Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

क्रिप्टो करन्सी; कोणी कोणावर? किती जणांवर? कोणत्या कलमान्वये दाखल झाले गुन्हे? सविस्तर बातमी

जालना-क्रिप्टो करेंसी संदर्भात दिनांक 16 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. राजकीय पुढार्‍यांनी देखील एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि शेवटी संध्याकाळी क्रिप्टो करेंसी चे प्रमोटर आणि ज्यांची फसवणूक झाली आहे असे ग्राहक या दोघांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे .आता या प्रकरणाचा तपास पोलीस कशा पद्धतीने करतात याकडे जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या तक्रारी मध्ये काय -काय लिहिलं आहे? जालना तालुका पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी दिलेल्या तक्रारी मध्ये ऋषिकेश शेषराव काळे वय 31 वर्ष, व्यावसाय कार डेकोरेशन, राहणार गोकुळ नगरी जालना, यांनी म्हटले आहे की

“मी वरील नमूद पत्त्यावर आपल्या परिवारासह राहतो व कार डेकोरेशनचा खाजगी व्यवसाय चंदनझिरा, भगवती कॉम्प्लेक्स येथे करतो. मार्च 2022 मध्ये किरण भरतराव खरात वय अंदाजे 37 वर्ष ,हल्ली मुक्काम मिसाळ हॉस्पिटल पाठीमागे सराफ नगर जुना जालना, हा ग्लोबल डिजिटल क्लस्टर कडूनची मार्केटिंग करीत असताना माझ्या श्री साई कार डेकोर चंदंनझीरा येथे आला व मला भेटला. तेव्हा त्याने मला तोंडी डीसीसी क्रिप्टो करेंसी चा प्रमोटर असून त्याने मला क्रिप्टो करेन्सी मध्ये गुंतवणूक केली तर त्यामध्ये महिन्याला 11 टक्के परतवा मिळेल व क्रिप्टो करेंसी च्या एका कॉइन ची किंमत आज भारतीय रुपयांमध्ये 2800 रुपये असून जेव्हा तो लॉन्च होईल तेव्हा त्याची किंमत एक लाख रुपये असे असेल सांगितले. सदर करन्सी ही 25 डिसेंबर 2022 रोजी लॉन्च होणार आहे ,तसेच सर्व जगात आता या क्रिप्टो करन्सीच चलन म्हणून मान्यता मिळणार आहे व त्याची किंमत इतर चलनाच्या तुलनेत खूप जास्त असेल ,असे म्हणून मला विश्वास दिला. त्यानंतर मी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती किरण खरात तसेच इतर सहकारी यांना वेळोवेळी जालना, अंबड, औरंगाबाद ,येथे क्रिप्टो करन्सी बाबत आयोजित केलेल्या सेमिनारला मला आमंत्रित केले व मी ते सेमिनार अटेंड केले. तेव्हा सुद्धा मला, तसेच तेथे आलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना किरण खरात व त्यांची पत्नी तसेच इतर सहकारी लोक यांनी आम्हाला क्रिप्टो करेंसी बाबत माहिती देऊन त्यात गुंतवणूक करण्याची व परतावा देण्याची हमी दिली. दिनांक चार जून 2022 रोजी मी माझ्या वडिलांच्या बँक खात्यातून बारा लाख 50 हजार रुपये काढले व किरण खरात याला क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता त्याचे राहते ठिकाण सराफ नगर जालना येथे नेऊन दिले. त्यावेळी माझे सोबत माझे मित्र विजय सुनील भांदर्गे, व आकाश वामनराव राऊत हे होते .पैसे दिल्यानंतर किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांनी माझ्या मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यावर मला नोंदणी करण्याचे सांगितले व पुढील माहिती दीप्ती खरात देतील असे सांगितले. मी दिलेल्या लिंक वर नोंदणी करून दीप्ती खरात यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी मला असे सांगितले की तुमचे पैसे तुम्ही नोंदणी केलेल्या पेजवर वॉलेट मध्ये तुम्हाला कॉइन च्या स्वरूपात दिसतील व त्यावर दरमहा 11 टक्के वाढ होत राहील. परंतु सदर पैसे तुम्हाला दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी जेव्हा कॉइन लॉन्च होईल त्यानंतर काढता येतील त्यांनी पुढे असेही सांगितले की आज रोजी कॉईन ची किंमत 2800 रुपये असून लॉन्च च्या वेळी ती किंमत एक लाख रुपये असेल. किरण खरात यांची पत्नी दीप्ती खरात यांच्या म्हणण्यानुसार मी रोज माझे बीसीसी वॉलेट वरील रक्कम बघत होतो व सुरुवातीला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यात दरमहा 11 टक्के वाढ देखील होत होती परंतु दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी कॉईन लॉन्च झाल्या तेव्हा कॉइन ची किंमत बाराशे रुपये दाखवत होती व तरीदेखील सदर पैसे मला काढता येत नव्हते .