्याव-च्याव सुरू झाली, मला नाव ठेवत मागे ओढण्याचाही प्रयत्न केला गेला, विशेष म्हणजे हे सर्व माझ्या जवळच्या नातेवाईकांनीच केलं .परंतु त्यांच्या या च्याव- च्यावकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवलं. परंतु आज तेच नातेवाईक आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत. वाढत जाणारा व्यवसाय त्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रोत्साहन पाहता कुठलाही ताण-तणाव येत नाही. उलट उत्साहाने काम वाढत जात आहे .हा उत्साह कायम ठेवण्यासाठी वारकरी संप्रदायाची मदत घेऊन भजन, भारुड, अभंग, म्हणत तो कायम ठेवल्या जातो. एवढेच नव्हे तर 11 महिने काम केल्यानंतर एक महिना पंढरपूरच्या वारीत जाऊन पुन्हा पुढील अकरा वर्षासाठी ऊर्जा मिळविले जाते .वारीत गेले की कसे, स्वच्छ धुऊन निघाल्यासारखे वाटते ,असा अनुभव देखील सांगितला आहे. पूर्वी महिलांना घराबाहेर पडताना अनेक बंधने होती घरच्यांचा धाक होता, आता या दोन्ही गोष्टी राहिल्या नाहीत परंतु युवती आणि महिलांनी मनाचा धाक ठेवून योग्य पाऊल टाकावे असा सल्लाही सौ. शर्मिला जिगे यांनी दिला आहे