1.
Jalna Districtजालना जिल्हादिवाळी अंक

EDTV NEWS अंकुर दिवाळी अंक-2023

        ‘अंकूर ‘ दिवाळी अंक : वर्ष तिसरे

—मुख्य संपादिका,सौ.मेधा दिलीप पोहनेरकर—

*****************************************
चला माणूस शोधूया !

———सुहास सदाव्रते ,मानद संपादक————
दिवाळी म्हणजे ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशाचा सण असतो. सध्याचे जग हे अत्याधुनिकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे हायटेक बनले आहे. इथे संवाद प्रत्यक्ष न होता तंत्रज्ञानावर आधारित भावनांनी होतो…इथे ‘इमोजी’ उदंड आहेत,पण मनातील भावनेचा ओलावा हरवत चालला एवढे मात्र नक्कीच!.. माणूस माणसाच्या जसा तंत्रज्ञानाने जवळ आला तसा ‘ मनाने ‘ एकाकी अन दूर होत असल्याचे दिसून येते. सण उत्सव साजरा करताना मनामनातील असे विचारांचे दीप पेटवूया!, जिथे माणूस हरवला जाणार नाही,याचा प्रत्येकात विश्वास निर्माण होईल,अशा वाटेने नवे प्रकाशाचे दीप उजळूया !!..

यासाठी साहित्य, कला,संगीत अशा माध्यमातून आपणाला सूर सापडतो…एक शतक एक दशकापेक्षा अधिक काळापासून ज्या माध्यमातून आयुष्याचा सूर सापडायला लागला तो महत्वाचा घटक म्हणजे मराठी दिवाळी अंक होय…
कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक मिळवून देणारा हा दुवा…मराठी दिवाळी अंकाची परंपरा एक शतक एक दशकाहून अधिक पुढे आली आहे.ब्रिटीशांनी भारतात जेव्हा मुद्रणकला आणली तेव्हापासून लिखित साहित्य पुढे आले.बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा आहे.या दरम्यान विशेष अंक काढण्याची परंपरा आहे.बंगालमधील या परंपरेने तत्कालीन ‘ मनोरंजन ‘ मासिक चालविणारे काशिनाथ माजगावकर यांचे लक्ष वेधले. माजगावकर यांनी तो अंक पाहिला,आणि त्यावरून मराठी असाच अंक काढावा असा विचार मनात आला.बंगाली ‘ मित्र ‘ आडनावाचे मित्र असल्याने माजगावकर यांनी ‘ मित्र ‘ हे आडनाव स्वीकारले..यातूनच मराठी दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मनोरंजन मासिकाने १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक काढला.अडीचशे पानांच्या अंकात नामदार गोपाळ कृष्ण गोखले,साहित्य सम्राट न.चिं.केळकर,र.पु.परांजपे, रेव्हरंड ना.वा.टिळक,बालकवी यांच्यासह अनेक कवी लेखकाचे साहित्य होते. मराठी साहित्य जनमाणसात पुढे आणत ते समृद्ध करण्याचे काम दरवर्षी दिवाळी अंक करतात. दिवाळी अंकाची ११३ वर्षाची परंपरा आजही सुरु आहे. काळानुसार टप्पे,प्रकार,साहित्य आणि अंकाचे छपाई तंत्रज्ञान बदलत गेले. ऐंशीच्या दशकानंतर संगणक आले आणि दिवाळी अंकाचा चेहरा बदलला.कृष्ण धवल ते हायटेक फोरकलर,मल्टीकलर असा प्रवास आहे. दिवाळी अंकात ‘ मौज ‘ अंकाचा सिंहाचा वाटा आहे.नव्वद वर्षाच्या पुढे वाटचाल करीत आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ दिवाळी अंकाने महाराष्ट्रात वैचारिक वाचनसंस्कृती रुजविली आहे. आजही ‘ साधना’ परंपरा टिकून आहे,हे विशेष. दिवाळी अंकाचे शेकडो विषय असताना, विनोदी साहित्यावरील विशेष दिवाळी अंक ‘ आवाज ‘ ची परंपरा आजही आहेच. मराठीत आजच्या घडीला पाचशेहून अधिक दिवाळी अंक निघतात. आज साहित्य, कला,संस्कृती,वैद्यकीय, विनोदी,महिला विषयक,राशी भविष्य, आरोग्य, क्रीडा,संगीत,चित्रपट, कृषीसह अनेक विषयानुसार दिवाळी अंक निघतात.मराठी दिवाळी अंकात वेगळे स्थान निर्माण केले ते ‘ विश्रांती ‘ दिवाळी अंकाने. विषयाची वैविध्यपूर्णता ही या दिवाळी अंकाची ओळख.
दोन तीन वर्षापासून
दिवाळी अंकाची दिशा बदलली आहे. आजच्या घडीला डिजिटल प्लॅटफॉर्म हा नवा बदल दिवाळी अंकात दिसून येत आहे. दिवाळी अंकाचे नवे रूप धारण केले आहे.जालन्यातून पहिल्यांदाच डिजीटल प्लॅटफॉर्मवरील दिवाळी अंक काढण्याच्या नवीन पद्धतीला सौ. मेधा दिलीप पोहनेरकर यांनी सुरुवात केली,हे विशेष.यंदाचा तिसरा डिजिटल दिवाळी आपल्या हाती,देताना आम्हांला आनंद होत आहे !…