त्यामुळे मी किरण खरात यांना संपर्क करून कॉईन ची किंमत एवढी कमी कशी झाली व मला माझे पैसे काढता का येत नाहीत? असे विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व अजून काही काळ थांबा असे मोघम स्वरूपाचे बोलू लागला. आपली फसवणूक झाली आहे असे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याच्या घरी गेलो असता तुला काय करायचे ते करून घे, मला धक्का पोहोचू शकत नाही माझी ओळख खूप वरपर्यंत आहे, यापुढे पैसे मागायला आला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली .किरण खरात व त्याच्या पत्नीने माझ्यासारख्या अनेक लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असून फसवणुकीचा आकडा पाचशे कोटींच्या घरात आहे. यामध्ये किरण खरात सोबत इतर अनेक सहकारी असण्याची व त्यांचे एक मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे .आज रोजी मी अंबड चौफुली येथे असताना मला असे कळले की माझी फसवणूक करून किरण खरात ,त्याची पत्नी मुलांसह देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत तरी किरण खरात त्याची पत्नी दीप्ती खरात व त्याचे इतर सहकारी यांनी क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवणूक करून तुम्हाला तुम्ही गुंतविलेल्या रकमेचा 11% दरमहा मिळून करन्सी लॉन्च झाल्यानंतर त्याची भारतीय रुपयाच्या तुलनेत अनेक पटीने परतवा मिळून देतो असा विश्वास देऊन माझी आर्थिक फसवणूक केली आहे .त्याचे वर कायदेशीर कारवाई करावी.” ऋषिकेश काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रिप्टो करेंसी चे प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात यांच्या विरोधात भादवि कलम 420 म्हणजेच फसवणूक भादवि कलम 504 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिप्टो करेंसी संदर्भात सोमवार दिनांक 16 रोजी दिवसभर वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आणि संध्याकाळी या क्रिप्टो करेंसी चे प्रमोटर आणि यामधील गुंतवणूकदार यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार या क्रिप्टो करेंसी चे प्रमोटर किरण भरतराव खरात वय 44 वर्ष ,राहणार लक्ष्मी निवास सराफ नगर हल्ली मुक्काम मंगरूळ, तालुका घनसांवगी यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

“मी वरील पत्त्यावर माझ्या कुटुंबीयांसह राहत आहे जीडीसी कंपनी क्रिप्टो करेंसी मध्ये मी सन 2017 पासून प्रमोटर म्हणून काम पाहतो. या कंपनीमध्ये मी पूर्वी स्वतः गुंतवणूक केलेली असून मला फायदा झाला असल्यामुळे मी त्याचा जालना जिल्ह्यामध्ये प्रमोटर म्हणून कामकाज पाहतो .या काळामध्ये लोकांना क्रिप्टो करन्सी चे फायदे व तोटे समजावून सांगून गुंतवणूक करण्यास सांगत असे, मला माझ्या गुंतवणुकी मधून 2019 -20 च्या दरम्यान कंपनीकडून एक बीएमडब्ल्यू कार भेट स्वरूपात मिळाली .त्यामुळे खूप लोकांनी याबाबत माझ्याकडे चौकशी केली. मी अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील बऱ्याच लोकांना गुंतवणुकी संबंधाने मार्गदर्शन केलेले आहे .