आर्थिक गुन्हे शाखेकडे येत आहेत तक्रारी ;फसवणूक करणाऱ्यांमध्ये एका “परिवाराचा” समावेश?
जालना- क्रिप्टो करेंसी मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे . 21 लाखांची फसवणूक झालेल्या एका व्यापाऱ्याने देखील तक्रार केली आहे .दरम्यान जालना शहरात एका किराणा मॉल च्या मालकाने देखील अनेकांची फसवणूक केली असून शेगाव, अकोला, बुलढाणा या भागातही हे लोन पसरलेले आहे. भावाच्या बँक खात्यावर पैसे मागवून घेऊन या गुंतवणुकीमध्ये या मॉल चालकाने पैसे गुंतवल्याचे समजते.आशा पद्धतीने एका “परिवाराने” देखील अनेकांची फसवणूक केली शक्यता नाकारता येत नाही.
क्रिप्टो करन्सी अर्थात जीडीसी या मध्ये गुंतवणूकदारांची झालेली फसवणूक या संदर्भातील सर्वात पहिली बातमी Edtv ने प्रकाशित केली होती. त्यानंतर गुंतवणूकदार खडबडून जागे झाले. परंतु जागे होऊनही काहीच उपयोग होत नव्हता, कारण हा सर्व प्रकार अभासी होता. गुंतवणुकीचे पुरावे असूनही गुंतवणूक केलेली कंपनी ही सरकारकडे कुठेही नोंदणीकृत नव्हती. त्यातच फसवणूक झालेले ग्राहक, गुंतवणूकदार देखील सुशिक्षित आणि धन दांडगे,अमाप पैसेवाले, राजकारणी असे होते. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे उघड झाले तर आपलीच बदनामी होईल या भीतीने गुंतवणूकदारही समोर आले नाहीत. सोमवारी नको तो प्रकार घडला आणि या कंपनीचे जिल्ह्यातील प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात यांच्या विरोधात साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याची पहिली तक्रार ऋषिकेश शेषराव काळे यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून बरेच राजकीय वातावरण ही तापले आहे. आजच्या परिस्थितीत पहिला गुन्हा दाखल झाल्यामुळे आता यापुढे ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे अशा गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक डी.डी. फुंदे यांनी केले आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचे भ्रमणध्वनी बंद आहेत आणि तूर्तास त्यांचा ठाव ठिकाण नाही लागत नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार तक्रारदारांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही .या आवाहनाला प्रतिसाद देत आत्तापर्यंत सुमारे 30 फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा शाखेकडे तक्रार केलेली आहे ,आणि त्यामध्ये विशेष म्हणजे 21 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने केली आहे. दरम्यान या शाखेच्या वतीने तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन पहिल्या गुन्ह्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीलाच साक्षीदार म्हणून हे इतर गुंतवणूकदार ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान हा गुंतवणुकीच्या फसवणुकीचा प्रकार फक्त जालना जिल्हा पुरताच नव्हे तर जालना जिल्ह्यातील एका किराणा मॉल चालकाने अकोला आणि शेगावकडील व्यापाऱ्यांना देखील आपल्या जाळ्यात ओढले आहे. या करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्राप्त माहितीनुसार या किराणा दुकान चालकाने गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी रक्कम आपल्या भावाच्या खात्यावर वर्ग करून घेतली आणि त्यानंतर भावाकडून ही रक्कम घेऊन गुंतवणूक केलेली आहे. आता हळूहळू असे गुंतवणूकदार समोर यायला लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार पोलीस घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल होऊन कदीम जालना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आणि तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी आणि फिर्यादींचे 2020 पासूनचे बँक व्यवहार पोलीस तपासात असल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे या करन्सी मध्ये काय खरे? काय खोटे ?आणि किती कोटींचा व्यवहार झाला याचा तपास गुन्हे आर्थिक शाखा करत आहे.
फसवणूक झाली असेल तर इथे करा तक्रार. क्रिप्टो करन्सी मध्ये जर फसवणूक झाली असेल तर प्रभारी पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, येथील दूरध्वनी क्रमांक 024 82- 22 42 33 वर तक्रार करावी असे आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com