यंदाच्या डिजिटल दिवाळी अंकाचे विशेष असे,की मागील महिन्यात नगर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा संवेदनशील लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अशा घटनेनंतर पुन्हा नव्या धैर्याने सावरत ‘ मी अजून जहाज सोडले नाही’ असा आत्मविश्वास हेरंब सर व्यक्त करतात. या अंकात असे अनुभव कथन जाणीवपूर्वक आम्ही देत आहोत. डिजिटल दिवाळी अंकात पुणे येथील साहित्यिक अरुण देशपांडे यांची लघुकथा, आरती सदाव्रते यांची ‘ चिमुरडीची डोळस दृष्टी’ ही लघुकथा तर साहित्यिक प्रा.पंढरीनाथ सारके यांची ‘ मातीशी नातं ‘ सांगणारी कथा आहे. डिजिटल दिवाळी अंकात ‘ कविता मला भेटली ‘ या सदरात कवी- गझलकार सुनील लोणकर, कवी दिगंबर दाते, आकाश देशमुख, गोपाल तुपकर, शिवनंदा मेहेत्रे यांच्या समकालाचे वास्तव परिस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या कविता आहेत. डिजिटल दिवाळी अंकात
लोककला,लोकपरंपरा साता समुद्रापार नेणारा युवा शाहीर रामानंद उगले,
तीन उद्योग- व्यवसायात नव्याने
मार्ग शोधणारा पार्थ लिंगायत, शिक्षणाबरोबर गायन,वादनाची कला अंगी बाळगणारी आर्या गजानन गोंदीकर या युवामंडळीची विशेष मुलाखत वाचकांना निश्चित पसंत पडेल.

वाचक,रसिकांना edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजीटल) चा ‘ अंकूर ‘ डिजिटल तिसरा दिवाळी अंक पसंत पडेल,अशा अपेक्षेसह दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..

विशेष अनुभव कथन,जहाज न सोडणारा कर्णधार…

मागील महिन्यात नगर शहरात संवेदनशील लेखक,सामाजिक
कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर युवकांनी जीवघेणा हल्ला केला. दोन दिवसांनी महाराष्ट्राला ही घटना माहिती झाली,ती प्रतिमा वहिनी यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट मुळेच..नंतर शासन अन पोलिसांना जाग आली,दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी केली…जीवघेण्या हल्ल्यातून बाहेर येताना हेरंब सरांमधील सच्चा
कार्यकर्ता ‘आतील आवाज’ अधिक खंबीर झाल्याचा प्रत्यय आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्यांना आला…
विशेष लेखात लेखक हेरंब कुलकर्णी यांचे सदर घटनेचे अनुभव कथन वाचकांसाठी विशेष करून देत आहोत…- सुहास सदाव्रते

प्राणघातक हल्ल्यातून बाहेर येताना !

