1.
दिवाळी अंक

यतोय पाडव्याला…Edtv News चा तिसरा ‘ अंकूर ‘ दिवाळी अंक

केव्हाही, कुठेही, कधीही, विनामूल्य वाचता येईल आणि संग्रहि ठेवता येईल असा edtv news चा तिसरा “अंकूर” दिवाळी  अंक पाडव्याला प्रसिद्ध होत आहे.काय आहे या अंकात पहा…

मुख्य संपादिका
सौ.मेधा दिलीप पोहनेरकर
============

चला माणूस शोधूया !


सुहास सदाव्रते
मानद संपादक
=============

दिवाळी म्हणजे ‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशाचा सण असतो. सध्याचे जग हे अत्याधुनिकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे हायटेक बनले आहे. इथे संवाद प्रत्यक्ष न होता तंत्रज्ञानावर आधारित भावनांनी होतो…इथे ‘इमोजी’ उदंड आहेत,पण मनातील भावनेचा ओलावा हरवत चालला एवढे मात्र नक्कीच!.. माणूस माणसाच्या जसा तंत्रज्ञानाने जवळ आला तसा ‘ मनाने ‘ एकाकी अन दूर होत असल्याचे दिसून येते. सण उत्सव साजरा करताना मनामनातील असे विचारांचे दीप पेटवूया!, जिथे माणूस हरवला जाणार नाही,याचा प्रत्येकात विश्वास निर्माण होईल,अशा वाटेने नवे प्रकाशाचे दीप उजळूया !!..

यासाठी साहित्य, कला,संगीत अशा माध्यमातून आपणाला सूर सापडतो…एक शतक एक दशकापेक्षा अधिक काळापासून ज्या माध्यमातून आयुष्याचा सूर सापडायला लागला तो महत्वाचा घटक म्हणजे मराठी दिवाळी अंक होय…कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक मिळवून देणारा हा दुवा…मराठी दिवाळी अंकाची परंपरा एक शतक एक दशकाहून अधिक पुढे आली आहे.ब्रिटीशांनी भारतात जेव्हा मुद्रणकला आणली तेव्हापासून लिखित साहित्य पुढे आले.बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा आहे.या दरम्यान विशेष अंक काढण्याची परंपरा आहे.बंगालमधील या परंपरेने तत्कालीन ‘ मनोरंजन ‘ मासिक चालविणारे काशिनाथ माजगावकर यांचे लक्ष वेधले. माजगावकर यांनी तो अंक पाहिला,आणि त्यावरून मराठी असाच अंक काढावा असा विचार मनात आला.बंगाली ‘ मित्र ‘ आडनावाचे मित्र असल्याने माजगावकर यांनी ‘ मित्र ‘ हे आडनाव स्वीकारले..यातूनच मराठी दिवाळी अंकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मनोरंजन मासिकाने १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक काढला.अडीचशे पानांच्या अंकात नामदार गोपाळ कृष्ण गोखले,साहित्य सम्राट न.चिं.केळकर,र.पु.परांजपे, रेव्हरंड ना.वा.टिळक,बालकवी यांच्यासह अनेक कवी लेखकाचे साहित्य होते. मराठी साहित्य जनमाणसात पुढे आणत ते समृद्ध करण्याचे काम दरवर्षी दिवाळी अंक करतात. दिवाळी अंकाची ११३ वर्षाची परंपरा आजही सुरु आहे. काळानुसार टप्पे,प्रकार,साहित्य आणि अंकाचे छपाई तंत्रज्ञान बदलत गेले. ऐंशीच्या दशकानंतर संगणक आले आणि दिवाळी अंकाचा चेहरा बदलला.कृष्ण धवल ते हायटेक फोरकलर,मल्टीकलर असा प्रवास आहे. दिवाळी अंकात ‘ मौज ‘ अंकाचा सिंहाचा वाटा आहे.नव्वद वर्षाच्या पुढे वाटचाल करीत आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ दिवाळी अंकाने महाराष्ट्रात वैचारिक वाचनसंस्कृती रुजविली आहे. आजही ‘ साधना’ परंपरा टिकून आहे,हे विशेष. दिवाळी अंकाचे शेकडो विषय असताना, विनोदी साहित्यावरील विशेष दिवाळी अंक ‘ आवाज ‘ ची परंपरा आजही आहेच. मराठीत आजच्या घडीला पाचशेहून अधिक दिवाळी अंक निघतात. आज साहित्य, कला,संस्कृती,वैद्यकीय, विनोदी,महिला विषयक,राशी भविष्य, आरोग्य, क्रीडा,संगीत,चित्रपट, कृषीसह अनेक विषयानुसार दिवाळी अंक निघतात.मराठी दिवाळी अंकात वेगळे स्थान निर्माण केले ते ‘ विश्रांती ‘ दिवाळी अंकाने. विषयाची वैविध्यपूर्णता ही या दिवाळी अंकाची ओळख.
दोन -तीन वर्षापासून दिवाळी अंकाची दिशा बदलली आहे. आजच्या घडीला डिजिटल प्लॅटफॉर्म हा नवा बदल दिवाळी अंकात दिसून येत आहे. दिवाळी अंकाचे नवे रूप धारण केले आहे.जालन्यातून पहिल्यांदाच डिजीटल प्लॅटफॉर्मवरील दिवाळी अंक काढण्याच्या नवीन पद्धतीला सौ. मेधा दिलीप पोहनेरकर यांनी सुरुवात केली,हे विशेष.यंदाचा तिसरा डिजिटल दिवाळी आपल्या हाती,देताना आम्हांला आनंद होत आहे !…

यंदाच्या डिजिटल दिवाळी अंकाचे विशेष असे,की मागील महिन्यात नगर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा संवेदनशील लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अशा घटनेनंतर पुन्हा नव्या धैर्याने सावरत ‘ मी अजून जहाज सोडले नाही’ असा आत्मविश्वास हेरंब सर व्यक्त करतात. या अंकात असे अनुभव कथन जाणीवपूर्वक आम्ही देत आहोत. डिजिटल दिवाळी अंकात पुणे येथील साहित्यिक अरुण देशपांडे यांची लघुकथा, आरती सदाव्रते यांची ‘ चिमुरडीची डोळस दृष्टी’ ही लघुकथा तर साहित्यिक प्रा.पंढरीनाथ सारके यांची ‘ मातीशी नातं ‘ सांगणारी कथा आहे. डिजिटल दिवाळी अंकात ‘ कविता मला भेटली ‘ या सदरात कवी- गझलकार सुनील लोणकर, कवी दिगंबर दाते, आकाश देशमुख, गोपाल तुपकर, शिवनंदा मेहेत्रे यांच्या समकालाचे वास्तव परिस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या कविता आहेत. डिजिटल दिवाळी अंकात
लोककला,लोकपरंपरा साता समुद्रापार नेणारा युवा शाहीर रामानंद उगले,
तीन उद्योग- व्यवसायात नव्याने
मार्ग शोधणारा पार्थ लिंगायत, शिक्षणाबरोबर गायन,वादनाची कला अंगी बाळगणारी आर्या गजानन गोंदीकर या युवामंडळीची विशेष मुलाखत वाचकांना निश्चित पसंत पडेल.

वाचक,रसिकांना edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजीटल) चा ‘ अंकूर ‘ डिजिटल तिसरा दिवाळी अंक पसंत पडेल,अशा अपेक्षेसह दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..

*web-www. edtvjalna. com,
whatsapp *channel-edtv news
*play store-edtvjalna
*you tube-edtvjalna,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button