बारा तासानंतर काढला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वेळ: घरमालकाला मनस्ताप
जालना-चोरी झालेल्या घराची पाहणी करण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी बारा तासानंतर कसा बसा वेळ काढला. चोरी झाल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या या नागरिकांना पोलिसांच्या या अशा वेळ काढून धोरणामुळे आणखीनच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे घरमालकाला चोरी गेलेल्या सामानाचे वाईट वाटण्यापेक्षा दिवसभर पोलिसांची वाट पाहत ताटकळत बसावे लागल्याचेच जास्त वाईट वाटले.
जुना जालना भागातील विद्युत कॉलनी भागात राहणारे किसनराव शिरसाट हे दिनांक 28 रोजी आपल्या परिवारासह पुणे येथे गेले होते. दरम्यान गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते परत आले, आणि घराचे कुलूप उघडण्यासाठी चॅनल गेट जवळ गेले असता कुलूप तुटलेले दिसले .आणि गच्चीचे दारही तुटलेले दिसले .त्यामुळे त्यांनी समोरच राहत असलेल्या विनोद जैतमहाल यांच्या मदतीने घरामध्ये प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. सर्वसामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाट, टेबलचे ड्रॉवर आणि अन्य सामान निवांतपणे उचकून काही मिळते का? याचा तपास घेतल्याचा अंदाज येथील परिस्थितीवरून दिसत आहे. दरम्यान बाहेरगावी जायचे आहे म्हणून शिरसाट परिवाराने घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवलेली नव्हती. तरीदेखील त्यांच्या मुलाचा एक जुना वापराचा दहा हजारांचा लॅपटॉप आणि सुमारे अडीच हजारांची रोकड घेऊन या चोरट्यांनी मागच्या दाराने पलायन केले आहे. यासंदर्भात किसनराव शिरसाट यांनी काल दिनांक 2 फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास स्वतः कधी जालना पोलीस ठाणे गाठून या चोरीची माहिती दिली होती .मात्र दिवसभर पोलिसांना वेळच मिळाला नाही. रात्री या सर्व घटनेची प्रसारमाध्यमांवर चर्चा सुरू झाल्यानंतर आठ वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वेळ काढला. आणि रात्री नऊ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com