                 –हेरंब कुलकर्णी८२०८५८९१९५

मागील महिन्यात माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला.आजारी असल्याने गाडी चालवता येत नव्हती म्हणून मित्राच्या गाडीच्या पाठीमागे बसून शाळेतून येत होतो. अचानक आलेल्या गुंड तरुणांनी गाडी अडवून माझ्या दोन्ही पायावर, हातावर, पाठीवर आणि वाईट म्हणजे डोक्यात स्टीलच्या रॉडने मारहाण केली. गाडी चालवणारा मित्र सुनिल कुलकर्णी याच्याही हातावर पायावर बेदम मार बसला.एकटा असतो तर मला कोणी उचलले असते ? कारण बघे कडेला असून कोणीही मध्ये आले नाही,तसेच आम्ही दोघे दवाखान्यात गेलो. तिथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली.पोलिसांनी खूप वेळ म्हणजे ४ तास बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी नुसत्या पंचनामा साठी २ तास …अशा जखमी स्थितीत हे सहन केले. कुटुंबीय घाबरतात, शाळेतील विद्यार्थी पालक सराना मारले म्हणून घाबरतील म्हणून मुद्दामच घटना जाहीर केली नाही. पोलीस केस पाठपुरावा करू असे ठरवले.
दोन दिवस गप्प राहिलो.पण जवळच्या मित्रांना कळताच सारेच संतापले.त्या सर्वांनी एकत्र येऊन माझ्या घरी बैठक घेतली व थेट एसपी ऑफिसला जाऊन त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला, मुख्यमंत्री यांनी मलाही फोन केला आणि क्षणात चित्र बदलले.
पोलीस एसपी थेट घरी आले. ज्या पोलीस स्टेशन ला मला ४ तास बसवले ते पोलीस सतत घरी येत राहिले. दारापुढे पूर्णवेळ पोलीस आले आणि उलट तुम्ही असे आहात हे आधीच आम्हाला का नाही सांगितले..? ही तक्रार…आणि तुम्ही विशेष असाल तरच आम्ही लवकर दखल घेतो ही कबुली.
मग त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे घरी आल्या.अनेक वर्षांचा स्नेह असल्याने त्यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी माझ्या घरातच पत्रकार परिषद घेतली.मग पोलिसांवर दडपण वाढले. उपसभापती नीलम गोऱ्हेनी पत्र पाठवले. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन दिले.शालिनीताई विखे, आमदार संग्राम जगताप असे अनेक नेते एस पी शी बोलले आणि आरोपी त्यानंतर एक दिवसात अटक झाले..
या वेदनेत हे समाधान आहे, की समाजात अजूनही कार्यकर्त्यांबद्दल खूप आदर आहे. जिव्हाळा आहे. नगरला येऊन मला फक्त ३ महिने झाले पण किमान ३ दिवसात ८०० माणसे भेटून गेले. किमान १५०० फोन आले. त्यात शहरातील सर्व राजकीय पक्ष नेते, नगरसेवक सामाजिक संघटना आणि सामान्य अनोळखी कितीतरी माणसे… अहमदनगर मधील आमचे सर्व कार्यकर्ते ढालीसारखे माझ्यासाठी उभे राहिले.माझी संस्था हिंद सेवा मंडळ, माझे सर्व शिक्षक माझ्यासोबत ठाम राहिले.विश्वंभर चौधरी यांच्यासह नाशिक, जालना,पुणे, संभाजीनगर,शिरूर अकोले अशा अनेक ठिकाणाहून लोक आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर रुपाली चाकणकर, मेधा पाटकर,बाळासाहेब थोरात, विनोद तावडे, भालचंद्र कांगो,यशोमती ठाकूर,वसंत पुरके अशा अनेक मान्यवरांनी फोन केले. यातून एकटेपण वाटले नाही..याने अजून धैर्य आले. कार्यकर्ता एकटा नसतो हे अनुभवता आले. अनेक शहरात लोकांनी निवेदने दिली.शारीरिक मारहाण होणे दुःखदायक असते. अपमानकारक असते. जखमेच्या वेदना असतात पण माझेच मला विशेष वाटले की मी इतका अशक्त असूनही मी शांत होतो. उलट खाली पडल्यावर मी गाडीचा नंबर लक्षात ठेव असे सांगत होतो. किंचितही भीती वाटली नाही. मनोधैर्य कायम राहिले.
अस्वस्थ याने आहे, की इतक्या छोट्या कारणाने इतक्या टोकाचे पाऊल लोक का उचलत असतील ? शाळेपासून १०० मीटर तंबाखू टपरी नसावी असे आदेश असताना त्याची अंमलबजावणी म्हणून माझ्या शाळेशेजारी असलेली एक ४६ वर्षे जुनी पानटपरी मी महापालिकेला पत्र देऊन हलवतो आणि आमची टपरी का हलवली ? म्हणून ते सुपारी देतात..हे किती भीषण आहे ? आपल्या शाळेचा परिसर तंबाखूमुक्त असावा असे सुध्दा शाळेने म्हणायचे नाही ? इतकी दादागिरी असावी ? दुसरी वाईट गोष्ट म्हणजे ही सुपारी फक्त १५ हजार रुपयांची आहे म्हणजे ५ आरोपी असल्याने प्रत्येकी ३ हजार रुपयांची..इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते…? अवघ्या ३ हजारात एखादा तरुण एका अनोळखी माणसाचा जीव घ्यायला तयार होतो ? त्याचे परिणाम काय होतील ? याचा विचार ही करत नाही ? आपले करियर उध्वस्त होईल.याचे कोणतेही भान का नसावे ?
तरुणाईत हिंसेची ही सहजता किती चिंताजनक आहे ? हातात कोयते, रॉड पेन किंवा संगणक न येता सहजपणे येत आहेत ? या पिढीला संवेदनशील कसे बनवायचे ?आणि आपली मोठी शहरे किती बकाल होत आहेत. भर दुपारी १२ वाजता तरुण उठून कोणालाही मारून येतात कारण कोणीही आपले कोणीही बिघडवणार नाही याची त्यांना खात्री झाली आहे. आपले प्रिय नेते आपल्याला वाचवतील याचे वचन आणि कवच त्यांना आहे.माझ्या अकोले तालुक्यात आम्ही अनेक बालविवाह थांबवले . अनेक दारू दुकाने बंद केली. भ्रष्टाचार तक्रारी केल्या. तडीपार करण्याची मागणी केली.शाळेच्या दारू दुकानाविरुध्द आंदोलन केले पण कोणीही कधीही हात लावला नाही शिवीगाळ नाही आणि इथे शहरी भागात नुसते टपरी काढण्याची तक्रार केली तर थेट जीवघेणा हल्ला….आपली शहरे किती बेताल आणि गुंडगिरी अड्डे होत आहेत..कोण कशाला विरोध करील ? रस्ता नीट झाला नाही, अतिक्रमण केले तर नागरिक गप्प राहतात याचे कारण भेकडपणा आहे पण ही भीतीही आहे.शहरी भागातील राजकारण आणि गुंडगिरी हातात हात घालून पुढे जात आहे आणि तरुणाई त्याचे साधन म्हणून वापरले जात आहेत. जागा रिकाम्या करून घेणे, दहशत पसरवणे याला हे तरुण मुले लागतात. सुसाट वेगाने टीबल सीट गाडी चालवणे हे या युवा कार्यकर्त्यांचे आकर्षण आहे…..
आम्ही विवेकी संवेदनशील तरुण घडवू शकलो नाही..हे शिक्षक म्हणून मला आमच्या शिक्षणाचे आणि मुलांवर लक्ष न ठेवणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचे अपयश मला वाटते…जखमी झाल्यावर अंतर्मुख होताना हे सारे मनात येते आहे.. शिक्षणव्यवस्था घटक म्हणून अपराधी ही वाटते आहे..हे आम्ही काय घडवले आहे..?समाधान फक्त हे की इतका मार खाऊन मी किंचितही घाबरलो नाही.मनावर ओरखडा ही नाही. आचार्य अत्रे यांच्यावर पुण्यात हल्ला झाला
तेव्हा ते मला म्हणाले ” मला मारणारे मेले,मी जिवंत आहे..” हीच माझी भावना आहे.आज मी पुन्हा कामाला सज्ज आहे.याचे कारण अब्राहम लिंकन चे एक वाक्य माझ्या काळजात रुतून आहे..
” गुंडांना घाबरत जाऊ नको म्हणावे
त्यांना नमवणे सर्वात सोपे असते….”