याच माध्यमातून माझी जालना येथील प्रसिद्ध वकील हरिभाऊ झोल यांचे चिरंजीव विजय झोल व विक्रम झोल यांच्याशी सन 2020 मध्ये ओळख झाली. मी त्यांना वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झालेला आहे. मी केलेल्या मार्गदर्शना व्यतिरिक्त श्री. विजय झोल व विक्रम झोल यांनी इतर ठिकाणीही अशा प्रकारची गुंतवणूक केलेली आहे. सध्या जागतिक मंदीमुळे कंपन्यांचे बाजार मूल्य हे मोठ्या प्रमाणावर खाली आले आहे. त्यामुळे त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम हिचे बाजारमूल्य खूप मोठ्या प्रमाणात खाली आल्यामुळे दोघा बंधूंनी झालेल्या नुकसानीबाबत माझ्याकडे पाठपुरावा करून आमची रक्कम लवकरात लवकर परत मिळावे म्हणून तगादा लावला. त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी साधारण 80% रक्कम बाजार मूल्यापेक्षा जास्त त्यांना परत देण्यात मी यशस्वी झालो. राहिलेल्या रकमेबाबत त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेल्या क्रिप्टो करन्सी कॉइन त्यांनी सध्या बाजारात असलेल्या मूल्याने विक्री केली तरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर फायदेशीर रक्कम येईल असे मी त्यांना कल्पना दिलेली आहे. याच कारणावरून दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जालन्यातील सराफ नगर येथील माझ्या राहत्या घरी माझी पत्नी सौ. दीप्ती किरण खरात वय 41 वर्ष ,या घरी एकट्या असताना विजय झोल व विजय भांदर्गे यांनी आमचा परतावा दिला नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशी भीती वजा धमकी दिली. दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे बाजार मूल्य कमी झाल्याचे कारणाकरिता पुणे येथील कार्यालयातील वरिष्ठांना भेटण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. पुणे येथे आमच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कंपनी बाबतीत चर्चा करून दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी दुपारी अंदाजे तीन ते चार वाजेच्या सुमारास पुण्यातील माझ्या भोसले नगर येथील घरी आलो. त्यावेळी माझ्या घरी विजय झोल यांचा चालक सुभाष तसेच अनिरुद्ध शेळके, विजय भांदर्गे, आशिष देशमुख व सुमित जाधव यांनी माझ्या लहान मुलीला धमकावून घरामध्ये प्रवेश केला. मी घरी पोहोचलो तेव्हा वरील सर्व लोक माझ्या घरात दारू पीत बसले होते. तेथे मला पिस्टलचा भाग दाखवून झालेली नुकसान भरपाई म्हणून दहा कोटी रुपये मागितले. मी त्यांना त्यांच्याकडे असलेले क्रिप्टो करन्सी चे कॉईन सध्याच्या बाजार मूल्याप्रमाणे विकले तरी गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर तीन कोटी रुपये फायदा होईल असे समजावून सांगत होतो. माझे काही एक न ऐकता विजय झोल व त्यांचा चालक सुभाष तसेच अनिरुद्ध शेळके, विजय भांदर्गे ,आशिष देशमुख व सुमित जाधव यांच्यासह अजून सात ते आठ अनोळखी इसमानी मला जबरदस्तीने पिस्टल चा धाक दाखवून पुणे येथून जालनाच्या दिशेने घेऊन निघाले. त्यावेळी माझी मुलगी व माझे मोठे बंधू रामराजे खरात हे उपस्थित होते. दिनांक पाच जानेवारी 2023 रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे हॉटेल अमरप्रीत येथील एका रूम मध्ये डांबून ठेवले. माझ्याकडून पुण्यातून निघताना जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल मला परत देऊन माझ्या घरातील लोकांना मोबाईल फोन लावून पैशाची व्यवस्था करण्यासाठी धमकावत होते .त्यानंतर मला वरील लोकांनी अमरप्रीत हॉटेल औरंगाबाद येथून घेऊन मला माझ्या जालना येथील सराफ नगर येथील घरी अंदाजे 12 वाजेच्या सुमारास आणून जबरदस्तीने बसविले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास माझे मोठे बंधू रामराजे खरात जालना येथील माझ्या घरी आले दुपारी पाच वाजेच्या सुमारास मला व माझे भाऊ रामराजे खरात यांना दुय्यम निबंध कार्यालय कचेरी रोड जालना येथे पिस्टल चा धाक दाखवून सराफ नगर जालना येथील राहत्या घराचे व जालना येथील चार प्लॉट अशा पाच मालमत्तेवर खरेदी खत करून सह्या घेतल्या. या सर्व खरेदी खताच्या नोंदणी मला व माझ्या कुटुंबीयांना असलेल्या धमक्यामुळे माझ्या मनाच्या विरुद्ध त्यांनी केल्या .