Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

क्रिप्टो करेंसी; गुंतवणूकदारांची स्थिती “भीक नको कुत्रा हटव सारखी”; जालन्यातच पडली वादाची ठिणगी

जालना- क्रिप्टो करेंसी ची भुरळ फक्त जालनेकारांनाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील धन दांडग्यांना पडली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षण, वेगवेगळ्या आणि ब्रँडेड गाड्यांचे दिवा स्वप्न, करोडो मध्ये लोळण्याचे अमिश अशा सर्व स्वप्नांना घेऊन हे प्रशिक्षण दिले जायचे ,त्यामुळे या प्रशिक्षणार नंतर प्रत्येक जण नवीन गुंतवणूकदाराच्या शोधात असायचे. त्यातच दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी गोवा येथे एका ब्लॉकचेनच्या उद्घाटनासाठी शमिता शेट्टी यांना आमंत्रित केले होते.

अभिनेत्रीच्या आवाहनाला गुंतवणूकदारांनी प्रतिसाद देत गोवा गाठले. त्या नंतर गोल्ड कॉइन ची किंमत वाढत कशी जात आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही वेळोवेळी केला गेला. 4 एप्रिल ला असलेली गोल्ड कॉइन ची किंमत अवघ्या महिनाभरात मे मध्ये दुप्पट झाली आणि त्याच महिन्यात पुन्हा एकदा किंमत वाढली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासासोबतच गुंतवणुकीचा ओघही वाढला परंतु हा सर्व प्रकार फार दिवस चालला नाही. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जालन्यात एका बँक्वेट मध्ये गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एका प्रशिक्षणाचे आयोजन केले. यामध्ये पुणे येथील इरफान सय्यद आणि जालन्याचे प्रमोटर देखील “संसार परिवारासह” उपस्थित होते. नेमके या वादाची ठिणगी इथूनच पडली. गुंतवणूकदाराला पूर्वी आर. ओ. आय. म्हणजे रिटर्न ऑफ इंटरेस्ट नुसार गुंतवणुकीच्या 11 टक्के व्याज दर महिन्याला त्यांच्या खात्यात दिसत होते. आणि 18 महिन्यात दाम दुप्पट ची योजना सांगितले जात होती. म्हणजेच गुंतवणूक केलेली रक्कम सरासरी 200 पटीने मिळणार होती. परंतु नंतर हे व्याज बंद झाले आणि त्याच्या तुलनेत कॉईन द्यायला सुरुवात झाली.

या कॉईनचा जर पैसा करायचा असेल तर ज्याने गुंतवणूक केली आहे त्याला त्याच्या खाली आणखी एक गुंतवणूकदार करावा लागायचा या नवीन गुंतवणूकदाराकडून आलेली रक्कम ठेवून घेऊन पहिला गुंतवणूकदाराचा कॉइन नवीन आलेल्या गुंतवणूकदाराच्या नावावर टाकायचा. दुसरा कॉइन या प्रकारात कॉइन इथेनियम टोकन, जीडीसी कॉइन, आणि या जीडीसी कॉइन चे नाव आता गोल्ड डिजिटल कॉइन नंतर ग्लोबल डिजिटल क्लस्टर कॉइन अशा प्रकारे बदलत गेले. त्यामुळे हळूहळू हा प्रकार गुंतागुंतीचा होत गेला आणि गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यामुळे त्यांनी आपली गुंतवणूक परत मागण्यास सुरुवात केली परंतु हे पैसे देणे परत देणे कोणाच्याही हातात नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे अनेक गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. मात्र या व्यवहाराची नोंद कुठेच नसल्यामुळे कोणालाही सांगता येत नव्हते. दरम्यान 16 जानेवारीला दोन ठिकाणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत १०० तक्रारी आल्या आहेत आणि प्रथमदर्शनी या तक्रारीनुसार हा घोटाळा 300 कोटींमध्ये गेला आहे. असे अनेक गुंतवणूकदार अजूनही बाकी आहेत की ज्यांचे लाखो रुपये या करेन्सी मध्ये अडकलेले आहेत मात्र त्यांना ना तक्रार देता येत आहे ना कोणाला पैसे मागता येत आहेत. त्याचे कारण , जर पोलिसांकडे तक्रार करावी तर पैसे कशा पद्धतीने दिले आहेत याची चौकशी पोलीस करीत आहेत. आज जरी ही चौकशी साधी वाटत असली तरी भविष्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल रोख रकमेत कशी केली? हा प्रश्न गुंतवणूकदाराला विचारला जाऊ शकतो. त्यातच एका- एका गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची रक्कम यामध्ये गुंतवलेली असल्यामुळे आयकर विभागाची देखील यावर नजर आहे आणि रोखीने गुंतवलेली रक्कम योग्य पद्धतीने आली आहे का? त तिचा आयकर भरलेला आहे का? असे अनेक प्रश्न भविष्यात उद्भवू शकतात. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम परत येण्याच्या शक्यतेपेक्षा आयकर विभागाचे शुक्लकाष्ट मागे लागण्याची शक्यता जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांची स्थिती “भीक नको पण कुत्रा हटव” अशी झाल्याचे सध्या दिसत आहे.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button