*ताजा कलम* : माझ्या हल्ल्याच्या निमित्ताने माझ्या भोवती चर्चा न फिरता प्रत्येक गावातील ,शहरातील प्रत्येक शाळेभोवती १०० मीटर मध्ये एकही तंबाखू टपरी असणार नाही.या शासन आदेशाचा आग्रह धरायला हवा. जनतेचा पालकांचा रेटा निर्माण व्हायला हवा. शाळा आज दारू दुकाने, टपरी, गुटखा, मटका याने वेढल्या आहेत.******

चिमुरडीची डोळस दृष्टी….

      आरती सुहास सदाव्रते,९९२३११६४२१
ओळखीतील एका मुलाचा वाढदिवस होता.मुला – मुलींना शक्यतोवर पूज्य साने गुरुजी लिखित “श्यामची आई ” हे पुस्तक मी भेट देत असते. या मुलाला देण्यास पुस्तक कार्टूनचे डिझाईन असलेल्या गिफ्ट पेपर मध्ये पॅक करण्यास मी दुपारी निवांत बसलेली होते. शेजारीच राहत असलेली चिमुरडी माझ्याशी गप्पा मारत बसलेली.माझ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती. मी पुस्तक गिफ्ट पेपर मध्ये ठेवले आणि पॅकिंग सुरु करणार तोच ती चिमुरडी मला म्हणाली, काकू ! पुस्तक पॅकिंग करु नका, तसेच द्या ! .. चिमुरडीचे मला ऐकावे लागले.. आणि नंतर माझ्या लक्षात आले,की ही म्हणते,तेच खरे आहे. मी विचार करायला लागले, अन तेव्हा मनात एक विचार धडकन चमकून गेला…. अरे !, पुस्तकातील प्रसंग आठवला अन मनात विचार आले,
श्याम आणि त्यांची आई यांचे प्रेम किती मोठे होते, त्यांना असेच खुले राहू द्यावे..विचार खरेतर असे एखाद्या कागदाच्या वेष्टनाने बंदिस्त होत नाहीत…
तिच्या एका वाक्यानेच मी ही अंतर्मुख होऊन विचार करु लागले. खरेच आई आणि मुलाच्या वात्सल्याला आपण का बंदिस्त करून द्यावे. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ” हे जरी खरे असले तरी पूज्य साने गुरुजी याला अपवाद आहेत,असे मला वाटते. त्यांनी त्यांच्या संस्कार मूर्ती मातेचे महन्मंगल वात्सल्य शब्दबद्ध केले आहे. मातृत्वासाठीचा सर्वात मोठा मानाचा शिरपेच आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या माता यशोदा साने यांची दोन नोव्हेंबरला पुण्यतिथी असते.लौकिक अर्थाने परंतु राजमाता जिजाऊ असो, की माता यशोदा साने या अवघ्या मानवतेच्याच माता ठरल्या आहेत. इतिहासात अजरामर झालेल्या मातांमधील एक संस्कारमूतीं माता. स्त्री जन्माला आल्यावर तीला मातृत्वामुळे पूर्णत्व लाभते. आजच्या डिजिटल युगात मातृत्वाचा असा झरा अविरत खळखळता राहावा वाटत असेल तर प्रत्येक स्त्री ने अंतर्मुख होवून विचार केला पाहिजे..एवढे मात्र नक्कीच…============

