अवघ्या पाचशे मीटरच्या रस्त्यासाठी दीडशे परिवारांचं जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण
जालना- मंठा बायपासच्या पलीकडे वसलेल्या स्वराज्य नगर, सुमन राज नगर, महावीर नगर, जिजाऊ नगर, गैबनशहा वाडी, गंगाधर वाडी, महाराणा प्रताप नगर, या वसाहतींना जालना शहरात येण्यासाठी अवघ्या पाचशे मीटरचा रस्ता हवा आहे. रस्ता आहे देखील मात्र ओढा वाहत असल्यामुळे या नागरिकांना जालना शहरात येण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घेऊन यावे लागत आहे ,जर हा रस्ता झाला तर अवघ्या दहा मिनिटात या परिसरातील नागरिक जालना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचू शकतील असा हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या भागातील नागरिक प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन थकले आहेत आणि आता त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे सुमारे दीडशे नागरिक आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिवारासह उपोषणाला बसले .
दरम्यान यामध्ये बहुतांशी शासकीय कर्मचारी आहेत परंतु त्यांनी देखील अधिकृत सुट्टी टाकून या उपोषणामध्ये सहभाग घेतला. जालना-अंबड रस्त्यालाच समांतर असलेला हा रस्ता आहे. आणि या रस्त्यापासून आंबड फक्त 25 किलोमीटर आहे. तसा अधिकृत लिहिलेला दगडही प्रशासनाच्या वतीने येथे लावण्यात आला आहे, परंतु केवळ पाचशे मीटरचा रस्ता होत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. हा रस्ता लवकर नाही झाला तर यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील परिवारांच्या वतीने देण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com