रेल्वेचा भुयारी पूल म्हणजे “असून अडचण, नसून खोळंबा”
जालना- गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील सहा महिन्यांपासून जालना रेल्वे स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे .निश्चितच या मार्गामुळे स्टेशनच्या मागे राहणाऱ्या वसाहतींना, परिसरातील खेड्यांना , जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, जिल्हा परिषद इथे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना या मार्गाचा फायदा झाला आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे हा भुयारी मार्ग म्हणजे “असून अडचण नसून खोळंबा” झाला आहे. त्यातच या पुलावर असणारे रेल्वे गेट देखील कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पुलापर्यंत येऊन परत जावे लागत आहे किंवा आपले वाहन कमरे इतक्या पाण्यामध्ये घालून जोखीम पत्करावी लागत आहे. दरम्यान हे पाणी उपसण्याचे काम जालना शहर महानगरपालिकेकडे असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने इथे साचलेले पाणी उपसण्यासाठी किंवा त्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही जालना महानगरपालिके ची असल्याचा करार केला होता .त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील काम पूर्ण करून या भुयारी पुलाच्या बाजूलाच एक मोठा हौद बांधला आहे जिथे या भुयारी मार्गातील पाणी साचते. या हौदातून पाणी उपसणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेचीआहे.
असे असताना देखील नागरिकांची होणारी गैरसोय पाहता गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने येथील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या करारासंदर्भात आणि एकूणच पाण्याची विल्हेवाट लावण्या संदर्भात जालना शहर महानगरपालिकेचे बांधकाम अभियंता श्री. सौद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे पाणी उपसून नाल्यामध्ये सोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाल्याच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत आणि पुढील पंधरा दिवसात हे काम सुरू होईल अशी माहिती दिली आहे. त्यासोबत दोन दिवसांपासून नागरिकांना होत असलेल्या हा त्रास त्यांनी स्वतः येऊन पाहिला आहे यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या दोघांनी संयुक्त पाहणी करून हे पाणी उपसण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172