मातीशी नाते…

                प्रा.पंढरीनाथ सारके,९७६६९८३१०१

अंधार जास्तच वाढला होता..आता हाॅटेलमध्ये गर्दी कमी झाली होती.शंकरचे हाँटेल जे दुर्गम रस्त्यावर व डोंगराळ भागात होते.. तेथूनच भारतीय सैन्यासाठी रसद पोहचविण्यासाठी आर्मी ट्रक जात असत.. शंकरच्या हाॅटेलमध्ये बऱ्याच वेळा लोक फक्त चहा घेण्यासाठी थांबत असत.एखादी दुसरी व्यक्ती जेवणासाठी थांबायची..पण सैन्याचे ट्रक- ड्रायव्हर आणि त्यामध्ये असणारे सैनिक मात्र तेथे जेवण करीत असत..
शंकरचे लहानसे हाॅटेल तेही एकमेव. त्या मार्गावर दुसरे हाॅटेल उघडले नाही असे नाही.पण ते उघडून काही दिवसांत बंद सुद्धा झाले होते.कारण इतक्या दूरपर्यंत लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आणणे जरा जिकरीचे व अवघड काम होते.. म्हणून लोकांनी हाॅटेल उघडायची हिंमत केली नव्हती..
आज बत्तीस वर्षे झालीत. शंकरचे चहाचे दुकान छानच चालले होते.. त्याची फार काही मोठी फॅमिली नव्हती.फक्त होता एकुलता एक मुलगा आणि तो.. .हाॅटेल बंद झाले, की शंकर तेथेच आपली पथारी मांडायचा.. आणि हक्काची झोप घ्यायचा..
शंकरचा मुलगा आता शहराच्या काॅलेजमध्ये शिकत होता .आठवड्याला एकदा तो हाॅटेलसाठी लागणारे सामान जसे साखर, चहा -पत्ती,डाळमुठ, ब्रेड, आणि बिस्कीटस वगैरे आणुन टाकीत होता.. आवश्यकतेनुसार सगळं सामान वेळच्या वेळी मिळत असल्यामुळे शंकरचे बरेच कष्ट हलके झाले होते..
दिवसभर हाॅटेलमध्ये लोक येतच असत. रात्री -बेरात्री सैन्याचे ट्रक्स. कधी कधी सैनिक स्वतःचे जेवण बरोबर आणीत आणि शंकरच्या बाकावर बसून खात असत.. शेवटी त्यांना छानसा चहा तो करून देत असे..जर त्यांनी जेवण आणलेले नसेल तर शंकर त्यांच्यासाठी छान जेवण सुद्धा बनवायचा..
एकदा एक सैनिक रसद घेऊन ट्रक आला.आणि तो हाॅटेल पाहून थांबला..त्या ट्रक सोबत तीन सैनिक सुद्धा होते.. त्यांनीं त्यांच्या दशम्या बरोबर आणलेल्या होत्या.. फक्त त्यांना काही तरी भाजी बनवून पाहिजे होती..शंकरने त्यांच्यासाठी दाळ फ्राय केली व त्यांना सर्व्ह केली..
आता त्यांना चार चहा हवे होते.. शंकरने ईलायची आणि अदरक टाकून झकास चहा बनविला व चार ग्लास मध्ये ओतला. आता ते सैनिक चहाच्या टेबलावर बसले होते.त्यातील एक म्हणाला,
” बाबुजी,मुझे चाय मिट्टी के कपमें देना..”
शंकर म्हणाला,” साहब, मिट्टी का कप तो नहीं है..”
त्या सैनिकाने बॅग मधून ‘मिट्टीका कप’ काढला आणि म्हणाला,” बाबुजी इसमे डालो..”
शंकर थोडासा हसला व म्हणाला,” साहेब, तुम्ही हा ‘मिट्टी का कप’ का बरं घेऊन हिंडता..? यामध्ये चहा लवकर थंड होऊन जातो.मग चहाची काहीच मजा राहात नाही..! ”
असे शंकरने म्हटल्यावर त्या सैनिकाने तो मातीचा कप कपाळाला लावला व म्हणाला,” बाबा, या चहातून मला माझ्या मातॄभुमीच्या मातीचा सुगंध येतो.या उष्ण चहासोबत मला शत्रूशी लढण्यासाठी ताकद सुद्धा मिळते आणि मी धाडशी बनतो.. त्यामूळेच मी हा मातीचा कप माझ्या बरोबर घेऊन हिंडतो आहे….” असे म्हणून तो सैनिक चहाच्या प्रत्येक घोटाचा आनंद घेत होता..शंकरने त्या सैनिकाला नमन केले.व मनातल्या मनात म्हणाला, “मी, मुलाला सांगून मातीचे कपच मागवून घेतो..”==========

