जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा….. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; राजाश्रेयाने सिद्धांतावर ठाम राहिले पाहिजे -श्री.श्री.रविशंकर
जालना-( दिलीप पोहनेरकर)
आर्ट ऑफ लिव्हिंग अर्थात जगण्याचं कौशल्य शिकविणारे श्री. श्री. रविशंकर यांच्या प्रेरणेतून मंठा आणि परतूर तालुक्यात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची उपलब्धता करणाऱ्या “जलतारा” या प्रकल्पांतर्गत घेतलेला उपक्रमाला यश आले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीमध्ये आज पाणी दिसायला लागले आहे. या उपक्रमाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज स्वतः श्री. श्री. रविशंकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परतुर तालुक्यातील वाटूर जवळ असलेल्या श्री. श्री. ज्ञानक्षेत्र आर्ट ऑफ लिव्हिंग येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनादरम्यान एकाच व्यासपीठावर अध्यात्म आणि राजाश्रय आल्यामुळे या दोघांनीही एक दुसऱ्यावर कौतुकांचा वर्षाव केला आणि सकारात्मक बाबींना एकत्र आणण्याचे आश्वासनही दिले. प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ,”जलताराच्या” माध्यमातून झालेल्या सकारात्मक बदलाचा राज्य शासन विचार करील आणि शासनाच्या वतीने हा प्रकल्प राबवल्या जाऊन तो पुढे वाढवला जाईल. पूर्वी युती शासनाने देखील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अशाच प्रकारचे उपक्रम राबविले होते मात्र दुर्दैवाने मागील अडीच वर्षाच्या कार्यकालात ह्या योजना बंद केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली ही जलयुक्त शिवार योजना आदर्श होती त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती आणि प्रगती होत होती आता पुन्हा तशाच प्रकारचा हा प्रकल्प राबवून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गुवाहाटीच्या आतापर्यंत झालेल्या तर्कवितरकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाली की ,गुवाहाटीला असताना आपण श्री. श्री. रविशंकर यांना फोन केला होता आणि त्यांनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद कामाला आला. म्हणूनच आज आमचं सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या योजनांचा स्वीकार करणे हे सरकारसाठी भूषणावर आहे .
श्री. श्री. रविशंकर धर्माच्या आश्रयाने जनता सुखी राहते, मात्र त्याला राजाश्रेयाची देखील जोड पाहिजे. राजाश्रेयाने सिद्धांतावर टिकले पाहिजे आणि या सिद्धांतावर टिकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार करेल आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा श्री. श्री. रविशंकर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या पंखात बळ भरताना ते पुढे म्हणाले की ,”समस्या येतात आणि जातात मात्र या समस्यांमुळे कोणाचे संबंध आणि मन तुटू नयेत. आपल्या मधील विश्वास हा कायम ठेवला पाहिजे आणि त्यासाठीच गुरु हा महत्त्वाचा धागा आहे. आपल्याकडे गुरु येतात ते समस्या घेऊन जाण्यासाठी , त्यामुळे आता शेतकऱ्यांनी चिंता न करता चिंतन करावे आणि घरोघरी ध्यान साधना सुरू करावी जेणेकरून रोग आणि व्यसनापासून मुक्ती मिळेल असा सल्लाही देत त्यांनी दिला. त्यासोबत नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे त्यातूनच देशाचा विकास होईल. सध्या सुरू असलेल्या फास्ट फूड आणि जंक फूड मुळे देशातील 30 टक्के निधी हा परदेशात जात आहे परंतु आता याकडे केंद्र सरकारने लक्ष दिल्यामुळे निश्चितच यालाही आळा बसेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान आपण आपल्या क्षेत्रात कुठेही कमी नाहीत. प्रकृती आपल्या सोबत आहे फक्त तिला आपण ओळखले पाहिजे असे मतही श्री.श्री. रविशंकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलतारा प्रकल्पाचे संयोजक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी करून हा प्रकल्प कशा पद्धतीने राबविला जातो याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
हे होते व्यासपीठावर
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार सुरेश जेथलिया, आमदार संजय शिरसाट, युवा नेते अभिमन्यू खोतकर.