तुती लावा अनुदान मिळवा, एकरी 3.97 लाखांचे अनुदान/ चार डिसेंबरला लोकशाही दिन
जालना- दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णया नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास योजनेच्या प्रति एकर अनुदानामध्ये रूपये 3.58 लाख वरून रू. 3.97 लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मनरेगा अंतर्गत रेशीम विकास योजनेचे प्रस्तावांना तांत्रिक मांन्यता देणे, प्रशासकिय मान्यता देणे, कार्यारंभ आदेश देवुन अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ देणेचे अधिकार आता रेशीम विकास अधिकारी यांचे सोबतच गट विकास अधिकारी, पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी यांनाही देण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत जे शेतकरी अनुदानास पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्याना सिल्क समग्र-2 या योजनेतुन तुती लागवड, ठिबक सिंचन, किटक संगोपन गृह व किटक संगोपन साहित्य या बाबी करीता अनुदान देण्याची सूविधा निर्माण झाली आहे.त्यामुळे रेशीम उद्यांग करण्यासाठी कोणत्याही वर्गवारीतील शेतकरी आता अनुदानापासुन वंचित राहणार नाही. त्यामुळे दिनांक 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधुन नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करावी, असे अवाहन रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी केले.
4 डिसेंबर ला जिल्हास्तरीय लोकशाही दिन
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी/अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत. तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172