गोष्ट चंदू -नंदूची 


         अरुण वि.देशपांडे-९८५०१७७३४२

मित्र हो , आज तुमच्यासाठी जी गोष्ट सांगणार आहे ती दोन दोस्तांची ..एकाचे नाव आहे चंद्रशेखर “, पण त्याचा झाला – चंदू , आणि दुसरा आहे – नंदकिशोर त्याला सगळेचनंदू “नावाने  बोलतात .
हे दोघे मित्र ..एकाच शाळेत “पहिली पासून ते आताच्या आठवीच्या वर्गात  सोबत आहेत.
दोघांचे स्वभाव एकदम जॉली, सगळ्या शाळेत चंदू-नंदूची जोडी फेमस आहे . टीचर ,सर ,मोठ्या आणि छोट्या वर्गातील मुलं-मुली या सगळ्यांच्या आवडीचे दोस्त म्हणजे ..आपले चंदू-नंदू आहेत. ही जोडी असे काय करते बुवा ? की सगळीकडे चंदू-नंदू म्हणजे आवडते मित्र होऊन बसले आहेत.
चंदू-नंदू सारखे आपणही  सगळ्यांना आवडणारा मित्र  “व्हावे ..असे  वाटण्यात चुकीचे असे बिलकुल नाही .कठीण नसले तरी फार सोपे देखील नाहीये बरे का …! हे चंदू-नंदू माझ्यासारख्या अनेक आबांचे लाडके दोस्त आहेत .म्हणून ..मी तुम्हाला या दोन दोस्तांच्या विशेष गुणाबद्दल सांगतोय, बघा ..हे माहिती झाल्यवर मग कदाचित तुम्हाला वाटेल ..
चंदू-नंदू सारखे आपण होऊ शकतो की….
यांच्यातील छान गुण – जाणून घेऊ या-
चंदू आणि नंदू ..हे दोघे ही शांत स्वभावाचे आहेत ..समोरचा कितीही गरम डोक्याचा असो , त्याच्याशी ही दोघे हळू आणि शांतपणे बोलून रागात बोलणार्‍या रागातली हवा काढून टाकतात .कारण चंदू -नंदू म्हणतात ..माणसाला राग येतो त्याचे कारण अगदी किरकोळ असते , पण थोडेजरी काही मना विरुध्द झाले की .सगळ्यांना राग येतो ..जणू काही “राग नाकाच्या टोकावर बसून असतो.म्हणून आम्ही आमचा मित्र आणि मोठी माणसे ” का बरे रागावली असतील ? ..हे समजून घेतो ..आणि मग आम्हाला हसू येते ..कारण ..यातल्या प्रत्येकाला ,”मी सांगितलेले त्याने ऐकले कसे नाही ?
याचा राग जास्त वेळा येत असतो , समोरचा जणू आपला नोकर आहे अशा थाटात वागणारे .स्वतःच काही करीत नाहीत ..पण इतरावर लगेच रागवत बसतात .हे असले नमुने पाहून पाहून आम्ही शिकलो ..की ..रागावून माणसे दूर दूर जातात , असे चुकीचे आहे..शांत राहून समजून घेतले तर शक्य असेल तर मदत करावी नाही तर ..”नाही म्हणता येते की..लबाड ,चतुर ,संधिसाधू लोकांची लबाडी उघडी करणे..
चंदू-नंदू जोडी  फार डेअरिंगबाज आहे. शिरजोर पोरांना ते घाबरत नाहीत .”शाळेच्या बाहेर पड तर खरी , बघून घेतो ..तुला !अशी धमकी देणार्‍या पोरांना चंदू -आणि नंदू शाळेच्या बाहेर भेटून इतर मुलांच्या मदतीने त्यांना समजेल अशा पद्धतीने बोलतात , मग काय पहाणारे चंदू-नंदूसाठी टाळ्या वाजवतात .
खोटे बोलणे असा स्वभाव असणाऱ्यांशी   कधी मैत्री करू नये – कारण अशा सवयीमुळे लोक आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत ..
चंदू -नंदू म्हणतात ..आपल्यावर लोकांचा विश्वास असणे “म्हणजे मोठेच बक्षीस मिळवण्यासारखे असते.
मित्रांनो .चंदू -नंदू बद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे..पुढच्या भेटीत नक्की सांगेन=======

अध्यात्म

        कविता नरवडे-91 76204 34279

जग् नियंता ईश्वराशी तादात्म पावणे जीवाशीवाचं मिलन त्याचे अंगभूत गूणांशी अद्वैत होणे म्हणजे अध्यात्म…मी कोण ? माझा कोण? या प्रश्नाचा उलगडा होतो म्हणजेच मध्यात्म होय अध्यात्माशिवाय मानव म्हणजेच होकायंत्रा शिवाय जहाज होय चारित्र्यसंपन्न, व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणासोबत अध्यात्म म्हणजे दुग्धशर्करा योग होय. मानवी काया अलंकाराने सुशोभित होते, आकर्षक होते. स्थितप्रज्ञता, धैर्यता, संयम, परोपकारी वृत्ती, समानता या आभूषणाने मनाच्या ओदार्याची ऊंची गाठता येते.
आजही देवी देवता यांचे मुखदर्शन घेण्याची उत्कंठा मनाला आवरता येत नाही, कारण, त्यांच्यामध्ये असलेले पावित्रता मना‌ला भावते. श्रीकृष्णाचं लोभस रूप मनाला भूरळ पाडतं, ते त्याच्या दिव्यतेमूळेच. मानवाला मोल प्राप्त होत ते त्यांच्यामध्ये विद्यमान असलेल्या मूल्यांमुळेच…. मान‌वाकडे कितीही संपत्ती असली तरी इतरांना त्याचा काही उपयोग होत नाही मात्र त्याच्यातील संस्कारामुळे जीवनात अद्‌भूत व अलौकिक कार्य देखील तो सहज करु शकतो म्हणून आजच्या काळात अध्यात्माला अत्यंत महत्त्व देणे गरजेचे आहे.
आज मानवाची हिंसकता पराकोटीला गेली आहे. रक्तातील नात्यात सुसंवाद हरवताना दिसतोय सहकार्य, सामाजिक ऐक्य, या भावनाना तडा गेल्या आहेत. नैतिकतां जीवनातून निसटून जात आहे स्वैराचार, बदलते राहणीमान, अंहंकार या वृत्ती जोमान वाढतय जोमाने वाढताना दिसतात.मानवतेशी नाळ तूटत चालली आहेत.स्वार्थी वृत्तीचे पीक जोमान वाढतय आणी ‘परमार्थ’ हा फक्त पोकळ शब्द बनलाय. जातीयता, उच्चनीच भेद‌भाव, अमानुषपणा आतंकवाद यांनी आपले साम्राज्य वाढवलय आहे. त्याची अधिसत्ता नष्ट करण्यासाठी, संवेदनशील माणूसकीचे चिन्ह पाहायचे असल्यास मानवी जीवनात अध्यात्माशी सांगड घातली तरच हे चित्र बदलेल्या खेरीज राहणार नाही.
मानवाची ‘स्व’चा शोध घेण्याची अविश्रांत धडपड, आजतागायत सुरुच आहे. प्रेम, सुख शांती, आनंद, शक्ती या त्याच्यातील मुलभूत अंतर्गत गूण आहेत, हे सर्व तो बाहेरून, घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. आत्मभान हे आत्मजाणीव निर्माण करण्यासाठीच आत्मसाक्षात्कार व्हायला हवेत. ‘तूज आहे तुजपाशीपरी जागा चूकलाशी’ या युक्तिप्रमाणे’स्व’ ओळख ‘स्व’ जाणीव झाल्याशिवाय होणार नाही.स्व स्थिती मजबूत होईल ते केवळ अध्यात्माची कास धरल्यामूळेच. आणि बाह्य परिस्थितीवर मात करण्यासाठी अंतर्गत स्थिती मजबूत राहणे आवश्यक आहे.
माणसाला काणूस होण्यापासून वाचवायचे असेल तर त्याला सुसंस्कारित गालबोट लावण्यासाठी आजच्या घडीस अध्यात्माचा जीवनात समावेश होणे गरजेच आहे. दिव्य गुणांनी युक्त असलेल्या मानवामूळे उद्याच्या भारताचे नंदनवन, खराखुरा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सहकार्य, सहसंवेदना, माणुसकी,नम्रता, विवेक जागृती करीता अध्यात्मा खेरीज पर्याय नाही.=========