सदरच्या रजिस्ट्री या विजय झोल विक्रम झोल व त्यांच्याआई चंदा झोल यांच्या नावे करून घेतल्या. त्यानंतर मला माझ्या जालना येथील घरी सोडले. दिनांक सहा जानेवारी 2023 रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास मी व माझी पत्नी सौ. दीप्ती खरात घरी असताना विजय झोल व अन्य काही इसमानी पुन्हा घरी येऊन काल खरेदी खत केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन अतिशय कमी असून आमचे नुकसान त्यामधून भरपाई होत नाही असा तगादा लावला व मला माझ्या अंबड येथील हॉटेल सुखसागर तसेच मंगरूळ येथील 40 एकर शेती जमीन व राहते घर आमच्या कुटुंबाच्या नावावर करून तुम्ही दुबई करता पाच ते सहा वर्षाकरिता निघून जायचे, अशी धमकी दिली. त्यावेळी माझी पत्नी व मुलगी श्रावणी उपस्थित होते. सततच्या धमक्यामुळे मी व माझे कुटुंब भयभीत झालो होतो. त्यामुळे मी माझ्या नातेवाईकांना सुरक्षितता करिता जालना येथील सराफ नगरच्या घरी बोलाविले .दरम्यानच्या चार दिवसांमध्ये विजय झोल व विक्रम झोल यांचे साथीदारासह मला व माझी पत्नी दीप्ती व मुलगी श्रावणी यांना सतत पैशासाठी धमकावत होते. दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान विक्रम झोल व विजय झोल हे त्यांच्या साथीदारासह माझ्या घरी येऊन मला जबरदस्तीने कोऱ्या कागदावर ,चेकवर, वकील पत्रावर सह्या घेतल्या .त्यानंतर मला ॲक्सिस बँक शिवाजी पुतळा शाखेमध्ये नेऊन माझ्या खात्यामध्ये वेगवेगळ्या व्यवहारापोटी एक कोटी एकोणीस लाख आठ हजार रुपये जमा करून ताबडतोब ती रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये जबरदस्तीने वळती केली. दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास जालना येथील घरी माझे नातेवाईक नामे कुंदा शामसुंदर काळे, राहणार बीड सचिन काकासाहेब लोमटे व प्रभावती काकासाहेब लोमटे राहणार अंबाजोगाई हे आले होते. त्यावेळी विजय व विक्रम झोल यांचे साथीदारासह आमच्या घरी येऊन मी व माझी पत्नी कोठे आहे याबाबत कुंदा काळे यांना विचारत होते. त्यांच्या सततच्या दहशतीमुळे मी व माझ्या पत्नीने बाथरूम मध्ये कोंडून घेतले. झोल यांचे साथीदार आमच्या घरात येऊन सतत मी कोठे आहे आणि मला त्यांच्या ताब्यात द्या म्हणून जबरदस्ती करत होते. त्याचा व्हिडिओ कुंदा काळे यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रित केला .असे दोन ते तीन वेळा त्या दिवशी झाले रात्री बाराच्या नंतर ही विजय झोल यांचे साथीदार व गजानन तौर यांनी कंपाउंड वरून घरात प्रवेश केला आणि पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यावर व घरावर दगडफेक केली. आम्ही घाबरून पोलिसांना फोन केला त्यावेळी पी.एस.आय .नागरे व स्टाफसह घरी आले. पोलिसांना पाहून ते पळून गेले व काही वेळाने परत येऊन किरणला आमच्या ताब्यात द्या असे कुंदा काळे यांना धमकवीत होते. दिनांक 11 जानेवारीला सकाळी 11 वाजेच्या सुमारास गजानन तौर याचा एक साथीदार माझ्या घरी आला त्याने मला मी गजानन तौर चा माणूस असून गजानन तौर याने या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून देतो, परंतु मला दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता सुमारास मी माझे कुटुंब व नातेवाईकांसह भीतीपोटी मंगरूळ तालुका घनसांवगी येथील घरी आलो .त्या ठिकाणी दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दहा 12 गाड्यांमधून आम्हाला धमकावण्यासाठी जालना येथून विजय व विक्रम झोल यांनी लोक पाठविल्याची माहिती मिळाल्याने आम्ही पोलिसांना फोन करून आमच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवून त्या लोकांना आमच्यापर्यंत येऊ दिले नाही .याबाबत सततच्या धमक्यांना कंटाळून आज मी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलो आहे.”     किरण खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात विजय झोल, विक्रम झोल ,चालक सुभाष, विजय भांदर्गे, आशिष देशमुख ,सुमित जाधव, गजानन तौर आणि इतर 15 ते 20 जणांवर भादवि कलम 452, 365, 504, 506, तसेच शस्त्र अधिनियम 1959 च्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button