माझा बाप शूर शिपाई

✍️ प्रदिप संजय नागवे+91 97306 89745

तूच आहेस का तो जो नसतो कधी घरी
अन असतो नेहमी या भारत मातेच्या सिमे वरी .

देश सारा झोपतो रे आरामात
अन खातो घरच्या भाकरी
तु तर नावच कोरलं तुझ
त्या दुश्मनाच्या गोळी वरी.

तूच आहेस का तो जो नसतो कधी घरी

आम्हचा बाप दिसला नाही की आम्ही
शोधतो त्याला घरी दारी
आसा कसा सोडतोरे तु
बायको पोर अलगज वाऱ्या वरी .

तूच आहेस का तो जो नसतो कधी घरी

तुला नसतीकारे कधी दिवाळी
अन पंढरीची वारी
ठाऊक आहे आम्हाला की तु
पांडुरंग होऊन उभा आहे भारताच्या सीमेवरी .

तूच आहेस का तो जो नसतो कधी घरी .====

कविता मला भेटली…

       – सुहास सदाव्रते-+91 94045 36767

मनातील भावभावनांचा कल्लोळ जेव्हा अंतर्नाद होवून शब्दातीत निनाद असतो,तेव्हा कविता जन्म घेते..कविता खरेतर एखाद्याच्या जगण्या- भोगण्याचे वास्तव भान असते…प्रियकर- प्रेयसीच्या काळजाचा ठाव असते कविता..मनामनातील स्पंदनांचा वेध घेत काळजात घर करत असते कविता…अशा विचाराने प्रत्येकाला कविता भेटत असते. खरेतर ‘कविता मला भेटली ‘ ती दिव्यांग कवी आकाश देशमुखचे दुःख सांगणारी..तर कधी मराठा आरक्षण लढाईचा एल्गार पुकारणारी कवी दिगंबर दाते यांची कविता…कवितेत कवितेबद्दल कवितेचेच भाव सांगणारी कवी- गझलकार ( दर्द) यांची ‘ कविताही ‘ मला भेटली==

आत्मविश्वास..

                       आकाश देशमुख

बिथरलो नाही कधीच आयुष्याच्या वळणावर, चालत गेलो पुढे मी
विचार केला ना क्षणभर..

झुकलो नाही कधीच कित्येक वादळे आली तरी
हार मानली नाही,
कधी परिस्थितीशी झुंजताना..

क्षणभरही थांबलो नाही, जिद्दीने केला सामना दुःखांना नाही घाबरलो किती तरी झाल्या यातना..

लढतच राहिलो कायम
आशा होती माझ्या मनात जिंकणार एक दिवस ! झेपवणार उंच आकाशात…

मनात माझ्या भरले नवनवोन्मेष,
संघर्षमय माझ्या जीवनाचा ठेवून आदर्श
जगासमोर विजय आहे आत्मविश्वासाचा .=======

पद

      –प्रा. डॉ. बाबू श्रीरामे  -९७६६५५४९७०

गुरु आले आपुल्या गावा

मनोभावे करावी सेवा ||धृ.||

मानवा दिखावूपणा सोड

गुरुचे नाम घे मुखी गोड

गुरु हृदयी आहे मेवा ||१||

गुरु आले आपुल्या गावा…

गुरु आहे माहेर घरं

त्यांच्या चरणी लावा लक्ष खरं

गुरु उंचीवर नेई आपुल्या जीवा  ||२||

गुरु आले आपुल्या गावा…

गुरूच्या लागा तुम्ही चित्ता

खरा आहे तो ज्ञानाचा दाता

गुरु वाचून सखा नाही देहे गावा ||३||

गुरु आले आपुल्या गावा…

श्रीरामे दास सांगे खास

गुरुचा धरुनी कास

गुरुभक्ति करा तुम्ही रात्रंदिवस  ||४||

गुरु आले आपुल्या गावा..

   • जगरहाटी

 डॉ. शिवनंदा उमाजीराव मेहेत्रे ( ९४२१६५७६१४)
आजकाल माध्यम दिसतात
पण संवाद दिसत नाही
कलकलाट येतो कानी
पण शब्दच उमटत नाहीत.

ऋतू येतात पूर्वीसारखेच
पण त्यांचं रूप दिसत नाही
गर्दी अनंत दिसते माणसांची पण
माणुसकीच दिसत नाही.

सिलेब्रेशन दणक्यात होते
मात्र भावच दिसत नाहीत
मोठमोठी घरं दिसतात
पण त्यांना घरपणच दिसत नाही…

हजारो मित्र असतात सोशल मीडियावर
पण गरजेत एकही कामाला येत नाही

नियमित घरात होते देवपूजा
पण भाव मात्र दिसत नाही
दरवर्षी करतात तीर्थयात्रा
पण वागण्यात नीतिमत्ता दिसत नाही

शरीर दिसते निरोगी
पण तसे मन दिसत नाही
अशा या जगरहाटीत खरंच कसं
वागायचं तेच कळत नाही==========

उन्माद अनीतीचा

        डॉ. गोपाळ तुपकर  (९४०४६१७०११)
माणूस माणसाला,शोधतोच आहे कोठे,चलनाच्या साधनाला आहेत भागीदार मोठे

गरज कुणाला माणसाची ,आता वाटते आहे,
गरज सरो वैद्य मरो,ही शंका मनी दाटते आहे

निर्विकार मानवी आत्म्यास, डीवचातात ही गिधाडे
हास्य विनोदी तुषारे, उडवतात ही लबाडे

हिरमुसलाच होतो अशाने, निर्व्याज तो जीव
अव्यक्त राहून दुनियेची, करितो मनी किव

पडलेच ना प्रश्न जगतांना, उत्तर सापडेल कसे?
खोल खोदल्यविना जमिनीला, नीर उपजेल कसे?

अजानतेपणाचा आनंद, उन्माद वाढला आहे
काळच देईल उत्तर, पापांचा आलेख चढता आहे

भीतीच उरली ना मानवा, बऱ्यावाईटाची
सुखात नांदते आहे जगी, जात या शिंदळीची

लक्ष्मी भरते आहे पाणी,ऐश्वर्याचा महालात
नीतीचे जगणे हरवले, अनीतीच्या कोलाहलात

उगवत्या ताऱ्यांना , सदैव सलाम आहे
मस्तवाल लक्ष्मीपतींपुढे, सरस्वती गुलाम आहे.===

तो

          डाॅ. दिगंबर दाते 7796014999

तो, तो सर्वमान्य आहे
कारण तो सामान्य आहे

साडेतीन पावलं जमीन
देण्याच्या वचनापोटी
तो आता स्वतःलाच गाडून घ्यायचं
साफ नाकारतोय जागरूकपणे

एकेकाळी सर्वांना उदारपणे देणारे
आता मागणारे झालोत
यापेक्षा जास्त पुरावे मागून
आमची चालवलेली थट्टा
थांबवा एकदाची
एवढच तो सांगु पहातोय जगाला
महाराजांपुढे उपाशी बसुन

अन्यथा,
तुम्ही आतापर्यंत शिताफीने लिहून ठेवलेलं
आमच्या ‘दुर्दैवाचं सार’ सारं
जर मिटवून गेलं नकळत
आमच्या निथळणा-या गरम घामानं
तर मग
आम्हांला माफ करा,
एवढच सांगु पहातोय तो निर्वाणीचं
माय-बाप सरकारला
हात जोडुन जोडून =========

कविताही !

          सुनील लोणकर-९२७००९४००४
पाण्यावर तवंग येतो जेव्हा,
व्यापून टाकतं ते पाण्याला.
तेव्हा पाण्याचं वाहणं दिसतं नाही.
पाण्यावर लाटांचे तरंग ऊठतात,
तेव्हा पाण्याचे चढ उतार,त्याच ऊचंबळून येण,
हळुवार नृत्य करणाऱ्या पावला सारखं,लयीत वाटतं..
कवितेत हि कधी कधी तेच ते शब्द,तवंगा सारखे येतात .
थांबवितात कवितेला ते.
म्ऊशार वाळूत पावलं उमटवत पुढे पुढे जावं,
शीतलहरींन पदस्पर्शाने आपण रोमांचित व्हावं,
तसे काही तरल शब्द,जे करुणेचे,
भारून टाकतात कवितेला.
कधी कधी कविताही आरक्षण मागते.
तिलाही बाधा होते..
बेजोड शब्दांची.======

सूचना– आपण युट्युब edtv jalna वर जाऊन आपल्या मुलाखतीची फक्त लिंक  कॉपी करून देखील आप्तस्वकीयांना पाठवू शकता.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172


 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button